esakal | नाशिक, पुणे, अहमदनगर, नांदेडसह 'या' जिल्ह्यांना धोक्याची घंटा; येत्या तीन तासात जोरदार पाऊस!

बोलून बातमी शोधा

Rain
नाशिक, पुणे, अहमदनगर, नांदेडसह 'या' जिल्ह्यांना धोक्याची घंटा; येत्या तीन तासात जोरदार पाऊस!
sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण पहायला मिळत असून राज्याच्या विविध भागात हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने नुकताच वर्तवला. मागील दोन दिवसांत सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद आणि सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं आहे. त्यातच आज पुन्हा हवामानने वर्तवलेल्या अंदाजानुसार नाशिक, पुणे, अहमदनगर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, लातूर आणि जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस बरसण्याची शक्यताही त्यांनी सांगितलीय, त्यामुळे येत्या 3-4 तासांत या भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचे भाकीत हवामानने बोलून दाखवले आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रादुर्भावासोबतच राज्यातील हवामानातही प्रचंड हेलकावे निर्माण होत आहेत. अलीकडेच राज्यातील तापमानाचा पारा पुन्हा चढू लागताच, राज्यातील ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यातच काल पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीटही झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

वन विभागाच्या कॅमेऱ्यात वाघाची छबी; तब्बल तीन वर्षांनंतर 'सह्याद्री'त पट्टेरी वाघाचे दर्शन

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात प्रचंड उष्मा वाढला असून अंगाची लाही-लाही होताना दिसत आहे. मात्र, अवकाळीने वेळीच काही भागात बरसात केल्याने नागरिकांना या उन्हापासून काहीअंशी दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत वातावरणात प्रचंड बदल होत असून काही भागात मुसळधार, तर काही भागात अवकाळीच्या हलक्या सरी बरसत आहेत. नाशिक, पुणे, अहमदनगर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, लातूर आणि जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस बरसण्याचा अंदाज हवामानने वर्तवल्याने शेतकऱ्यांत चांगलीच धास्ती वाढली आहे. येत्या तीन-चार तासात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांनी आतापासूनच शेतीकामे आवरत पिके सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी पळपळ करत आहेत. सध्या पश्चिम विदर्भ ते दक्षिण तामिळनाडू आणि कर्नाटक या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. शिवाय दक्षिण महाराष्ट्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, राज्यात अनेक ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस पडत आहे. पुढील आणखी पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचं संकट कायम असणार असल्याची माहितीही हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.