आमची खुर्ची बदलली, आता सरकारची खुर्ची जाणार : संजय राऊत

Shivsena-Sanjay-Raut
Shivsena-Sanjay-Raut

शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून दररोज चर्चेत राहत आहेत. रविवारी (ता.17) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ते बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथे गेले होते.

त्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला. ''संसदेत आमची खुर्ची बदलली आहे, त्यामुळे आता आम्ही सरकारचीही खुर्ची बदलणार आहोत. सरकारने आमच्या खुर्च्या संसद भवनाबाहेर जरी ठेवल्या तरी आमचा विरोध यापुढेही सुरूच राहील. कारण आम्ही स्ट्रीट फायटर आहोत. सत्ता घेणारे आणि सत्ता देणारे तुम्ही कोण? असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. 

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनादिवशीच शिवसेना 'एनडीए'तून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली. त्यावर संजय राऊतांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, ''सेनेला एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण? शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढणारा निर्णय लल्लू-पंजू घेऊ शकत नाहीत. एनडीए ही कोणा एका पक्षाच्या मालकीची नाही. उलट भाजपनंच शिवसेनेला विरोधी पक्षात ढकललं आहे. सेनेला एनडीएतून बाहेर काढण्याअगोदर जर त्यांनी आमच्यासोबत चर्चा केली असती, तर 'दूध का दूध, पानी का पानी' ते स्पष्ट झालं असतं. यावरूनच कोण खोटं बोलतंय ते दिसून येतं.'' 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएची बैठका घेतल्याची चर्चा आहे, याबाबत बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी एनडीएच्या बैठका कधी घेतल्या हे माहित नाही. ते एनडीए प्रमुख आहेत का? अशी कोपरखळीही त्यांनी पंतप्रधानांना मारली आहे. 

राऊत पुढे म्हणाले, ''महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करणार आहे. यासाठी दिल्लीत आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत आहोत. यामुळे कुणाच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही. काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी मेहबूबा मुफ्तींसोबत हातमिळवणी करताना त्यांनी आम्हाला विचारलं नव्हतं. सध्या दिल्लीतील हवा अशुद्ध झाली आहे. आम्ही ती शुद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत.''

रविवारी सकाळी राऊत यांनी माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्र सोडले होते. फडणवीस यांनी स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र बाळासाहेबांनी आपणा सर्वांना दिला, अशा आशयाचे ट्विट केले. या ट्विटची दखल घेत शिवसेना नेते राऊत यांनीही त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले.

राऊत म्हणाले, ''उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना वचन दिले आहे. त्यानुसार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे शिवसेनेला कुणी स्वाभिमान शिकवू नये. बाळासाहेबांची शिकवण असणारे शिवसैनिक स्वाभिमान आणि हिंदुत्वाबद्दल योग्यवेळी उत्तर देतील.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com