
५ हजारांहून अधिक रुबिक्स क्युब्ज वापरून शिवरायांची प्रतिमा; एनडी स्टुडिओमध्ये विश्वविक्रम
मुंबई : 'महाराष्ट्र दिना'निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत ५ हजार पेक्षा जास्त रुबिक्स क्युब्स वापरून त्यांची भव्य प्रतिमा साकारत विश्वविक्रम करण्यात आला आहे. एनडी स्टुडिओमधील 'महा उत्सव' दरम्यान मुंबई, रायगड , पुणे व नवी मुंबई येथील ५ हजार २३ शालेय विद्यार्थी आणि कलाकारांनी १३ बाय १२ फुटांची प्रतिमा तीन तासांमध्ये साकारली. 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रतिमा बनवण्यात आली. 'एन डी आर्ट वर्ल्ड' आणि सहआयोजक 'व्हर्सैटाईल एज्युकेशन सिस्टीम' यांच्या पुढाकाराने हा विश्व विक्रम करण्यात आला.
हेही वाचा: छत्रपती शिवाजी महाराज चौक पोलिसांकडून वाऱ्यावर
महाराष्ट्राच्या महान परंपरेचा वारसा जपणाऱ्या 'महा उत्सव'ची १ मे रोजी सांगता झाली. महामेळा, महाकला, महाखेळ, महासंस्कृती, महास्वाद, महाव्यवसाय आणि महागौरव असे महाराष्ट्राच्या महान परंपरेचे सप्तरंगी इंद्रधनुष्य महाराष्ट्रात अवतरले. श्रेयसी वझे आणि मंदार आपटे यांच्या संकल्पनेने बनलेले 'महाराष्ट्र गीत' यावेळी सादर करण्यात आले. तर गायक नंदेश उमप यांचा 'मी मराठी' हा सुरेल कार्यक्रम आणि मराठ्यांची गौरव गाथा मांडणाऱ्या 'महा नाट्य' यांनी रसिकांची मने जिंकली. या महोत्सवाला देशातील वेगवान कृषी आणि मत्स्यपालन कंपनी 'ए एस अॅग्री' आणि 'अॅक्वा एलएलपी' यांचे सहकार्य लाभले आहे. व्हर्टिकल फार्मिंग क्लस्टर प्रकल्पाद्वारे हळदीच्या क्रांतिकारक उत्पादनाबाबत जागरूकता करणारा प्रकल्प यावेळी सादर करण्यात आला.
हेही वाचा: VIDEO : बघावं ते नवलंच...रुबिक्स क्यूबचा 'हा' तर बादशाह!
"नितीन चंद्रकांत देसाई यांच्याद्वारे आयोजित हा महा उत्सव कलाकारांचा व कलेचा महाकुंभ आहे. या महाउत्सवमध्ये कित्येक कलाकारांना व्यासपीठ मिळाले, रोजगार मिळाला. विशेष म्हणजे सर्वांना या ठिकाणी प्रवेश विनामूल्य देऊन या उत्सवाचा लाभ घेता आला. त्याबद्दल नितीन देसाई यांचे मी कौतुक करतो व त्यांना शुभेच्छा देतो." असे मत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले
''टाळेबंदीनंतर हजारो कलाकारांना प्रोत्साहन देत त्यांना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावं, रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने महा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक कलाकारांची स्वप्ने साकार होत असल्याने या उत्सवाचा उद्देश साध्य होत असल्याचं पाहून समाधान वाटतं.'' अशा भावना ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी व्यक्त केल्या. 'महाकला' उपक्रमाद्वारे राज्यातल्या विविध लोककलांचे मनोहारी दर्शन घडले. कलाकार सचिन जुवाटकर यांनी उद्योगपती रतन टाटा यांचं साकारलेलं चित्र चर्चेचा विषय ठरलं. मोती, तुळस, रक्तचंदन आदी गोष्टींचा वापर करत हे चित्र त्यांनी तयार केलं आहे. हे चित्र पाहताच सचिन यांना टाटा फाऊंडेशकडून फोन आला असून लवकरच ते रतन टाटा यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत.
Web Title: Shivaji Artwork From 5 Thousand Rubicks Cubes World Record In N D
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..