PowerAt80: माणस जोडणारा नेता!

Sharad_Pawar
Sharad_Pawar

PowerAt80/शरद पवार : नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व यांचा संगम समाजधुरीणांकडे असावा अशी सर्वांचीच अपेक्षा असते. सर्वच क्षेत्रात व्यापक व चौफेर विस्तार असलेल्या व्यक्तीमत्वाच्या मागे लोक नेहमी चालत राहतात, त्यांचे विचार ऐकून त्यावर निर्णय करतात, अशा धुरीणांना एक अलिखित समाजमान्यता मिळालेली असते. त्यांचे ज्ञान, अनुभव व प्रत्येक घटकाला समजून घेण्याची पध्दत या मुळे अशा लोकांचा शब्द हाच प्रमाण असतो. ज्येष्ठ नेते शरद पवार हेही आज महाराष्ट्राच्या राजकारणातील असेच एक नाव. 

राज्याच्या राजकारण व समाजकारणात सर्वच बाबतीत ज्येष्ठ व अनुभवसंपन्न असे व्यक्तिमत्व असलेल्या शरद पवार यांच्या कर्तृत्वाविषयी आणि त्यांच्यातील नेतृत्वगुणाविषयी बरच लिहील, बोलल गेल. सलग पाच दशके अविरतपणे राजकारण व समाजकारणाचा वसा घेतलेल्या या धुरंधराने आपल्या आजवरच्या वाटचालीत अनेक गोष्टी कमावल्या, मात्र या सर्वात एका बाबीचा प्रकर्षाने उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे लोकसंग्रहाचा. 

राजकारण करायचे म्हटल की लोकांचा पाठिंबा हवा, हे तर असतेच, मात्र केवळ लोकांचा पाठिंबा असून चालत नाही, त्यांच्या मनात कुठतरी एक स्थान निर्माण करावे लागले आणि तेही एका विशिष्ट नव्हे तर सर्वसमावेशक जनसमुदायाच्या मनात ती प्रतिमा निर्माण करण्याचे अवघड काम शरद पवार यांनी लीलया करुन दाखवले आहे. 

समाजमनात काय दडलय ते अचूकपणे ओळखून त्या दिशेने पावले टाकायची व निर्णयप्रक्रीयेतही व्यापक समाजहित कसे जोपासले जाईल याची काळजी घ्यायची या बाबी त्यांनी कायम जपल्या. अनेक छोटे मोठे वाद त्यांच्यापर्यंत आजही जातात, अनेकदा समझोत्याच्या वेळेस त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो पण त्यांची कार्यशैली अचंबित करणारी आहे. बारामतीत एका जाहिर कार्यक्रमात त्यांनी उदाहरण सांगितले. एका संस्थेच्या दोन पदाधिका-यांमधील वाद होता. एकाने नेहमीप्रमाणे दुस-यावर आरोप केलेले होते. पवार यांनी याचा उल्लेख करत नमूद केले, माझ्याकडे तराजू असतो. एका पारड्यात चांगली तर दुस-यात वाईट कामे असतात. मी नेहमी तराजूकडे बारकाईने पाहत असतो, जो वर चांगल्याचे पारडे झुकलेले असते, तो वर मी त्या कडे दुर्लक्ष करतो आणि ते पारडे वर गेले तर मग मी विचार करतो. चांगले काम करणा-याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा त्यांचा स्वभाव आहे. 

त्यांच्या वाटचालीत त्यांनी शब्दशः लाखो माणस जोडली. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, नाट्य, गायन, विज्ञान, अवकाश संशोधन, संरक्षण, कृषी, अभियांत्रिकी या सह असंख्य क्षेत्रातील जवळपास सर्वच मान्यवर आज त्यांचे जवळचे मित्र आहेत. पवारांचा एक फोन गेला की ही जोडलेली माणसे त्यांच्या मदतीला धावून येतात. केवळ भारतातच नाही तर जगाच्या कानाकोप-यात प्रत्येक देशात त्यांची हक्काची माणस आहेत, प्रसंगी ती पवारांच्या मदतीला धावून जातात. 

माणसांमध्ये रमणारा हा माणूस. सातत्याने विविध स्वभाव आणि प्रकृतीच्या व्यक्तींसोबत सुसंवाद साधणे हा त्यांचा छंद. समोरचा माणूस लहान की मोठा, वय आणि अनुभवापलिकडे जात, त्याच्याशी संवाद साधत त्याच्या मनातल सगळ त्याच्या ओठावर आणण्याची किमया पवारांना जमली आहे. माणसाला काही क्षणातच आपलस करुन घेण्याचे कसब त्यांच्या अंगी आहे. पवारांच्या यशस्वी समाजकारणाच खऱ गुपित त्यांनी जोडलेली माणस हेच आहे. 

