PowerAt80: शंभर टक्के जिराईत असणारं गाव झालं बागाईत

Sharad_Pawar
Sharad_Pawar

PowerAt80: सोमेश्वरनगर : पंधरा वर्षापूर्वीपर्यंत चौधरवाडीत चांगल्या जमीनीत ज्वारी तर माळाला कुसळे उगवायची. परंतु गावाने एकी केली आणि गावाच्या जावयाचे घर गाठले. जावयाने सहकारी पाणीपुरवठा योजनांची स्थापना करायला लावली आणि अजित पवारांमार्फत गावाला फारसा त्रास न होता तीन योजना कार्यान्वित केल्या. यामुळे शंभर टक्के जिराईत असणारे गाव आज साठ-सत्तर टक्के बागाईत झाले आहे. जिथे ज्वारीसुध्दा होत नव्हती तिथे गेली पंधरा वर्ष ऊस होत आहे. 

चौधरवाडी (ता. बारामती) या गावचे जावई दस्तुरखुद्द माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे आहेत. चौधरवाडी हे भारताचे कसोटीपटू स्व. सदू शिंदे यांचे गाव. त्यांच्या कन्या प्रतिभा पवार यांचा शरद पवार यांच्याशी १ ऑगस्ट १९६७ ला विवाह झाला. या शिंदे कुटुंबापैकी बहुतांश कुटुंब पुण्यातच राहतात. तर दोन कुटुंब चौधरवाडीत आजही रहात आहेत. सदू शिंदे यांचे जुने घर मोडकळीस आल्यावर ते मोडून काही वर्षांपूर्वीच नवा बंगला बांधण्यात आला आहे. चौधरवाडी हे गाव 'बायकोचे माहेर' असल्याने शरद पवार यांनी नेहमीच गावातील लोकांचे ऐकून घेतले, त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रय़त्न केला.

१९९० च्या दरम्यान गावातील लोक मुख्यमंत्री असलेल्या पवारांकडे गेले आणि स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी केली. त्यानंतर करंजे ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन चौधरवाडी ग्रामपंचायतीची निर्मिती झाली. १९९१ साली शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या लग्नाची पत्रिका घेऊन सासुरवाडीला आले होते. जाताना गाव पाणीपुरवठा योजना देऊन गेले. अजित पवार यांनीही ही साहेबांची सासुरवाडी आहे हे वेळोवेळी नमूद करत ग्रामसचिवालय, शाळा इमारत, ओढा खोलीकरण, जलसंधारण, संरक्षण भिंत अशी अनेक कामे दिली. ग्रामस्थांनीही पवार कुटुंबियांना शक्यतो दरवेळी शंभर टक्के मतदान करून सासरवाडीचे कर्तव्य निभावण्याचा प्रयत्न केला. 

जमिनी आहेत पण पाणी नाही हे दुर्भिक्ष्य संपविण्यासाठी ग्रामस्थ २००५ साली शरद पवार यांना भेटले. पवारांनी त्यांचे प्रस्ताव तयार करायला लावून काही सूचना केल्या. अजित पवारांकडे जबाबदारी सोपविली. अजित पवारांनी वीजकंपनी, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम अशा सगळ्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन त्वरीत अंमलबजावणी केली. खास चौधरवाडीकरांसाठी पुणे जिल्हा बँकेचे धोरण बदलून कर्ज पुरेसे कर्ज उपलब्ध करूनद दिले. एक रूपया खर्च न करता आम्हाला वीजेचे एकोणिस खांब मिळाले, अशा शब्दात प्रतिभाताई पाणीसंस्थेचे सचिव सुरेश पवार यांनी ऋण व्यक्त केले.

तर अजितदादा पाणीसंस्थेचे अध्य़क्ष तानाजी भापकर म्हणाले, आमची अडीचशे तीनशे एकर जमीन भिजते आहे. त्या भिजण्यामुळे जे योजनेत नाहीत त्यांच्याही शेतीला पाझरपाणी मिळते. सत्तर टक्के गाव बागाईत बनले आहे. माजी सरपंच यादवराव शिंदे यांनी, प्रतिभाताईंचं गाव असल्यामुळे तालुक्यात काटेवाडीच्या बरोबरीने आमच्या गाावानेही कष्टाने स्वच्छता पुरस्कार मिळविला असे सांगितले. दिल्लीला गेलो तेव्हा चौधरवाडीवरून आलोय म्हटल्यावर थेट साहेबांकडे प्रवेश मिळाला आणि गप्पागोष्टी केल्या असे सांगितले.

अजितने तुमचे पैसे भरलेत
यशवंत ग्रामसमृध्दी योजनेसाठी दहा टक्के निधी लोकवर्गणीतून भरावा लागायचा. प्राथमिक शाळेच्या नव्या इमारतीसाठी दीड लाख लोकवर्गणी घेऊन चौधरवाडीकर शरद पवार यांच्याकडे गेले. त्यावर पवार म्हणाले, "अरे तुमचे पैसे अजितने भरले आहेत. आता आणलेले पैसे ग्रामसचिवालयासाठी भरा," असे सांगितले. ग्रामस्थ एकदम भारावूनच गेले आणि आणलेले पैसे ग्रामसचिवालयासाठी भरले.

भाऊबिजेचा अनोखा रंग
शक्यतो दरवर्षी भाऊबीजेची साडीचोळी घेऊन चौधरवाडीचे ज्येष्ठ पवारसाहेबांच्या मुंबई वा गोविंदबागेतील घरी जातात. प्रतिभाताईंकडून थेट बंगल्यात प्रवेश मिळतो. शरद पवार यांनी मंदिराला सभामंडप दिला होता. त्यानंतर एका भाऊबिजेला प्रतिभाताई म्हणाल्या, 'झालं का रे मंदिर तुझं?' त्यावर आम्ही 'पाडव्याला गावफंडाचे पैसे आल्यावर रंग दिला की पूर्ण होईल" असे सांगितले. यावर ताईंनी, "अप्पा माझ्या खात्यावरली रक्कम वापरा आणि रंगकाम पूर्ण करा," अशी आठवण ज्येष्ठ ग्रामस्थ पोपटराव पवार आणि भगीरथ पवार यांनी सांगितली.

- महाराष्ट्रातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com