esakal | जुलै-ऑगस्टमध्ये धो-धो! 2015 चा ‘पॅटर्न’ पुनरावृत्तीची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

rain

जुलै-ऑगस्टमध्ये धो-धो! 2015 चा ‘पॅटर्न’ शक्य

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : अंदमानमध्ये मॉन्सून दाखल (monsoon) झाला असून, त्याचे परिणाम १५ ते १८ जूनला राज्यात दिसायला सुरवात होईल. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि काही भागात पाऊस असे त्याचे स्वरूप असेल. पण तरीही राज्यात जुलै-ऑगस्टमध्ये धो-धो पाऊस होण्याचा हवामान अभ्यासकांचा (Weather forecasters) अंदाज आहे. एवढेच नव्हे, तर पक्ष्यांच्या हालचाली आणि सांख्यिकी ‘मॉडेल’च्या आधारे यंदाच्या पावसाळ्यात २०१५ मधील झालेल्या पावसाच्या ‘पॅटर्न’ची पुनरावृत्ती (2015 pattern possible) होण्याची शक्यता अभ्यासकांना वाटते. (Rain-in-July-August-2015-pattern-possible)

हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार २०१५ चा ‘पॅटर्न’ शक्य

महाराष्ट्रातील यंदाच्या पावसाळ्याची नेमकी स्थिती काय राहील, याबद्दलचे अधिकृत स्पष्टीकरण हवामान विभागातर्फे देण्यात आलेले नाही. मात्र फलोत्पादन क्षेत्रासाठी हवामानाचा अभ्यास करणाऱ्यांचा अलीकडच्या काळात २५ मे ते ५ जून अशा राज्यातील वादळी पावसाचा तयार झालेल्या ‘ट्रेंड’ पाहिल्यावर यंदा शुक्रवार (ता. २८) ते सोमवार (ता. ३१) आणि १ जूनला उन्हाळी पावसाचा अंदाज आहे. या अंदाजाची चुणूक पूर्वसंध्येला राज्याच्या काही भागात मिळाली. अवर्षणप्रवण क्षेत्र असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला आहे. तसेच काही भागात ढगाळ हवामान तयार झाल्याने मॉन्सून वेळेपूर्वी हजेरी लावणार काय? अशा शंकेची पाल शेतकऱ्यांमध्ये चुकचुकू लागली.

हेही वाचा: अवास्तव बिल आकारल्यास टाळे ठोकू - महापौर सतीश कुलकर्णी

जूनअखेर हलका पाऊस

मॉन्सूनचे परिणाम दिसू लागल्यानंतर २५ ते ३० जूनला मॉन्सून सक्रिय झाल्याची अनुभूती हलक्या पावसाच्या आगमानाने मिळेल. मात्र हा पाऊस दहा मिलिमीटरपर्यंत राहण्याची चिन्हे दिसताहेत, असे अभ्यासक सांगतात. मॉन्सून सक्रिय झाल्यावर पुढे १० ते १५ दिवसांच्या उघडीपीचा अंदाज असून, १५ जुलैपासून जुलैच्या अखेरपर्यंत संपूर्ण राज्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जुलैअखेरनंतर पुन्हा पुढे आठवडा ते दहा दिवसांची उघडीप होऊन ५ ते २० ऑगस्टपर्यंत पुन्हा राज्यभर वरुणराजा मेहरबानी करण्याचा अंदाज आहे. शिवाय सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यभर ७० ते सव्वाशे मिलिमीटर पावसाची शक्यता आहे. हा पाऊस झाल्यावर दहा दिवसांची उघडीप नाकारता येत नाही. त्यानंतर २५ ते ३० सप्टेंबर आणि १ ते १० ऑक्टोबरला राज्यभर पाऊस होईल, तर २० ऑक्टोबरच्या आसपास परतीचा पाऊस सुरू झाल्यावर आठ दिवस तो सुरू राहील, असेही अभ्यासकांना वाटते. त्याचप्रमाणे नोव्हेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे. दिवाळी झाली, की राज्यात थंडीला सुरवात होईल. सध्याच्या तयार झालेल्या हवामानाच्या आधारे अभ्यासकांनी शक्यता आणि अंदाज दिले आहेत. हवामानात बदल झाल्यावर त्यात अभ्यासकांना बदल अपेक्षित आहेत.

हेही वाचा: कोरोनामुळे विवाह सोहळ्यांना ब्रेक! मे महिन्यात अवघी एक नोंदणी

शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

राज्यातील मॉन्सूनबद्दल हवामान अभ्यासकांनी वर्तवलेल्या अंदाजाच्या अनुषंगाने यंदा खरिपाच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे. उन्हाळी पावसाच्या भरवशावर धूळ पेरणीला शेतकऱ्यांनी सुरवात केल्यावर हे बियाणे कितपत उगवणार, याबद्दल कृषी विभागाला शेतकऱ्यांशी संवादाला सुरवात करावी लागणार, असे दिसते. अगोदर कोरोना विषाणू संसर्गात सलग दुसऱ्यांदा खरीप हंगामाची तयारी शेतकऱ्यांना करावी लागत आहे. रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आहेत. अर्थनियोजनात पाच वर्षांत पहिल्यांदा पीककर्जाचे उद्दिष्ट घटवण्यात आल्याने पीककर्ज उपलब्धतेचा प्रश्‍न शेतकऱ्यांना भेडसावणार आहे. त्याची सुरवात राज्याच्या काही भागात झाली आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या एकूण अभ्यासाच्या आधारे शेतकऱ्यांपर्यंत नेमकी माहिती पोचवण्याचे जबरदस्त आव्हान कृषी विभागाला पेलावे लागणार आहे.

ढग निर्मितीत अडथळे

तौक्ते चक्रीवादळाने राज्याच्या विविध भागात हाहाकार उडवला आहे. त्याच्या नुकसानभरपाईची तयारी राज्य सरकारने केली आहे. त्यातच पुन्हा बंगालच्या उपसागरात ‘यास’ चक्रीवादळ झाले. परिणामी, मेमध्ये ढगांच्या निर्मितीसाठी आवश्‍यक असलेले पुरेसे तापमान मिळाले नाही, असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. चक्रीवादळ मॉन्सूनच्या बदलणाऱ्या वेळापत्रकास कारणीभूत ठरल्याचे अभ्यासक सांगताहेत.

loading image