PowerAt80: शरद पवार भीमाशंकरला आले अन् मुख्यमंत्रीच झाले!

Sharad_Pawar
Sharad_Pawar

PowerAt80: मंचर : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि आंबेगाव तालुक्याचे नाते अतूट आहे. आंबेगाव तालुक्याचे माजी आमदार दत्तात्रय वळसे पाटील (दिलीप वळसे पाटील यांचे वडील) हे पवार यांचे अत्यंत विश्वासू व निष्टावंत कार्यकर्ते अशीच त्यांची ओळख. ही परंपरा दिलीप वळसे पाटील यांनीही सार्थ करून दाखविली आहे. भीमाशंकरला पवार साहेब आले आणि मुख्यमंत्रीच झाले, असा इतिहास आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर येथील शिवलिंगाच्या दर्शनासाठी शरद पवार यांनी यावे, असा आग्रह (स्व) दत्तात्रय वळसे पाटील यांचा होता. त्यानुसार पवार दर्शनासाठी भीमाशंकरला आले होते. तेव्हा पवार हे राज्याचे उद्योग मंत्री होते.

भीमाशंकर येथे टेकडीवर वनखात्याचे विश्रामगृह होते. त्यावेळी तेथे विजेची सोय नव्हती. प्रकाशासाठी कंदील, दिवे होते. एका खोलीत पवार यांची राहण्याची व्यवस्था केली होती. शरद पवारांना रात्री एकच्या सुमारास थोडीशी हालचाल व गारवा  जाणवला. क्षणार्धात ते उठून बसले. तर त्यांच्या अंगावरून एक साप सरपटत खिडकीतून बाहेर जाताना दिसला.हे पाहून पवार सुन्न झाले. त्यांनी ताबडतोब  दत्तात्रय वळसे पाटील यांना हाक मारली. वळसे पाटीलही  लगेच धावत आले. शरद पवार यांनी घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला.

त्यावेळी दत्तात्रय वळसे पाटील आनंदी  होत म्हणाले, साहेब, हा तर शुभशकुन आहे. आपण पहाटे भीमाशंकरची पूजा करूया.त्यानंतर पवार यांनी ज्योतिर्लिंगाची पूजा केली. त्यानंतर शरद पवार मुंबईला परतले. या घटनेनंतर आठ ते दहा दिवसात शरद पवार मुख्यमंत्री झाले.हा किस्सा शरद पवार यांनीच एका जाहीर कार्यक्रमात सांगितले आहे.ही गोष्ट जेव्हा प्रतिभाताई पवार यांना समजली. तेव्हापासून गेली 41 वर्षे त्या श्रावण महिन्यातील एका सोमवारी भीमाशंकरला शिवलिंगाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात.

आंबेगावच्या प्रगतीत शरद पवार यांचे योगदान

आंबेगाव तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध होता. पडणाऱ्या पावसावरच शेती अवलंबून होती. दिवाळी नंतर जमिनी पडून राहत होत्या. पिण्याच्या पाण्यासाठी गावोगावी टँकर सुरू होते. रोजगारासाठी तरुणांचे लोंढे पुणे-मुंबई ला जात होते. पाण्याशिवाय शेतकऱ्यांची व तालुक्याोतील जनतेची प्रगती नाही. हे ओळखून सहकार महर्षी माजी आमदार (स्व) दत्तात्रय गोविंदराव वळसे-पाटील यांनी हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) झाले पाहिजे, अशी मागणी 1978 मध्ये मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे केली होती.

पवार साहेब यांनीही ताबडतोब मंजुरी देऊन धरण कामाचे पूजनही केले. त्यावेळी फक्त डाव्या कालव्याची तरतूद  होती. त्यामुळे शिनोली, घोडेगाव, नारोडी, लांडेवाडी, मंचर, अवसरी खुर्द, निरगुडसर, जारकरवाडी कवठे, मालठण आदी ५० गावे धरणाच्या पाण्यापासून वंचित राहत होती. दत्तात्रय वळसे पाटील यांनी उजव्या  कालव्याचा आग्रह धरला. पवार साहेबांनी उजव्या कालव्याला ही मान्यता दिली. त्यानंतर पुढे निधी अभावी धरणाचे काम रेंगाळले होते.

1990 मध्ये दिलीप वळसे-पाटील आमदार झाल्यानंतर त्यांनी धरण , उजव्या व डाव्या कालव्यासाठी निधीची मागणी मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे  केली. निधी प्राप्त झाला. घोड व मीना नदीवर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे जाळे उभे केले. शाश्वत पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेती  हिरवीगार झाली. त्यावर असलेला दुष्काळी तालुका हा शिक्का पुसला गेला. टोमॅटो , बटाटे ,कांदा, भाजीपाला ,दूध  उत्पादनात आंबेगाव तालुका अग्रेसर झाला. कामाला गती आली. त्यावेळी वळसे-पाटील यांनी बीएड, डीएड कॉलेजची ही मागणी केली होती.

पण आंबेगाव तालुक्यात प्रथम साखर कारखान्याची गरज आहे, असे पवार साहेबांनी निदर्शनास आणून दिले. त्यानुसार दत्तात्रय वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप वळसे-पाटील यांनी पुढाकार घेऊन आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून भीमाशंकर साखर कारखान्याची उभारणी केली. देश पातळीवर पारदर्शक कामकाज व उस उत्पादकांचा तारणहर्ता अशी भीमाशंकर कारखान्याची कीर्ती पोहोचली आहे. अनेकांना रोजगार मिळाला आहे.शेतकरी कुटुंबांचे राहणीमान उंचावले आहे. घरोघरी दुचाकी व चारचाकी वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबई-पुण्याला रोजगारासाठी गेलेली असंख्य कुटुंब गावात स्थिरावली आहेत. 

“अवसरी खुर्द येथे तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले. त्यामुळे शेतकरी कुटुंबातील मुले व मुलींना अभियंता होणे शक्य झाले आहे. उद्योग व्यवसाय भरभराटीस आले आहे. आंबेगाव तालुक्याच्या प्रगतीत पवार साहेबांचे योगदान महत्वाचे आहे.”
 - बाबुराव बांगर, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

- महाराष्ट्रातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com