मोठा गोंधळच! एकाच दिवशी जेईई अन् एनडीए परिक्षा?...मात्र 'हा' पर्याय उपलब्ध...वाचा सविस्तर बातमी

अरुण मलाणी : सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 July 2020

'यूपीएससी'तर्फे या परीक्षेची सुधारित तारीख ६ सप्‍टेंबर निश्‍चित करण्यात आली आहे. विज्ञान शाखेतील बारावीचे काही विद्यार्थी या दोन्‍ही परीक्षांना प्रविष्ट झाले असण्याची शक्‍यता आहे. या पार्श्वभूमीवर ‘एनटीए'मार्फत अशा विद्यार्थ्यांना माहिती कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक : कोरोनामुळे बहुतांश सर्व परीक्षांच्‍या वेळापत्रकात बदल करावा लागला आहे. त्‍याचा परिणाम म्‍हणून विविध परीक्षांच्‍या तारखांमध्ये साम्‍य आल्‍याने विद्यार्थ्यांची अडचण निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झालेली आहे. मात्र अशा उमेदवारांना पर्यायी तारखेची व्‍यवस्‍था केली जाणार आहे. 

१ ते ६ सप्‍टेंबर दरम्यान होणार परीक्षा 

जेईई मेन्‍स परीक्षा १ ते ६ सप्‍टेंबरला असताना एनडीए परीक्षादेखील ६ सप्‍टेंबरलाच होणार आहे. यामुळे एनडीए परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संदर्भात नॅशनल टेस्‍टिंग एजन्‍सी (एनटीए)ला माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे. त्‍यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत असणार आहे. नॅशनल टेस्‍टिंग एजन्‍सीमार्फत जॉइंट एंट्रन्‍स एक्‍झाम (जेईई) मेन्‍स परीक्षेचे संयोजन केले जाते. यापूर्वी जानेवारीत एकदा सीईटी झाली असून, एप्रिलमध्ये दुसऱ्यांदा जेईई परीक्षा घेतली जाणार होती. परंतु कोरोनामुळे या परीक्षेच्‍या तारखांना दोनदा स्‍थगिती देण्यात आली. आता १ ते ६ सप्‍टेंबरला ही परीक्षा घेतली जाणार असल्‍याचे जाहीर करण्यात आले. 

एनटीएला माहिती कळवा 

दुसरीकडे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनीत प्रवेशासाठी एनडीए प्रवेश परीक्षा घेतली जात असते. या परीक्षेच्‍या तारखांमध्येही बदल करण्यात आला होता. 'यूपीएससी'तर्फे या परीक्षेची सुधारित तारीख ६ सप्‍टेंबर निश्‍चित करण्यात आली आहे. विज्ञान शाखेतील बारावीचे काही विद्यार्थी या दोन्‍ही परीक्षांना प्रविष्ट झाले असण्याची शक्‍यता आहे. या पार्श्वभूमीवर ‘एनटीए'मार्फत अशा विद्यार्थ्यांना माहिती कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा > पुतणीला सतत टोमणे मारणे भोवले काकाला... केले  आत्महत्येस प्रवृत्त

३१ जुलैपर्यंत अंतिम मुदत

ज्‍या विद्यार्थ्यांनी एनडीए परीक्षेसाठी अर्ज केला असेल, अशा विद्यार्थ्यांनी लॉगइन आयडी व पासवर्डच्‍या सहाय्याने एनडीए परीक्षेसंदर्भातील पर्यायाची निवड करण्याचे सूचित केले आहे. त्‍यासाठी ३१ जुलैपर्यंत अंतिम मुदत असणार आहे. अशा उमेदवारांना पर्यायी तारखेची व्‍यवस्‍था केली जाणार आहे. 

हेही वाचा >  संतापजनक! मुलाला भेटायला गेलेल्या विवाहितेला सासरच्यांकडून बेदम मारहाण 

(संपादन -किशोरी वाघ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This option is available to students who take the JEE-NDA exam on the same day nashik marathi news