पंतप्रधान बनू पाहणाऱ्या शरद पवारांचं बंड नरसिंहरावांनी असं मोडलेलं... | Sharad Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar was lost to p v narsimharao in competition for prime minister

पंतप्रधान बनू पाहणाऱ्या शरद पवारांचं बंड नरसिंहरावांनी असं मोडलेलं...

१९६७ मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी शरद पवारांचे राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीत उभं केले. आणि शरद पवार तिथून निवडून आले. पुढे चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले. पन्नास वर्षांच्या सक्रिय राजकारणात त्यांनी देशाचं संरक्षणमंत्रिपद आणि कृषीमंत्रिपदही भूषवलं. उत्तम जनसंपर्क, आंदोलनांमधून तयार झालेले नेतृत्व गुण आणि राजकीय उद्दिष्ट ठरवून त्याकडे एकमार्गी वाटचाल करण्याची वृत्ती यामुळे देशपातळीवर पोहोचायला शरद पवारांना वेळ लागला नाही, असं राजकीय जाणकार सांगतात. पण, शरद पवारांचं एक स्वप्न अजूनही पूर्ण झालेलं नाही. त्याच स्वप्नाविषयी आज आपण बोलणार आहोत.(sharad pawar was lost to p v narsimharao in competition for prime minister)

१९९१ मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेस पक्षाला खंबीर नेतृत्व राहिलं नव्हत. सोनिया गांधी त्यावेळी राजकारणात यायला इच्छूक नव्हत्या. पक्षाला सावरेल असा मोठा नेता नव्हता. त्याचवेळी महाराष्ट्रातील तरुण नेते शरद पवार यांनी दिल्लीच्या राजकारणावर आपली छाप निर्माण केली होती.

राजीव गांधींनंतर एक तरूण नेता काँग्रेसला पुन्हा उभारी देईल अशीही काही काँग्रेस नेत्यांची मागणी होती आणि म्हणून शरद पवारांच्या नावाची चर्चाही झाली होती. शरद पवारांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह काँग्रेस अध्यक्षपद ताब्यात घेण्याची मोर्चे बांधणी केली. मुंबईतून काही उद्योगपती देखील त्यांच्या साठी रसद पुरवत होते. तरुण खासदारांपैकी विशेषतः सुरेश कलमाडी हे पवारांच्या गटाचं सेनापतिपद भूषवत होते. वेळप्रसंगी बंड करण्याची तयारी देखील त्यांनी केली होती असं जाणकार सांगतात.(Maharashtra Political Crisis Updates)

हेही वाचा: पवार X फडणवीस : महाराष्ट्रातल्या राजकारणातील चाणक्य ठरवणारी ‘लढाई’

पण ऐनवेळी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ ही ज्येष्ठ नेते नरसिंह रावांच्या गळ्यात कशी पडली. या प्रसंगाविषयी राजकीय जाणकार सांगतात की, खरं तर त्यावेळी नरसिंहराव दिल्लीहून पुन्हा हैदराबादला जाण्यासाठी इच्छुक होते, पण त्यांची समजूत घालून त्यांना पंतप्रधानपदही दिलं गेलं आणि शरद पवारांसमोर आलेली पंतप्रधान पदाची पहिली संधी हुलकावणी देऊन निघून गेली.

नरसिंह राव काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले. पण, अध्यक्षानेच पंतप्रधान व्हावं असा नियम नाही. दोन्ही पदं आणि त्यांची कामं वेगवेगळी आहेत, असा पक्षांतर्गत प्रचार शरद पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी केला असं बोललं जातं. त्यावेळी महाराष्ट्रातून काँग्रेसचे तब्बल ३९ खासदार निवडून गेले होते. हा आकडा इतर राज्यांपेक्षा कितीतरी पटीने मोठा होता. नेता निवडीसाठी पक्षातर्फे सिध्दांत शंकर रे यांची निरिक्षक म्हणून निवड करण्यात आली. त्यांनी उघड मतदान नको असा निर्णय घेतला. गांधी घराण्यासोबत घट्ट नातं असलेल्या माखनलाल फोतेदार, अर्जुनसिंह यांनी आपला कौल हा नरसिंहरावाच्या बाजूने असल्याचं जाहीर केल.

हेही वाचा: CM ठाकरे देणार होते राजीनामा पण, शरद पवारांनी थांबवलं?

त्यानंतर मतदान झालं आणि नरसिंहरावांना शरद पवारांपेक्षा ३५ मते अधिक पडली आणि नरसिंहराव भारताचे पंतप्रधान झाले. शरद पवार यांनी पतंप्रधान व्हावं यासाठी महाराष्ट्रासोबत इतर राज्यातील लोकांचाही पाठिंबा होता पण काँग्रेस पक्षातून हवा तसा पाठिंबा मिळाला नाही. त्यावेळचा एक किस्सा असा सांगितला जातो की, नरसिंहराव तेव्हा प्रकृतीच्या कारणाने राजकारणातून बाहेर पडले होते. शरद पवार जर का पंतप्रधान झाले तर ते दीर्घकाळापर्यंत नेतृत्व करतील हेच लक्षात ठेवून आपण नरसिंहरावाच्या पारड्यात अधिक वजन टाकावे, असं सोनिया गांधीना सुचवण्यात आलं होतं. नरसिंहरावानंतर आपणच असा उद्देश डोळयांसमोर ठेवून माखनलाल फोतेदार,अर्जुनसिंह नरसिंहरावाच्या नावाला पाठिंबा दिला होता, असा हा किस्सा आहे. पुढे नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळात शरद पवार हे संरक्षणमंत्री झाले. पण तेव्हा मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलींनंतर महाराष्ट्रातली परिस्थिती हाताळण्यासाठी पंतप्रधान नरसिंह राव यांनी शरद पवारांना पुन्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठवलं.

Web Title: Sharad Pawar Was Lost To P V Narsimharao In Competition For Prime Minister Maharashtra Political Crisis Updates Eknath Shinde

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..