Vidhan Sabha 2019 : मतपेटीतून कमळच कमळ फुलेल : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 October 2019

रोडशोमध्ये बोलताना फडणवीस म्हणाले की, 'मला माहीत आहे की, तुम्ही सर्वजण मतदान करणार आहात आणि 24 तारखेला मतपेटीतून कमळच कमळ फुलणार आहे. आपल्या 200 पेक्षा जास्त जागा मिळतील असा मला विश्वास आहे.'

नागपूर : विधानसभेची रणधुमाळी आज थंडावेल. आज (ता. 19) प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सगळे पक्ष आणि नेते आपले जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. नागपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोड शो करून आपली ताकद दाखवली. 'पाच वर्षे पारदर्शक कारभार करून आम्ही जनतेची सेवा केली. आता तेच काम घेऊन आम्ही तुमच्या समोर आलोय. आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा.' असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागपूरकरांना केले.

शहरातील पश्चिम व दक्षिण नागपूर मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मतदारसंघातील इतर उमेदवार यांचा आज रोड शो होता. भाजपच्या या 'रोड शो'ला प्रचंड गर्दी झाली होती. 'मतदान हा लोकशाहीचा मोठा उत्सव आहे. या उत्सवाच्या यज्ञात तुमची मतदानरूपी समिधा तुम्ही टाका. ही निवडणूक मी तुमच्या भरवश्यावर सोडतोय. जसं प्रेम आणि विश्वास मागील पाच वर्षे दिलात, तसाच यापुढेही द्या.' असं मागणं फडणवीसांनी नागपूरकरांना मागितलं. तसेच मतदानाचे महत्त्व ही जनतेला पटवून दिले. 2 किमीच्या या रोडशोमध्ये दहा हजारांहून अधिक समर्थक होते.

'चंपा' हे नाव भाजप मंत्र्यांकडूनच ऐकलं : अजित पवार

या रोडशोमध्ये बोलताना फडणवीस म्हणाले की, 'मला माहीत आहे की, तुम्ही सर्वजण मतदान करणार आहात आणि 24 तारखेला मतपेटीतून कमळच कमळ फुलणार आहे. आपल्या 200 पेक्षा जास्त जागा मिळतील असा मला विश्वास आहे.' या रोड शोमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही होत्या. त्यांनीही भाजपच्या नागपूरमधील वर राज्यातील कामाचा लेखाजोखा नागपूरकरांसमोर मांडला.   

तुमच्याकडे 'ही' 11 ओळखपत्रे आहेत? मग करता येईल मतदान!

माटे चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून रोड शो प्रारंभ झाला. पुढे गोपालनगर दुसरा बस स्टॉप, पडोळे चौक, दीनदयालनगर चौक मार्गाने भेंडे ले आउट चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर रोड शोचा समारोप झाला. या रोड शोमध्ये वारकरी मंडळ, छत्तीसगडी नृत्य पथक, लेझीम पथक, दांडपट्टाधारक आदींचा समावेश होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road show by CM Devendra Fadnavis at Nagpur for Maharashtra Vidhansabha 2019