पोलिस म्हणतात..! ...तर सोलापूर शहर एका तासात करू ‘डीजेमुक्त’; कारवाई करतेवेळी अधिकाऱ्यांना येतात आमदार अन्‌ मंत्रालयातून कॉल; ज्येष्ठ नागरिकांचा आज मोर्चा

सर्वोच्च न्यायालयाचे आवाजासंदर्भातील आदेश पायदळी तुडविणाऱ्या मंडळांवर पोलिस कारवाईसाठी पुढे सरसावतात. पण, लगेचच कोणीतरी आमदार, मंत्र्यांचा अधिकाऱ्यांना कॉल येतो आणि कारवाई थांबते. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप झाला नाही तर आमचे पोलिस एका तासात डीजेमुक्त सोलापूर करतील, असा विश्वास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी 'सकाळ'कडे व्यक्त केला.
DJ
DJSakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाचे आवाजासंदर्भातील आदेश पायदळी तुडविणाऱ्या मंडळांवर पोलिस कारवाईसाठी पुढे सरसावतात. पण, लगेचच कोणीतरी आमदार, मंत्र्यांचा अधिकाऱ्यांना कॉल येतो आणि कारवाई थांबते. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप झाला नाही तर आमचे पोलिस एका तासात डीजेमुक्त सोलापूर करतील, असा विश्वास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी 'सकाळ'कडे व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीतील डीजेवर पोलिसांनी पुण्यात जाऊन कारवाई केली तेंव्हाही दोन विद्यमान आणि एक माजी मंत्र्यांनी अति वरिष्ठ कार्यालयातून दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वीही पोलिसांना वारंवार असे अनुभव आल्याने त्यांनीच आता कानात बोळा घातला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शांतता झोनमध्ये दिवसा ५० तर रात्रीच्या वेळी ४० डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा आहे. तर निवासी भागात दिवसा ५५ आणि रात्री ४५ डेसिबल, व्यापारी भागात दिवसा ६५ आणि रात्री ५५ डेसिबल व औद्योगिक परिसरात दिवसा ७५ आणि रात्रीच्या वेळी ७० डेसिबल आवाजाची मर्यादा घालून दिली आहे. मिरवणुकांचा वेळ देखील रात्री दहापर्यंतच ठेवण्यात आला आहे. मात्र, सोलापूर शहरात वर्षातील ३६५ पैकी किमान १८७ दिवस सार्वजनिक मिरवणुका निघतात. ‘डीजे’शिवाय सहसा मिरवणुका निघतच नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे. शहरातील प्रत्येक मिरवणूक मार्ग हा रहिवाशी भागातून जातो आणि त्या मार्गावर शाळा, रुग्णालयांची मोठी संख्या आहे.

‘डीजे’चा आवाज मर्यादित नसतोच, पण त्याचा आवाज अर्धा-एक किलोमीटरपर्यंत ऐकू येतो. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला असून काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. या पार्श्वभूमीवर समस्त सोलापूरकर ‘डीजेमुक्त सोलापूर’साठी पुढे सरसावले असून आता पोलिसांच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप नकोच, अशी त्यांची तीव्र भावना आहे. त्यामुळे आगामी काळात आमदार, मंत्री ‘डीजे’च्या तालावर बेधुंद नाचणाऱ्यांना साथ देणार की त्यांच्याच मतदारसंघातील लाखो सामान्य मतदारांच्या व्यथेला प्राधान्य देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.

पोलिसांच्या १५ दिवसांत दोन कारवाया, पण...

शहरातील एका पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी नीलकंठेश्वर मिरवणुकीत व दहीहंडी मिरवणुकीत ‘डीजे’चा आवाज कमी न करणाऱ्या दोन मंडळांवर कारवाई केली. पोलिसांनी त्या ‘डीजे’चे मिक्सर (आवाजाची मुख्य मशीन) काढून घेऊन जप्त केले. तत्पूर्वी, लोकांच्या तक्रारींवरून पोलिस अधिकाऱ्यांनी त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आवाज कमी करण्यासंदर्भात एकदा तोंडी व एकदा लेखी सूचना केली होती. तरीदेखील, त्यांनी आवाज कमी केला नाही. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली, तरीपण कारवाई करू नका म्हणून पोलिसांना काही आमदारांचे कॉल आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

मिरवणुकांचा मार्ग अन्‌ वेळ अडचणीचीच

रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत मोठ्या आवाजाच्या वाद्यांना परवानगी नाही. तरीपण, सोलापूर शहरातील सर्रास मिरवणुका रात्री ११.३० पर्यंत सुरूच असतात. मिरवणुकांमुळे मुख्य रस्त्यांवरील वाहतूक बंद केली जाते. त्यामुळे देखील अनेकांना वेळेत रुग्णालयात पोचता येत नाही. हा त्रास आता कायमचाच बंद व्हावा, यासाठी कोणतीही मिरवणूक रात्री दहापूर्वीच संपायला हवी, अशीही सोलापूरकरांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com