शेकडो प्राध्यापक आर्थिक विवंचनेत, वीस वर्षांपासून धोरणाचा बसतोय फटका

सुहास सदाव्रते
Wednesday, 7 October 2020

वीस वर्षांपासून वरिष्ठ महाविद्यालयात घड्याळी तासिकेवर काम करणारे प्राध्यापक आर्थिक विवंचनेत सापडले आहे.

जालना : वीस वर्षांपासून वरिष्ठ महाविद्यालयात घड्याळी तासिकेवर काम करणारे प्राध्यापक आर्थिक विवंचनेत सापडले आहे. आठ महिन्यांपासून ना वेतन ना कुठला आदेश..पीएचडी,नेटसेट पात्रता असूनही उपेक्षा वाट्याला येत असल्याने शेकडो प्राध्यापक हवालदिल झाले आहेत, हे विशेष.

राज्यात वीस वर्षांपूर्वी शालेय शिक्षणात कंत्राटी धोरण व उच्च शिक्षणात घड्याळी तासिका तत्त्वावर नेमणुका धोरण सुरु झाले. अनुदानित महाविद्यालयात तात्पुरती व्यवस्था म्हणून सीएचबी धोरण होते.परंतु आता वीस वर्ष होऊन गेले तरीही यात बदल झाला नाही.पर्यायाने नेट सेट ,पीएचडी पदवीसह उच्च पदवी घेणाऱ्यांनी क्लॉक अवर बेसिस ‘सीएचबी’ नोकरी स्वीकारली. एका शैक्षणिक वर्षांसाठी नेमणूक तीही तात्पुरत्या स्वरूपात आणि तासिका नुसार मानधन असे धोरण आहे.

जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुल्काविरोधात पालक आक्रमक, शाळेच्या मुख्याध्यापकांना घातला घेराव

एकीकडे तासिका नुसार काम करायचा नियम आणि दुसरीकडे महाविद्यालयात परीक्षा,मूल्यमापन यासह शैक्षणिक कामात प्राध्यापकांना सक्तीने कामे सांगितली जातात, हा मोठा विरोधाभास असल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.विद्यापीठ नियमानुसार एका घड्याळी तासाचे मानधन पाचशे रुपये आहेत. पण त्यातही हातात ४१७ रुपये प्रमाणे बिल निघते असेही प्रकार होत असल्याचे प्राध्यापकांचे अनुभव आहेत. वीस वर्षांपासून चालत आलेल्या या सीएचबी धोरणानुसार काम करणारे शेकडो प्राध्यापक आहेत.

एरवी घड्याळी तासिकेचे वर्षभराचे मानधन काढण्यासाठी अनेक अडचणींवर मात करीत पुढे जावे लागते,असे प्रा.बाबासाहेब खंडाळे यांनी सांगितले. नेट सेट याचबरोबर पीएच.डी. पदवी पात्रता पूर्ण असताना आणि अनुदानित संस्थेत काम करीत असलो तरी अद्यापही सेवेत कायम होवू शकलो नाही, याचेच दु:ख वाटते, अशी प्रतिक्रिया प्रा.गजानन देशमुख यांनी दिली. घड्याळी तासिकेवर काम करताना विद्यापीठ मात्र मान्यता एका शैक्षणिक वर्षाचीच देते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली दखल, अवघ्या सहा तासांत महामार्ग दुरुस्तीस सुरवात

यामुळे पुन्हा नोकरी जाते की राहते अशी अधांतरीच परिस्थिती समोर निर्माण होत असल्याचे अनुभव प्राध्यापक सांगतात. मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थिती असल्याने विद्यापीठाचे शैक्षणिक नियोजन विस्कळीत झाले आहे.याचा फटका शेकडो सीएचबी प्राध्यापकांना बसला आहे.महाविद्यालय सुरू नाहीत,तर विद्यार्थी नाहीत,म्हणून सीएचबी तास नाहीत. यामुळे आठ महिन्यांपासून ना मानधन ना कुठला आदेश अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेकडो प्राध्यापक आर्थिक विवंचनेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

 

मी वीस वर्षांपासून घड्याळी तासिकेवर काम करीत आहे. दरवर्षी शैक्षणिक वर्षांची मान्यता विद्यापीठ देते. मार्च महिन्यापासून ना मान्यता ना कुठले मानधन अशी स्थिती आहे.
- प्रा.लक्ष्मण दळवे, जालना

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Professors In Economical Trouble Jalna News