शिवसेना विरोधात गेली तर मुंबई महापालिका कोणाची? अशी असतील समीकरणे !

विष्णू सोनवणे
Tuesday, 5 November 2019

पालिका ताब्यात घेणे भाजपसाठी अवघड 
12 नगरसेवक फोडावे लागतील 

मुंबई : राज्यात सत्ता कोणाची येणार? शिवसेनेची की भाजपची? याचा पेच अद्याप सुटू शकलेला नाही. मुख्यमंत्री भाजपचा झाल्यास मुंबई महानगर पालिकेतील सत्ता समीकरणे बदलणार, अशी चर्चा पालिका वर्तूळात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. भाजपसाठी आता पालिका ताब्यात घेणे तितके सोपे राहिलेले नाही. भाजपला जरी मुख्यमंत्रीपद मिळाले तरी भाजपला महापौरपद मिळविण्यासाठी 12 नगरसेवक फोडावे लागतील. त्यात अनूसुचित जमाती प्रवर्गातील नगरसेवकाला फोडण्यासाठी वाट्टेल ती किंमत भाजपला मोजावी लागेल. त्यामुळे पालिका ताब्यात घेणे भाजपसाठी अवघड असल्याचे सद्याचे चित्र आहे. 

काळजीवाहू राज्य सरकारला महाराष्ट्राचीच काळजी नाही - बाळासाहेब थोरात

मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेत आणि भाजपामध्ये अटीतटीची स्पर्धा सुरू आहे. मुख्यमंत्री पद भाजपकडे गेल्यास पालिकेत मोठा फेरबदल होईल, अशी चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडे 94 नगरसेवकांचे पाठबळ आहे. त्या तुलनेत भाजपकडे 83 नगरसेवक आहे. त्यामुळे पालिका ताब्यात घेवून महापौरपद खेचून आणण्यासाठी भाजपाला आणखी 12 नगरसेवकांची गरज आहे. पालिका ताब्यात घ्यायची असेल तर भाजपला 11 नगरसेवक फोडावे लागतील. महापौरपदासाठी भाजपाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महाडेश्‍वर यांच्या महापौर पदाच्या निवडीच्या वेळीही भाजपाने महापौर पदासाठी हालचाली केल्या होत्या.

राज्यपालांच्या भेटीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले...

दरम्यान, शिवसेनेकडे मनसेचे सहा नगरसेवक आल्याने भाजपचा गेम फसला. पालिकेत गेल्या सात वर्षांपासून भाजप विरोधकाच्या भुमिकेत आहे. पारदर्शक कारभारासाठी आग्रह धरून पहारेकऱ्याच्या भुमिकेत अजूनही भाजपा वावरत आहे. वॉटर, मिटर, गटर ते आरे येथील मेट्रो कारशेडपर्यंत भाजपा आणि सेनेत खटके उडत आहेत. राज्यातील सत्तेतही शिवसेनेला भाजपने दुय्यम स्थान दिले आहे. दोन्हीकडे शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचे गेल्या काही वर्षांत दिसून आले.

मुंबई महानगर पालिका मिळविणे हे भाजपचे लक्ष आहे. मुख्यमंत्रीपद मिळाल्यास भाजप ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील, अशी चर्चा आहे. शिवसेनेकडे मोठे संख्याबळ असल्यामुळे ते पालिकेत निर्धास्त असल्याचे दिसते. मात्र विधानसभेतील अनुभव लक्षात घेता पालिकेतील नगरसेवकांची पळवापळवी केल्यास भाजपची प्रतिमा डागाळण्याची शक्‍यता आहे. 

आरक्षित प्रवर्गासाठी भाजपची अडचण 
महापौर पदाचा कार्यकाळ महिन्याभरात संपत आहे. त्यामुळे महाडेश्‍वर यांना पायउतार व्हावे लागणार आहे. राज्यात सत्ता स्थापन करून महापौर पदावर दावा करण्याची आयती संधी भाजपला चालून आली होती. मात्र शिवसेनेने भाजपला रोखले आहेत. महापौर पद यावेळी अनुसूचीत जमातीच्या (एसटी) प्रवर्गासाठी राखीव असून भाजपकडे या प्रवर्गातील नगरसेवक नसल्याची माहिती पालिकेच्या चिटणीस विभागाने दिली आहे. महापौरपदासाठी शिवसेनेला कोणतीही अडचण येणार नाही. या प्रवर्गातील नगरसेवक शिवसेनेकडे आहेत. कदाचित महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्‍यता असल्याचे चिटणीस विभागाचे म्हणणे आहे. 

पक्षीय बलाबल 
शिवसेना : 94 
भाजपा : 83 
कॉंग्रेस : 28 
राष्ट्रवादी कॉंग्रेस : 8 
एमआयएम : 2 
मनसे : 1


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power equations in Mumbai MNP After shivsena oppose BJP in state