Loksabha Election : शाहू महाराज यांच्या नावावर एकमत; धंगेकर, वाघेरे यांना उमेदवारी शक्य; दोन दिवसांत घोषणा

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘सिल्वर ओक’वर प्रत्यक्ष भेट झाली.
shrimant chhatrapati shahu maharaj
shrimant chhatrapati shahu maharajsakal

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या आज झालेल्या बैठकीत कोल्हापूर लोकसभा मतदार संघ काँग्रेसला देण्यावर; तर सांगली शिवसेना ठाकरे गटाकडे देण्यावर एकमत झाल्याचे समजते. कोल्हापुरातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, तर सांगलीतून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारीही निश्‍चित करण्यात आली.

या बैठकीत पश्‍चिम महाराष्ट्रातील एकूण ११ जागा वाटपाचे सूत्रही निश्‍चित करण्यात आल्याचे समजते. काही जागांवरील उमेदवारही निश्‍चित करण्यात आले असून, दोन दिवसांत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या नावांची व जागांची घोषणा करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरापासून महाविकास आघाडीतील घटक पक्षांत चर्चांची खलबते सुरू होती; पण वंचित आघाडीने मागितलेल्या जागा, कोल्हापूरवर ठाकरे गटाने सांगितलेला हक्क, ‘एकला चलो रे’चा स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांचा नारा आणि सांगलीसाठी ठाकरे गटाची आग्रही भूमिका यामुळे निर्णय होत नव्हता.

याबाबत आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘सिल्वर ओक’वर प्रत्यक्ष भेट झाली. यावेळी खासदार अनिल देसाई हेही उपस्थित होते, तर ‘वंचित’चे ॲड. प्रकाश आंबेडकर व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात ऑनलाइन सहभागी झाले होते.

दीर्घ चर्चेनंतर ‘वंचित’ने सांगली मतदार संघावरील हक्क सोडताना ही जागा ठाकरे गटाला द्या, पण त्याठिकाणी चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील, अशी मागणी लावून धरली. त्यावर चर्चा होऊन पाटील यांच्या उमेदवारीसह हा मतदार संघ ठाकरेंना देण्यास मान्यता देण्यात आल्याचे समजते. पाटील यांची उमेदवारीच जाहीर होण्याची शक्यता झाल्यानंतर या मतदार संघातून लढण्यास तयार असलेले विशाल पाटील यांनी थांबण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

कोल्हापूरची जागा शिवसेनेने जिंकल्याने ती जागा आपल्यालाच मिळावी यासाठी ठाकरे आग्रही होते. शाहू महाराज यांना उमेदवारी द्या पण जागा आम्हाला द्या अशीही तयारी त्यांनी दर्शवली होती. पण, स्वतः शाहू महाराज शिवसेनेच्या तिकिटावर लढायला तयार नाहीत आणि ठाकरे गटाकडे दुसरा कोण प्रबळ उमेदवार नाही, ही वस्तुस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्यास ठाकरे तयार झाल्याचे समजते.

त्यानंतर या जागेवर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचेही नाव निश्‍चित करण्यात आले. तत्पूर्वी जिल्ह्यातील काँग्रेसच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांशी राज्य पातळीवर काँग्रेस नेत्यांनी चर्चा करून शाहू महाराज हे उमेदवार चालतील का, अशी विचारणा केली. त्याला सर्वांनी मान्यता दिल्याचे समजते.

दोन दिवसांत अधिकृत घोषणा

विदर्भ, मराठवाड्यात काही जागांवर शिवसेना ठाकरे गट व वंचितमध्ये रस्सीखेच सुरू आहे. या जागांचा तिढा सुटल्यानंतर येत्या दोन दिवसांत राज्यातील ४८ मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार व पक्षनिहाय मिळालेल्या जागांची घोषणा करण्यात येणार आहे.

माढ्यात तिढा कायम

माढ्यातून माजी मंत्री महादेव जानकर तयार असतील, तर त्यांना ही जागा द्यायचे ठरले; पण त्याचवेळी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर व रामराजे यांच्यातील वाद पाहता भाजपने उमेदवार बदलला नाही, तर रामराजे यांची उमेदवारी निश्‍चित आहे. मात्र उमेदवार बदलला, तर रामराजे यांच्याऐवजी अन्य कोणाला तरी रिंगणात उतरण्यात येणार आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील जागा व संभाव्य उमेदवार

  • पुणे - काँग्रेस - आमदार रवींद्र धंगेकर

  • मावळ - शिवसेना ठाकरे गट - माजी सभापती संजोग वाघेरे

  • शिरूर - राष्ट्रवादी (शरद पवार गट) - खासदार डॉ. अमोल कोल्हे

  • बारामती - राष्ट्रवादी (शरद पवार गट) - खासदार सुप्रिया सुळे

  • सातारा - राष्ट्रवादी (शरद पवार गट) - खासदार श्रीनिवास पाटील किंवा त्यांचे पुत्र सारंग पाटील

  • सोलापूर - काँग्रेस - आमदार प्रणिती शिंदे

  • सांगली - शिवसेना- ठाकरे गट - चंद्रहार पाटील

  • हातकणंगले - स्वाभिमानीसाठी जागा सोडली

  • कोल्हापूर - काँग्रेस - श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com