
"या मोर्चाची चेष्टा करणारेही तुम्हीच…"; 'त्या' व्हिडिओवरून संभाजीराजेंनी राऊतांना सुनावलं
महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे उद्या (सोमवार)पासून नागपूरमध्ये सुरू होत आहे. या पार्श्वभूमिवर राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळते आहे. मुंबईतील मविआचा मोर्चा किती विशाल होता हे दाखवताना मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडिओ ट्वीट करणाऱ्या संजय राऊत यांना संभाजीराजेंनी चांगलच सुनावलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चाला नॅनो म्हणणे चुकीचे आहे, त्यांच्याकडून अशी टीका अपेक्षित नाही असे विधान संजय राऊत यांनी केले. त्यांनी त्यासोबत हा मोर्चा किती विशाल होता हे दाखवणारा व्हिडीओही त्यांनी ट्विट केला. मात्र आज नागपुरात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा व्हिडिओ कालच्या मार्चाचा नसून मराठा मार्चाचा आहे असे सांगितले. यानंतर आता संभाजीराजे यांनीही संजय राऊतांना झापलं आहे.
संभाजीराजेंनी ट्विट केलं की, "संजय राऊत ज्या मोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणून हिणवले तोच मराठा क्रांती मोर्चा आज स्वतःच्या राजकारणासाठी वापरत आहात. या मोर्चाची चेष्टा करणारेही तुम्हीच होता. आज नसलेली ताकद दाखविण्यासाठी एकेकाळी ज्या मराठा समाजाला हिणवलं, त्यांचाच मोर्चा वापरताना जरा तरी तमा बाळगा!" अशा शब्दात संभाजीराजेंनी संजय राऊतांना सुनावलं आहे.
हेही वाचा: Devendra Fadnavis : …तर मुख्यमंत्री त्यांची इच्छा निश्चित पूर्ण करतील; अजित पवारांना फडणवीसांचा खोचक टोला
महाविकास आघाडीच्यावतिने शनिवारी मुंबईमध्ये महामोर्चा काढण्यात आला होता. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान होत असल्याचं सांगत हा मोर्चा काढण्यात आला होता. या नंतर महाविकास आघाडीच्या या मोर्चाचा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी नॅनो मोर्चा असा केला होता. फडणवीस यांच्या या टीकेला उत्तर देताना संजय राऊतांनी मोर्चाचा एक व्हिडिओ शेअर केला. पण राऊत यांनी शेअर केलेला व्हिडिओ हा 2017 सालच्या मराठा मोर्चाचा असल्याचे समोर आले आहे. यानंतर आता संभाजीराजेंनी देखील संजय राऊतांना सुनावलं आहे.
हेही वाचा: Lokayukta Bill : आता मुख्यमंत्रीही येणार लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत; फडणवीसांची मोठी घोषणा
संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये, देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच! महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज. देवेंद्र जी..हे वागणे बरे नाही." असं म्हटलं होतं. यासोबत ट्विट करण्यात आलेला व्हिडिओ मराठा क्रांती मोर्चाचा असल्याची चूक आज देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिली आहे.
हेही वाचा: प्रेमाचा करुण अंत! लोखंड कापयच्या यंत्रांनं पत्नीचे पन्नास तुकडे; पोलिसांनी सांगितलं कारण
यानंतर संजय राऊतांनी पुन्हा ट्विट करत "मराठा मोर्चा देखील महाराष्ट्र स्वाभिमान.. न्याय्य हक्कांसाठी निघाला. शिवरायांचा जयघोष करीत त्याच मार्गावरून त्याच ताकतीने निघाला. तेव्हा देखील आजच्या प्रमाणे विराट मोर्चाची चेष्टा दबक्या आवाजात हेच लोक करीत होते. दोन्ही मोर्चे महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारे होते. तूर्त इतकेच!" असं ट्विट केलं आहे.