

राज्यातील एक लाख 41 हजार व्यक्तींचा कोरोनाच्या दोन्ही लाटेत मृत्यू झाला आहे. त्यांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 50 हजारांप्रमाणे सात हजार 50 कोटींची मदत मिळेल.
सोलापूर : राज्यातील एक लाख 41 हजार व्यक्तींचा कोरोनाच्या (Covid-19) दोन्ही लाटेत मृत्यू झाला आहे. त्यांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 50 हजारांप्रमाणे सात हजार 50 कोटींची मदत मिळेल. यासंदर्भात आज (शुक्रवारी) राज्य सरकारने (Maharashtra State Government) नवीन आदेश काढले आहेत. पुढील आठवड्यापासून मृतांच्या नातेवाइकांना सेतू केंद्रात अथवा महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतीतून अर्ज करता येणार आहेत. कोरोना झाल्यानंतर 30 दिवसांत मृत्यू झालेल्यांना मदत दिली जाणार असून त्यासाठी मृत्यू प्रमाणपत्राचे बंधन घातले आहे.
राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून कोरोना मृतांच्या नातेवाइकांना राज्य सरकारकडून मदत मिळणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली होती. कोरोना झाल्यापासून 30 दिवसांत संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रमाणपत्रावर त्यासंबंधीची नोंद असावी. त्या रुग्णाची कोरोनासंबंधीची चाचणी होणे आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतरही मृत्यू प्रमाणपत्रावर त्याची नोंद नसल्यास त्या रुग्णाचे नातेवाईक जिल्हा शल्य चिकित्सकांकडे स्वतंत्रपणे अर्ज करू शकतील. जिल्हा व महापालिका स्तरावरील तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडविले जाणार आहेत. राज्य सरकारने विकसित केलेल्या स्वतंत्र वेबसाईटच्या माध्यमातून मदतीसंबंधीचे अर्ज करता येणार आहेत. वेबसाईट तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून काही दिवसांत त्याचे काम पूर्ण होणार आहे. पुढील आठवड्यापासून मदतीसाठी नातेवाइकांना अर्ज करता येणार आहेत. अर्ज केल्यांनतर सात दिवसांत मदत संबंधित नातेवाईकाच्या बॅंक खात्यात वर्ग केली जाणार आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांना ही मदत मिळणार आहे.
मदतीसंदर्भातील ठळक बाबी...
कोरोना पॉझिटिव्ह आल्यापासून 30 दिवसांत मृत्यू झालेल्यांना मिळेल मदत
कोरोना रुग्णाचा दवाखान्यात किंवा घरी मृत्यू झाल्यास त्याचे मृत्यू प्रमाणपत्र मदतीसाठी बंधनकारक
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत जाहीर; राज्यात एक लाख 41 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू
मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकाला मदतीपूर्वी इतर सदस्यांचे घ्यावे लागणार नाहरकत प्रमाणपत्र
तक्रार निवारणासाठी जिल्हा व महापालिका स्तरावर स्वतंत्र समिती; जिल्हा शल्यचिकित्सक असतील समन्वयक
दोन्ही लाटेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 50 हजारांची मदत मिळेल, यासंदर्भात आज शासनाने परिपत्रक काढले. मदतीसाठी अर्ज करण्याची स्वतंत्र वेबसाईट तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पुढील आठवड्यापासून अर्ज स्वीकारणे सुरू होईल.
- संजय धारूरकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन, मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.