Satara : ज्येष्ठ विधीज्ञ कॉ. धैर्यशील पाटील यांचं निधन; आज संगममाहुलीत अंत्यसंस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Senior lawyer Dhairyasheel Patil passed away

साताऱ्यातील शरद लेवे खून खटल्यात त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची बाजू संभाळली होती.

Satara : ज्येष्ठ विधीज्ञ कॉ. धैर्यशील पाटील यांचं निधन; आज संगममाहुलीत अंत्यसंस्कार

Dhairyasheel Patil Passed Away : ज्येष्ठ विधीज्ञ कॉ. धैर्यशील पाटील (Senior lawyer Dhairyasheel Patil) ऊर्फ डी. व्ही. पाटील (वय ७९) यांचं आज (बुधवार) सकाळी पावणे अकराच्या सुमारास अल्प आजारानं साताऱ्यातील राहत्या घरी निधन झालं. त्यांच्या मागं पत्नी ॲड. दिपा पाटील, मुलगा नगरसेवक निशांत पाटील, ॲड. सिध्दार्थ पाटील, मुलगी नताशा शालगर असा परिवार आहे. ते 'दादा' या नावानं परिचित होते.

आज सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्यावर संगममाहुली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ॲड. धैर्यशील पाटील हे नेर्ले (ता. वाळवा, जि. सांगली) गावचे असून १४ जुलै १९४३ मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील साताऱ्याचे आमदार व्ही. एन. पाटील होते. ॲड. पाटील हे 'दादा' नावाने परिचित होते. त्यांनी सलग ५२ वर्षे वकिली करून विविध नामवंत खटल्यात यश मिळवत महाराष्ट्रभर नाव कमवले होते. फौजदारीचे ते निष्णात वकिल होते.

शरद लेवे खून खटल्यात उदयनराजेंची बाजू संभाळली

इंडियन बार कौन्सिलचे (Indian Bar Council) ते अध्यक्ष होते. तसेच महाराष्ट्र, गोवा बार असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. गोवा बार असोसिएशनचा त्यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला होता. धैर्यशील पाटील यांनी कामगार, कष्टकरी समाजासाठी शेवटपर्यंत कार्यरत राहिले. डाव्या विचारसरणीचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. साताऱ्यातील शरद लेवे खून खटल्यात त्यांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची बाजू संभाळली होती. तसेच महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून खटल्यात ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांची बाजू त्यांनी संभाळली होती.

कामगारांसाठी कायदेशीर लढे उभारले

राज्यातील अनेक महत्वाच्या खटल्यात त्यांनी कामकाज केले होते. नवीन न्यायाधीशांना मार्गदर्शनपर व्याख्याने ते देत असत, तसेच त्यांना प्रशिक्षणही देत होते. सातारा म्युन्सिपल कामगार संघटनेचे त्यांनी सलग पन्नास वर्षे नेतृत्व केले. कामगारांच्या प्रश्नाचा त्यांना जिव्हाळा होता. कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी अनेक आंदोलने, मोर्चे काढले. तसेच कामगारांसाठी कायदेशीर लढे ही त्यांनी उभारले होते.