
तात्या लांडगे
सोलापूर : दरमहा शासनाकडून फिक्स तारखेला पगार, कर्मचाऱ्यांना दरमहा किमान ४५ ते ६५ हजार रुपयांचा पगार, हातात स्मार्ट वॉच, राहायला बंगला, ये-जा करायला नवीन गाडी, तरीदेखील काहींना लाचेचा मोह सुटतच नाही. नोकरीपूर्वी लाच घेणाऱ्यांवर सडेतोड बोलणाऱ्यांचाही त्यात समावेश असतो. लाच प्रकरणांमध्ये २०१० पासून महसूल व पोलिस हे दोन्ही विभाग अव्वल आहेत.
मागील पाच वर्षांत लाच प्रकरणात तब्बल पाच हजार जण अडकले आहेत. गोरगरिबांची कामे करताना लाच घेणाऱ्यांना स्वत:च्या कुटुंबीयाची, शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या प्रतिमेची अजिबात चिंता वाटत नाही. लाचेचे प्रकार बंद व्हावेत म्हणून दरवर्षी सप्ताह साजरा केला जातो, पण प्रमाण कमी झालेले नाही. दरम्यान, नागरिकांना लाचेसंदर्भातील तक्रारीसाठी ०२१७ - २३१२६६८ किंवा १०६४ या क्रमांकावर फोन करून तक्रार देता येईल. याशिवाय ९४०४००१०६४ या व्हॉट्सॲप क्रमांकावरही तक्रार करता येते. पण, गुन्हा दाखल झाल्यानंतर अशा प्रकरणांची सुनावणी वेळेत होत नाही आणि साक्षीदार बदलतात, काहींचा मृत्यू होतो किंवा काहीजण साक्ष द्यायला नकार देतात. त्यामुळे अनेकजण गुन्हा दाखल होऊनही शिक्षेपर्यंत पोचत नाहीत, अशीही वस्तुस्थिती आहे.
गैरप्रकार रोखण्यासाठी तक्रार करणे आता सोयीचे
लाच घेणे व देणे दोन्ही गुन्हेच आहेत. कोणत्याही कामासाठी समोरील व्यक्ती विनाकारण लाचेच्या स्वरूपात पैसे, वस्तू मागत असल्यास तक्रारदाराला व्हॉट्सॲप, ऑनलाइन, टोल फ्री क्रमांकावरून किंवा कार्यालयात जाऊन तक्रार देता येईल, अशी सोय केली आहे. त्यानंतर सापळा रचून संबंधित व्यक्तीविरुद्ध आमचे अधिकारी, अंमलदार कारवाई करतात. असे गैरप्रकार रोखण्यासाठी तक्रारदारांनी पुढे यायला हवे, जेणेकरून लाच मागण्याचे प्रमाण कमी होईल.
- शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे
पोलिस अन् महसूलच अव्वल का?
राज्य व केंद्र शासनाच्या योजनांच्या लाभासाठी आता अर्जाची सोय ऑनलाइन केल्याने शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारायला लागत नाहीत. तरीपण, महसूल विभागातील कामासाठी विशेषत: शेतीशी संबंधित कामांसाठी लोक शासकीय कार्यालयात जातातच. दुसरीकडे, पोलिसांत तक्रारीची सोय ऑनलाइन असताना देखील तक्रार झाल्यावर किंवा गुन्हा घडल्यावर दोन्हीकडील लोक पोलिस ठाण्यात जातात. त्यावेळी आपले अज्ञान पाहून समोरील व्यक्ती लाचेची मागणी करते आणि आपणही आपले काम पैसे दिल्याशिवाय होणार नाही, या भ्रमातून लाच द्यायला तयार होतो. त्यामुळेच हे दोन्ही विभाग लाचेत अव्वल असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. लाचेची प्रकरणे थांबण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त ऑनलाइनच कामे करावीत, त्याचा पुरावा देखील त्यांच्याकडे राहतो आणि सेवाहमी कायद्यानुसार ते काम संबंधित अधिकाऱ्यास मुदतीत करावेच लागते, असेही सांगितले.
लाचेच्या कारवाईची स्थिती
वर्ष एकूण कारवाई महसूल पोलिस लाचेत एकूण अडकलेले
२०२१ ७७३ १७८ १७३ १०७७
२०२२ ७४९ १७५ १६१ १०३४
२०२३ ८१२ १९९ १४४ ११०९
२०२४ ७२१ १७६ १३७ १०१३
२०२५ ५०१ १३६ ८१ ७३२
एकूण ३,५५६ ८६४ ६९६ ४,९६५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.