शिवसेनेच्या ‘या’ खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने खळबऴ

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 September 2019

शेतकरी आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.  

उस्मानाबाद : शेतकरी आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.  

दरम्यान, आर्थिक फसवणुकीमुळे शेतावर आलेली जप्तीची कारवाई व मानहानीमुळे तालुक्यातील कसबे तडवळे येथील दिलीप ढवळे या शेतकऱ्याने 12 एप्रिल रोजी आत्महत्या केली होती. या संपूर्ण प्रकरणाला शिवसेनाचे खासदार ओमराजे निंबाळकरांसह तेरणा कारखान्याचे संचालक, जयलक्ष्मी शुगर्सचे संचालक व वसंतदादा बँकेचे संचालक जबाबदार असल्याची चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीचा हस्ताक्षर तज्ज्ञांचा सकारात्मक अहवाल प्राप्त झाला आहे. यावरून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह वसंतदादा बँकेचे चेअमरन तथा भाजप नेते विजय दंडनाईक व वरील तीनही संस्थांच्या संचालकांविरुद्ध ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली : शिराळ्यात भाजपची ताकद वाढली; सत्यजित देशमुख भाजपमध्ये

या बाबींमुळे राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे. कसबे तडवळे येथील शेतकरी दिलीप शंकर ढवळे यांनी 12 एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत ओमराजे निंबाळकर, तेरणा साखर कारखाना, वसंतदादा बँक व जयलक्ष्मी शुगर्सच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी संगनमताने आर्थिक फसवणूक केल्याने शेतजमिनीचा लिलाव निघाला आणि मोठी मानहानी झाल्याचे नमूद केले होते. तेव्हा पोलिसांनी ढवळे यांनी लिहिलेली चिठ्ठी हस्ताक्षर तज्ञांकडे पडताळणीसाठी पाठवली होती. त्याचा सकारात्मक अहवाल प्राप्त होताच ढोकी ठाण्यातील सपोनि बी.जी.वेव्हळ यांनी सरकारी तक्रारदार हाेऊन फिर्याद दिली आहे.

‘सुधारतील असे वाटले होते पण, गणेश नाईक पुन्हा चुकले’

या फिर्यादीत त्यांनी म्हटले की, आरोपी ओमप्रकाश राजेनिंबाळकर, वसंतदादा बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक, तेरणा कारखान्याचे तत्कालीन चेअरमन आनंदीदेवी राजेनिंबाळकर, रमाकांत टेकाळे, शाहुराजे धाबेकर, शेषेराव चालक यांच्यासह तेरणाचे तत्कालीन सर्व संचालक, जयलक्ष्मी शुगर्सचे तत्कालीन सर्व संचालक व वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे तत्कालीन सर्व संचालक यांनी कटकारस्थान करून शेतकरी दिलीप ढवळेंच्या शेतावर कर्ज उचलून या कर्जाच्या परतफेडीची तेरणा साखर कारखान्याने हमी घेतली, परंतु कारखान्याने कर्जफेड न केल्याने वसंतदादा बँकेने ढवळे यांची जमीन लिलावात काढली. ढवळे यांचे जयलक्ष्मी शुगर्सकडून ऊस वाहतुकीपोटी येणे असलेल्या बिलाची 2 लाख 93500 रुपयांची रक्कमही त्यांना दिली नाही. यातच थकीत कर्जापोटी बँकेने ढवळे यांच्या शेताचा लिलाव काढला. एकंदरीत ढवळे यांचा अन्यायाने विश्वासघात, बँकेकडून फसवणूक करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याने त्यांनी गळफास घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार कलम 306, 406, 409, 420, 120 (ब)व 34 भादंविप्रमाणे ढोकी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv sena mp omraje nimbalkars against fir in osmabanad