ST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे टपाल व्यवस्था ठप्प; 1 कोटींचा फटका | MSRTC STRIKE | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSRTC STRIKE

ST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे टपाल व्यवस्था ठप्प; 1 कोटींचा फटका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : ST महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे यासह प्रमुख मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अघोषित संप पुकारला आहे. यामुळे गेल्या अठरा दिवसापासून एसटीची चाके एकाच ठिकाणी थांबली आहेत. पिंपळगाव आगारातील शंभराहून अधिक कर्मचारीही संपात सहभागी झाल्याने एसटी सेवा खोळंबल्याचा परिणाम टपाल व्यवस्थेवर होऊन नागरिकांसमोर अडचणीचा डोंगर उभा ठाकला आहे.

नागरिकांसमोर अडचणीचा डोंगर

बसच बंद असल्याने पत्रासह महत्त्वाचे दस्ताऐवज पोहचण्यात दिरंगाई होऊ लागली आहे. बहुजन हिताय-बहुजन सुखाय असे ब्रीद घेऊन धावणारी लालपरी रूसल्याने अवैध वाहतूक बोकाळली असून यामुळे नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण होत आहे. पिंपळगाव आगारातील संप पुकारणार्यांपैकी दहा कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले. कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम असून नंतर ते निलंबन मागेही घेण्यात आले. त्यांना कोणताही तोडगा मान्य नाही.

संपामुळे एसटीव्दारे सुरू असलेली टपाल पार्सल सेवा प्रभावित होऊन व्यापाऱ्यांचा लाखो रूपयाचा माल अडकून पडला आहे. सोशल मिडियात क्रेझ असतानाही टपाल व्यवस्थेतून पत्रव्यवहारावर नागरिकांचा विश्‍वास कायम आहे. संपामुळे टपालाच्या पिशव्या खेडेगावावर पोहचत नसल्याचे चित्र आहे. मोबाईलमुळे जग मुठीत आले असले तरी टपाल विभागाकडून सुरू असलेल्या इतर सेवा एसटी बंद असल्याने खंडीत झाल्या आहेत. रजिस्टर, धनादेश आदी महत्त्वाचे काम टपाल विभागाकडून संपामुळे ठप्प आहे. गेल्या पंधरा दिवसापासून टपाल विभागाच्या कामावर त्याचा परिणाम जाणवतो आहे.

हेही वाचा: मोदींविरोधात विरोधकांकडे चेहरा नाही? शरद पवारांनी दिलं उत्तर

एसटी बंद असल्याने दिवाळीत प्रवासांची तारांबळ उडाली होती. एसटीचा प्रवास सुरक्षित असल्याने प्रवासी एसटीला प्राथमिकता देतात, पण ऐन सणासुदीच्या दिवशी एसटी बंद असल्याने नागरिकांना खासगी गाड्यांनी गाव गाठण्याशिवाय पर्याय नव्हता. या संधीचा लाभ उठवत खासगी वाहतूक करणाऱ्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. नाईलाजाने नागरिकांनी धोका पत्करून या गाड्यातून प्रवास केला आणि आताही करत आहेत.

पिंपळगावात एक कोटींचा फटका...

पिंपळगाव आगारातील बसला प्रवाशांचा नेहमीच प्रतिसाद असतो. दररोज ११५ फेऱ्यांमधून पाच लाख रूपयांचे उत्त्पन्न होते. दिवाळीत यात दीड ते दोन लाख रूपयांनी वाढ असते. मात्र गेल्या अठरा दिवसापासुन ४० बस आगरात उभ्या आहेत. त्यामुळे आगाराला एक कोटी रूपयांचा फटका सहन करावा लागला आहे.

हेही वाचा: प्रस्तावांची जिल्हा परीषद प्रशासनाला प्रतिक्षा

loading image
go to top