आज राज्यातील दोन डझन प्रमुख संस्थांच अध्यक्षपद त्यांच्याकडे असेल, पण प्रत्येक संस्थेत त्यांची माणस त्यांच्याशी हितगुज करत त्या संस्था अधिक कौशल्याने कशा चालवता येतील, हे पाहत असतात. शरद पवार यांचे नेतृत्व असलेल्या संस्थांचा दर्जा कायमच उंच असतो कारण त्यांनी जोडलेली माणसे जीव ओतून त्या संस्थातून कार्यरत असतात. पक्ष असो किंवा संस्था, काहीही नीट चालवायच असेल तर त्या साठी तितक्या ताकदीच्या व समर्थपणे जबाबदारी पेलू शकतील अशा व्यक्तींची गरज असते, यशस्वी होताना टीमवर्क गरजेचे असते, ही बाब त्यांनी अचूक ओळखली असल्याने त्यांच्या नेतृत्वाखालील माणस त्यांच्यावर दिलेली जबाबदारी कुशलतेने पार पाडताना दिसतात. 

राजकारण काय किंवा समाजकारण काय, ते करताना जिवाभावाची माणस जोडीला असण गरजेच असत. अनेकदा सत्ता, पद, पैसा, प्रसिध्दी या पलिकडे जाऊन जी मानसिक आत्मियता असते, त्या पोटी लोक जिवाला जीव द्यायला तयार होतात. माणस जोडण्याची कला ज्याला जमली तो जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात सहजतेने यशस्वी होतो. कठिण प्रसंगी काहीही कामाला येत नाही पण जी माणस जोडलेली असतात, तिच धावून येतात आणि कठिण प्रसंगातून तारुन नेतात. शरद पवार यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच माणस जोडली आणि त्यांचा स्नेह कायम टिकवून ठेवला. 

मिळालेल्या पदाचा वापर सत्कारणासाठी कसा करावा हे त्यांच्याकडून शिकाव. वैयक्तिक स्वरुपाची कोट्यवधी कामे त्यांनी गेल्या पाच दशकांच्या प्रवासात केली, मात्र या राज्याला देशाला दिशा देण्याच्या दृष्टीने अनेक धाडसी निर्णय त्यांनी विचारपूर्वक घेतले. नेतृत्व दूरदर्शी असेल तर कायापालट कसा होऊ शकतो याचे उदाहरण म्हणून आपण कृषी विभागाकडे पाहू शकतो. दहा वर्षे कृषी विभागाची धुरा सांभाळल्यानंतर या क्षेत्राला एक वेगळी दिशा व बळीराजाला आर्थिक स्थैर्य देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 

हे करतानाही दिल्ली पासून ते थेट बारामतीपर्यंत त्यांनी आपल्या माणसांवर विश्वास टाकून त्यांच्याकडून काम करवून घेतले. क्षमता निर्माण करण्यासह त्यात वाढ करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रोत्साहन दिले, पवार यांच्या पाठिंब्याच्या जोरावर अनेकांची निर्णयक्षमता वाढली तसेच कार्यक्षमताही वाढली. क्रिकेट असो वा शेती, संगीत असो वा नाट्य, सहकार असो वा शिक्षण सर्वच क्षेत्रात पवार यांनी मोठ्या विश्वासाने जबाबदा-या सोपविल्या आणि ज्यांच्यावर त्या पडल्या त्यांनीही त्याला न्याय दिला. 

खरतर वयाचा उल्लेख केलेला त्यांना अजिबात आवडत नाही, अनेकदा त्यांनी जाहिरपणे तसे बोलूनही दाखविले. मुळात त्यांच्या वयाचा आणि त्यांच्या कामाचा कधीच एकमेकांशी संबंध येत नाही, इतके व्यस्त ते कायम असतात. बारामतीत असतानाही त्यांच्या डोक्यात सातत्याने कृषी, शिक्षण, कृषीपूरक व्यवसाय, शेतीला जोडधंदा काय करता येईल, संस्था मजबूत कशा करता येतील, बळीराजा व लोकांचे जीवनमान अधिक सुखकारक कसे होईल याचेच विचार असतात. 

कमालीचा संयम आणि सतत माहिती करुन घेण्याचा स्वभाव या मुळे ते कायमच अपडेट असतात. कोणत्याही क्षेत्रातील माहिती त्यांच्याकडे नाही, असे होतच नाही. प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजाशी थेट संबंध व त्यांना प्रत्येक स्तरावर मदतीची भूमिका पवार घेत असल्याने त्यांच्याविषयी सर्वच घटकात कमालीचा आदर आहे. विरोध आणि मतभेद असले तरी टोकाची भूमिका न घेता सर्वांनाच कायम मदतीचा प्रयत्न पवारांनी केल्याने विरोधकही त्यांच्या फॅनक्लबमध्ये सहभागी असतात. वैचारिक व तात्विक विरोध करायचा पण वैयक्तिक स्तरावर मैत्री कायम ठेवायची हे त्यांचे सूत्र त्यांच्या यशाचे गमक म्हणता येईल. परमेश्वराने त्यांना समाजकारणासाठी उदंड आयुष्य देवो हीच त्यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांना सदिच्छा.

- महाराष्ट्रातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com