esakal | या धरणातून सोडले तब्बल 19 टीएमसी पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

karad

कोयना धरणात यंदाच्या जलवर्षात आजपर्यंत 102.61 टीएमसी पाण्याची आवक जलाशयात झाली आहे. पाणीसाठा नियंत्रणासाठी सहा वक्र दरवाजांतून 19.56 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

या धरणातून सोडले तब्बल 19 टीएमसी पाणी

sakal_logo
By
जालिंदर सत्रे

पाटण (जि. सातारा) ः सलग दोन महिने दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये 24 दिवसांत कोयना प्रकल्पाबरोबर खरिपाची शेती, बारमाही सिंचन व वीजनिर्मितीची काळजी संपवली आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाने आज चार हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला. जून महिन्यात धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी 788 मिलिमीटर, जुलैत 1849 मिलिमीटर आणि या 24 दिवसांत 2473 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जलवर्षात आजपर्यंत 102.61 टीएमसी पाण्याची आवक जलाशयात झाली आहे. पाणीसाठा नियंत्रणासाठी सहा वक्र दरवाजांतून 19.56 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 

जलवर्षाच्या प्रारंभी जलाशयात 34.13 टीएमसी पाणीसाठा होता. महिन्याच्या सुरवातीस चक्रीवादळामुळे दोन दिवस पडलेला पाऊस सोडला तर मॉन्सूनचा पाऊस कमी प्रमाणातच पडला. संपूर्ण जून महिन्यात कोयनानगरला 787 मिलिमीटर, नवजाला 839 आणि महाबळेश्वरला 788 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. 1 जुलैला जलाशयात सिंचन आणि वीजनिर्मितीला पाणीवापर झाल्याने फक्त 32.08 टीएमसी पाणीसाठा होता. 

जुलै महिन्यात काही दिवस विश्रांती, तर काही दिवस मुसळधार पाऊस पडल्याने पाणलोट धरण क्षेत्रात कोयनानगरला 968, नवजाला 1095 व महाबळेश्वरला 1190 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने 31 जुलैपर्यंत जलाशयाने 52 टीएमसीकडे वाटचाल केली होती. मात्र, जून व जुलै महिन्यात अपेक्षित असणारा पाऊस न पडल्याने धरण पूर्णक्षमतेने भरेल, याबाबत शंका निर्माण झाली होती. 

चार ऑगस्टला मुसळधार पावसास सुरवात झाली आणि 11 दिवसांत धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी स्वातंत्र्यदिनी सकाळी 11 वाजता धरणाच्या सहा वक्र दरवाजांतून पाणी सोडण्यास सुरवात झाली. पावसाचा जोर वाढल्याने 16 ऑगस्टला चार वाजता धरणाचे दरवाजे 10 फुटांपर्यंत उचलण्यात आले व महापुराची परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती निर्माण झाली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. 

धरणात 102 टीएमसी पाण्याची आवक 
जलवर्षात आजपर्यंत 102.61 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. पायथा वीजगृहातून सिंचनासाठी 7.48 टीएमसी पाणी वापरण्यात आले. पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी पायथा वीजगृहातून 1.43 टीएमसी आणि सहा वक्र दरवाजांतून 19.56 असा एकूण 28.47 टीएमसी पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला आहे. पश्‍चिमेकडे वीजनिर्मितीसाठी 11.51 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. 

संपादन ः संजय साळुंखे 

महावितरण 875 व्हॉट्‌सअॅप ग्रुपव्दारे साधणार ग्राहकांशी संवाद 

loading image
go to top