बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १ फेब्रुवारीपासून! दहावीच्या विद्यार्थ्यांची १० फेब्रुवारीपासून तोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

10th, 12th
बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १ फेब्रुवारीपासून! दहावीच्या विद्यार्थ्यांची १० फेब्रुवारीपासून तोंडी

बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १ फेब्रुवारीपासून! दहावीच्या विद्यार्थ्यांची १० फेब्रुवारीपासून तोंडी

सोलापूर : बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा १ ते २० फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच बारावीतील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरु होईल. पुणे बोर्डाने त्यासंबंधीचे नियोजन अंतिम केले असून वेळापत्रक सर्वच शाळा, महाविद्यालयांना पाठविले आहे.

इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन पूर्ण करण्यासाठी २० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विषयाचे देखील प्रात्यक्षिक त्याचवेळी पार पडेल. तसेच प्रात्यक्षिक परीक्षा संपल्यानंतर लेखी परीक्षा सुरु होणार आहे. प्रश्नपत्रिकांची संपूर्ण तयारी झाली असून जवळपास १५ लाख विद्यार्थी बारावीची परीक्षा देतील. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन, पूर्व व्यावसायिक व ‘एनएसक्यूएफ’अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा, शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा १० फेब्रुवारी ते १ मार्च या काळात उरकावी लागणार आहे. त्यानंतर लगेचच त्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सुरु होईल. आता बहुतेक शाळा-महाविद्यालयांचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला आहे. काहींनी आता सराव चाचण्या घ्यायला सुरवात केली आहे. विद्यार्थ्यांनीही परीक्षांची तयारी सुरु केली आहे. जानेवारीत दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांची शाळा-महाविद्यालय स्तरावर सराव परीक्षा घेतली जाईल. त्याचे नियोजन मुख्याध्यापक संघाकडून सुरु आहे.

प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक

  • बारावी : १ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी

  • अंदाजित परीक्षा केंद्रे : ३०००

  • अंदाजित परीक्षार्थी : १५ लाख

  • दहावी : १० फेब्रुवारी ते १ मार्च

  • परीक्षा केंद्रे : ५०००

  • एकूण अंदाजित परीक्षार्थी : १६ लाख

पूर्वीच्याच केंद्रांवर होणार परीक्षा

कोरोनामुळे मागच्या वर्षी ‘शाळा तेथे केंद्र’ करून परीक्षा घ्यावी लागली होती. आता प्रतिबंधित लसीकरणामुळे कोरोनाचा धोका टळल्याची स्थिती आहे. त्यामुळे कोरोनापूर्वी ज्या पद्धतीने परीक्षा व्हायची, ज्या केंद्रांवर परीक्षा घेतली जात होती, त्याच केंद्रांवर (शाळा, महाविद्यालये) आता परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांनी कोणताही मानसिक ताण न घेता परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन पुणे बोर्डाने केले आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून दोन पेपरमध्ये एक दिवसाची सुटी असणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा संपल्यानंतर लेखी परीक्षा सुरु होईल, त्यासंबंधीचे वेळापत्रक बोर्डाने निश्चित केले आहे.