SSC Exam : भूगोलाचा पेपर रद्द करण्याची मागणी; राज्य सरकार काय निर्णय घेणार?

SSC-Exam
SSC-Exam

पुणे : लॉकडाऊनमुळे इयत्ता दहावीचा भूगोलचा पेपर पुढे ढकलण्यात आला खरा. परंतु सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता ही परीक्षा रद्द करणे योग्य ठरणार आहे, असे मत पालक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्त करत आहेत.

राज्यातील जवळपास १७ लाख ६५ हजारांहुन अधिक विद्यार्थांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. भूगोल विषयाची परीक्षा अनिवार्य आहे. त्यामुळे हा पेपर आताच्या परिस्थितीत घेणे अवघड असल्याचे वास्तव आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीत सरकारने दहावीच्या भूगोल विषयाची परीक्षा रद्द करावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. या परीक्षेबाबत १४ एप्रिलनंतर निर्णय घेणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. परंतु आता लॉकडाऊन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.

दहावीची एकूण परीक्षा ६०० गुणांची असून आतापर्यंत विद्यार्थ्यांची ५५० गुणांची परीक्षा झाली आहे. भूगोलच्या ५० गुणांपैकी १० गुणांची परीक्षा शाळेत घेण्यात आली आहे. आता केवळ ४० गुणांची लेखी परीक्षा राहिलेली आहे.

इंडिया वाइड पॅरेंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा अनुभा सहाय म्हणाल्या, "भूगोल विषयांची परीक्षा घेऊ नये, तसेच हा विषय अंतिम निकालात ग्राह्य धरण्यात येऊ नये. कारण सध्याच्या परिस्थितीचा विचार करता विद्यार्थांची सुरक्षितता जास्त महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांना त्या विषयात सरासरी गुण द्यावे किंवा ५५० गुणांपैकी निकाल जाहीर करावा."

"कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा पेपर रद्द करणे योग्य ठरणार आहे. परीक्षा होणार की नाही याबाबत विद्यार्थांमध्ये
गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेऊन त्यांची चिंता दूर करणे गरजेचे आहे," असे अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क मंचाच्या पालक संघाच्या अध्यक्षा सुरेखा खरे यांचे म्हणणे आहे.

"मुलांचा भूगोलाचा अभ्यास यापूर्वीच झाला होता. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. परीक्षा होणार की नाही हे सरकारने लवकरात लवकर जाहीर केल्यास परीक्षेचा ताण कमी होईल."
- डॉ. प्रज्ञा व्हनकटे, पालक

"सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घ्यावी की नाही, याबाबत फार चिकित्सा करण्यापेक्षा परीक्षा न घेता निकाल लावणे शक्य आहे. विद्यार्थांचा भूगोल विषयांचा अभ्यास झाला आहे. तसेच अकरावी प्रवेशासाठी बेस्ट ऑफ फाइव्हचे गुण धरले जातात. यामुळे विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. त्यामुळे विद्यार्थांना अधिक ताण न देता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने जाहीर करावा."
- अ. ल. देशमुख, शिक्षणतज्ज्ञ

भूगोल पेपरबाबत शिक्षणतज्ञांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे : 

- भूगोल विषय पूर्ण शिकवून झाला आहे.
- शिक्षण पद्धती ही परीक्षेवर अवलंबून नाही.
- दहावीचे गुण देताना 'बेस्ट ऑफ फाईव्ह'नुसार टक्केवारी दिली जाते.
- अकरावीचे प्रवेश हे केवळ भूगोल विषयावर अवलंबून नाहीत.
- भूगोलात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीपर्यंतचा भूगोल व्यवस्थित शिकविलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com