esakal | केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली दखल, अवघ्या सहा तासांत महामार्ग दुरुस्तीस सुरवात
sakal

बोलून बातमी शोधा

Ausa-Tuljapur Road Repair

महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने आमदार अभिमन्यू पवार यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना महामार्गाला पडलेल्या  भेगाचे आणि दुर्देशेचे छायाचित्रांसह पत्र पाठवून याकडे लक्ष देण्याची विनंती केली. याची गंभीर दखल घेत श्री गडकरी यांनी संबंधित कंत्राटदाराला रस्ता दुरुस्तीच्या सूचना दिल्यावर अवघ्या सहा तासांत या रस्ता दुरुस्तीस सुरवात झाली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली दखल, अवघ्या सहा तासांत महामार्ग दुरुस्तीस सुरवात

sakal_logo
By
जलील पठाण

औसा (जि.लातूर) : 'सकाळ'ने औसा-तुळजापुर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग ३६१ ला भेगा पडून अपघात होत असल्याची बातमी प्रकाशित होताच औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मंगळवारी (ता.६) औसा ते आशिव या मार्गाची पाहणी केली. या मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने त्यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पडलेल्या भेगाचे आणि दुर्देशेचे छायाचित्रासह पत्र पाठवून याकडे लक्ष देण्याची विनंती केली. याची गंभीर दखल घेत श्री गडकरी यांनी संबंधित कंत्राटदाराला रस्ता दुरुस्तीच्या सूचना दिल्यावर अवघ्या सहा तासात या रस्ता दुरुस्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

वाचा : परळी केंद्रातून अखेर वीज निर्मिती सुरु, तिन्ही संच कार्यान्वित


एक वर्ष पूर्ण व्हायच्या आतच रत्नागिरी ते वारंगा फाटा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ ला औसा ते आशिव दरम्यान भेगा पडल्या आहेत. अनेक ठिकाणी थोड्या-थोड्या अंतरावर उंचवटे व खड्डे असल्याने वेगात चालणाऱ्या वाहनाचे अपघात होत होते. याला वाचा सकाळने फोडल्यावर आमदार पवार यांनी या भागाची पाहणी करून जाग्यावरूनच महामार्गाच्या दुर्देशेचे छायाचित्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठविले.

मंत्री गडकरी यांनी याची गंभीर दखल घेत ताबडतोब रस्त्याची दुरुस्ती करण्याची ताकीद दिल्यावर दिलीप बिडकॉन कंपनी खडबडून जागी झाली आणि अवघ्या सहा तासाच्या आत दुरुस्तीची प्रक्रिया सुरू झाली. साठ रुपये चारचाकी वाहनाला टोलच्या माध्यमातून एका फेरीला वसूल करणाऱ्या सदर कंत्राटदाराने रस्त्याच्या दर्जाला बासनात गुंडाळून ठेवत आपले काम पूर्ण केल्यामुळेच वर्षांत हा रस्ता खराब झाल्याचे यातून उघड झाले. रस्ता बनवताना जी साधन सामुग्री व देखभाल करायला हवी होती ती झाली नसल्याने हा रस्ता खराब झाला.


हेही वाचा : जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुल्काविरोधात पालक आक्रमक, शाळेच्या मुख्याध्यापकांना घातला घेराव


रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याची समस्या कायमच
रस्त्यावर पडलेल्या भेगा बुजविण्याचे काम जरी कंत्राटदाराने हाती घेतले असले तरी बोरफळ उड्डाण पुलाच्याजवळ, बेलकुंड जवळील हॉटेल सिंहगड समोरील भागात उतार नीट न काढल्याने दुभाजका शेजारी पावसाळ्यात पाणी साचते आणि भरधाव वाहन या पाण्यात गेले की चालकाचा ताबा वाहनवरून सुटतो. हे पाणी कसे काढणार हा मुख्य प्रश्न अजूनही कायमच असल्याने हे रोडवर साचनारे पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.

तोडलेल्या झाडाचे काय?
पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत असल्याने विकास कामासाठी एक झाड तोडण्यात आले तर त्याच्याऐवजी दहा झाडे लावण्यात यावी अशी धारणा असतांना दिलीप बिडकोनने या मार्गावरील शेकडो झाडे तोडली. मात्र अद्याप नवीन झाडे लावली नाहीत. ही गंभीर चूकही या कंत्राटदाराकडून होत आहे. याकडेही लक्ष दिले गेले पाहिजे.

संपादन - गणेश पिटेकर