'ओबीसींचा Empirical Data मार्चपर्यंत मिळणार; आरक्षणाबाबत शरद पवार, मुख्यमंत्री आग्रही' I Ajit Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar-Ajit Pawar

'..तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असा ठराव महाविकास आघाडीनं केला होता.'

ओबीसींचा Empirical Data मार्चपर्यंत मिळणार : अजित पवार

खंडाळा (सातारा) : राज्यातील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) होत आहेत. यासंबंधी असणारा इम्पेरिकल डाटा हा दोन महिन्यात मार्च एंड पर्यंत होणं अपेक्षित आहे. यासाठी लागणारा निधी व कर्मचारी वर्ग महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) उपलब्ध करुन दिला आहे, तरी मार्चपर्यंत हा इम्पेरिकल डाटा (Imperial data) मिळावा, यासाठी आम्ही आग्रह धरणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दिली. ते नायगाव Naigaon (ता. खंडाळा) येथे सावित्रीबाई फुले (Savitribai Phule Jayanti) यांच्या जयंतीनिमित्तानं अभिवादन करण्यासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले, यासाठी दोन्हीही सभागृहाच्या मंजुरीनं लागणारा निधी व सर्व स्टाफ महाविकास आघाडीनं उपलब्ध करुन दिल्यानं आता याविषयी निधीची कमतरताची अडचण दूर झालीय. याआधी मुख्यमंत्री व मी आयोगाशी बोलले असता दोन महिन्यात इम्पेरिकल डाटा देऊ, असं सांगितलं होतं. यानंतर आताही आयोगाशी पुन्हा बोलू. आयोगानं ठरवलं तर दोन महिन्यात हे पूर्ण व्हायला हरकत नाही, तरी येत्या दोन महिन्यात हा इम्पेरिकल डाटा देण्यासंबंधी आम्ही आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील ओबीसी आरक्षण संबंधी बोलताना पवार पुढे म्हणाले, जोपर्यंत ओबीसी समाजाला लोकप्रतिनिधीची संधी मिळत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असा ठराव महाविकास आघाडीनं केला होता. हा प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरता नसून मध्यप्रदेश व इतर राज्यातही आहे. म्हणून, केंद्र सरकारनं याबाबत कायद्यात दुरुस्ती ही करु शकत होते. मात्र, आम्ही असं म्हटलं की, याबाबात टोलवाटोलवी करतात असं बोललं जातं. ओबीसी आरक्षणाबाबात शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) व महाविकासआघाडीची इच्छा असल्याचे अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil), पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच कोरोनासंबंधी लहान मुलांनी लसीकरण करुन घ्यावे. कोरोना संकट वाढताना काळजी घ्या, असंही त्यांनी आवाहन केलं.

..म्हणून मी सकाळी लवकर नायगावला आलो

कोरोना काळात एकदाही मास्कविना अजितदादा कधीही माईक समोर आलेले दिसलेच नाहीत. याची चर्चा सर्वत्र होत असतानाच, कोरानाच्या नियमावलीची पायमल्ली होऊ नये, म्हणून मी सकाळी लवकरच अभिवादन करण्यासाठी नायगावला आलो असल्याचं पवारांनी सांगितलं. यामुळं अजित पवार स्वतः कोरोनाविषयी असणारी जागृता त्यांच्या कृतीतून आजही स्पष्ट झाली.