
'अपक्षांना पाठिंबा नाहीच; संजय राऊतांचा संभाजीराजेंना थेट इशारा
संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेवरच्या जागेविषयीची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. शिवसेनेने संभाजीराजेंचा पाठिंबा दर्शवण्याची तयारी दाखवली, मात्र त्यासाठी पक्षप्रवेशाची अट घातली. संभाजीराजेंची मात्र ही ऑफर धुडकावून लावली आहे. त्यानंतर आता शिवसेनाही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. कोणीही असेल तरी अपक्षांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली आहे. (Sanjay Raut)
हेही वाचा: शिवसेनेची ऑफर धुडकावली, संभाजीराजे सकाळीच कोल्हापूरकडे रवाना
माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी शिवसेनेचे दोन उमेदवार देऊ आणि ते दोन्हीही निवडून आणू अशी भूमिका मांडली आहे. राऊत म्हणाले, "दोन जागा शिवसेना लढतेय. आम्ही दोन्ही जागी उमेदवार देऊ आणि निवडून आणू. संभाजीराजेंनी अपक्ष लढण्याची घोषणा केलीये. जेव्हा एखादा उमेदवार असं सांगतो, तेव्हा त्यांच्याकडे निवडून येणाऱ्या मतांची व्यवस्था त्यांनी केली असते. ज्याअर्थी त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केलीये, त्याअर्थी त्यांना कोणीतरी पाठिंबा देतंय. अशावेळी आम्ही मध्ये पडणं योग्य नाही.
हेही वाचा: शिवसेनेचा 'प्लॅन बी' अॅक्टिव्ह, राज्यसभेसाठी संभाजीराजेंचा पत्ता कट?
राऊत पुढे म्हणाले, आत्ता असं दिसतंय की त्यांच्याकडे आवश्यक तेवढी मते नाहीत, मग त्यांनी मतं आमच्याकडे मागितली. पण आम्हाला शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार निवडून आणायचेत. आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, मग ते कोणीही असो. आम्ही एक पाऊल पुढे आलो, त्यांनाही सांगितलं की तुम्हीही एक पाऊल पुढे या. पण शेवटी निर्णय त्यांचा आहे. पण दोन उमेदवार शिवसेनेचेच निवडून जातील. उद्धव ठाकरेंच्या वतीने मी हे सांगतोय. ये उद्धवजी के मन की बात है.
आम्ही संभाजीराजेंच्या (Sambhajiraje Chhatrapati) विरोधात नाही. त्यांना आमचा विरोध नाही. पण आम्हाला आमच्याकडे असलेल्या दोन्ही जागांवर फक्त कट्टर शिवसैनिक निवडून आणायचे आहेत आणि ते आम्ही आणू, अशी ठाम भूमिका संजय राऊतांनी मांडली आहे.
Web Title: Sambhajiraje Rajyasabha Shivsena Uddhav Thackeray Sanjay Raut
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..