esakal | हजसाठी राज्यातून फक्त मुंबई विमानतळावरुनच जाता येणार
sakal

बोलून बातमी शोधा

3mumbai_airport_5

महाराष्ट्र राज्य हज समितीमार्फत हजला जाणाऱ्या भाविकांसाठी वर्ष २०२१ मध्ये फक्त मुंबई विमानतळावरुन थेट हजला जाण्याची सुविधा देण्यात आली आहे.

हजसाठी राज्यातून फक्त मुंबई विमानतळावरुनच जाता येणार

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य हज समितीमार्फत हजला जाणाऱ्या भाविकांसाठी वर्ष २०२१ मध्ये फक्त मुंबई विमानतळावरुन थेट हजला जाण्याची सुविधा देण्यात आली आहे. औरंगाबाद आणि नागपुर विमातनळावरील थेट हजला जाण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही. देशात २१ ठिकाणांहुन थेट हजला जाण्याची सुविधा होती. मात्र त्यापैकी ११ ठिकाणची सुविधा उपलब्ध राहणार नाही. कोरोनामुळे सौदी प्रशासनाने अतिशय कडक नियम केल्या असून अल्पवयीन मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठांना हजला जाण्याची परवानगी मिळणार नाही. भाविकांना १० डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन, ऑफलाईन, तसेच मोबाईल ॲपच्या माध्यमातून अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

राजकारणात काय अन् घरात काय एकाला न्याय मिळाला तर चार जणांवर अन्याय होणारच : चंद्रकांत पाटील


या वर्षी मोजक्याच भाविकांना संधी
दरवर्षी देशात जवळपास १ लाख ७४ हजार भाविक हज यात्रेला जातात. २०२० या वर्षासाठी भाविकांनी अर्ज केले होते. ज्यांचा नंबर लागला त्यांनी पैसे भरुन सर्व प्रक्रिया केली होती. महाराष्ट्रात जवळपास १० हजारांपेक्षा जास्त भाविकांचा नंबर लागला होता. यामध्ये औरंगाबादेतील ९९० भाविकांचा समावेश होता. मात्र कोरोनामुळे हज यात्रा रद्द करावी लागली. आता वर्ष २०२१ हज यात्रेसाठी घोषणा करण्यात आली आहे. मात्र या वर्षी अतिशय कमी भाविकांना हजला जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यातही अनेक नियम अटी लावण्यात आल्या आहे.

हजला जाण्यासाठी वयाची अट
कोरोनामुळे वर्ष २०२१ या वर्षात हजला जाण्यासाठी भाविकांचे वय १८ ते ६५ दरम्यान असायला हवे. ज्यांचे वय ७ नोव्हेंबर २०२० रोजी अठरा वर्ष पूर्ण होत आहे अशा भाविकांनाच हजला जाण्याची संधी मिळणार आहे. तसेच गर्भवती महिलांना सुद्धा परवानगी राहणार नाही. हजला जाण्यासाठी २०२१ या वर्षी तब्बल ३ लाख ७० हजार रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे. यामध्ये जीएसटी, व्हिसा फिस, वाहतूक दर यात वाढ झाली आहे. ज्यांचा नंबर लागेल अशा भाविकांना पहिला हप्ता दीड लाख रुपये जमा करावा लागणार आहे. वर्ष २०२० मध्ये ही रक्कम फक्त ८१ हजार होती. प्रत्येक हजला जाणाऱ्या भाविकांना दोन लगेज बॅग्ज हज कमिटी देईल. या वर्षी फक्त हज कॅटेगिरी ही फक्त अझिझिया राहणार आहे. कोरोनामुळे एका भाविकाला ९ स्के. मी. जागा दिली जाईल. पूर्वी ही ४ स्के. मी. होती. हजला जाणाऱ्या भाविकांना मक्का येथील इमारतीत जेवण तयार करण्याची परवानगी राहणार नाही. भाविकांना मदिनामध्ये हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जेवणाची व्यवस्था स्वतःला करावी लागणार आहे.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याची आशा मावळली! रब्बीची पेरणी अंधातरी

अर्ज करण्यासाठी ही हवी कागदपत्रे
३०० रुपये ऑनलाईन भरलेली स्लीप, पासपोर्ट पहिला आणि शेवटचे पेज असलेली कॉपी, कॅन्सल चेक, पासपोर्ट साईज फोटो, ब्लड ग्रुप कोणता आहे. त्याची कॉपी असे कागदपत्रे भाविकांना अर्ज करण्यासाठी लागणार आहे.


ज्या भाविकांना अर्ज करायचा आहे. माहिती हवी असल्यास त्यांनी खिदमते हुज्जाज समिती, जुना बाजार येथील कार्यालयात संपर्क करावा. येताना सोबत कागदपत्रे आणावी. तसेच लहान मुलांना कुणीही सोबत आणू नये. भाविकांना १० डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
- मिर्झा रफत बेग, खिदमते हुज्जाज समिती, औरंगाबाद

संपादन - गणेश पिटेकर