
तात्या लांडगे
सोलापूर : मराठा व कुणबी दोघेही एकच असल्याच्या ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत. सरकारने मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे- पाटील हे आज (बुधवारी) मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. त्यांच्यासमवेत प्रत्येक जिल्ह्यातून किती मराठा बांधव मुंबईत येतील, याची अंदाजे आकडेवारी राज्याच्या गुप्तचर विभागाने (एसआयडी) प्रत्येक शहर- जिल्ह्याच्या पोलिस प्रमुखांकडून घेतली आहे.
मराठा आरक्षणाबरोबरच अन्य काही मागण्यांसाठी जरांगे- पाटील मुंबईत २९ ऑगस्टपासून आमरण उपोषण करणार आहेत. त्यासाठी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांना साथ देण्याची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक शहर- जिल्ह्यातील अनेक मराठा नेत्यांनी आपल्या भागातून किती गाड्या व किती लोक मुंबईला निघतील, हे जाहीर केले आहे. याशिवाय राज्याच्या गृह विभागाने पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षक कार्यालयातूनही मुंबईत २९ ऑगस्ट रोजी किती मराठा बांधव येतील, याचा अंदाज घेतला आहे. आंदोलकांच्या संख्येचा अंदाज घेऊन मुंबईतील वाहतूक व्यवस्था, बंदोबस्तासाठी लागणारे पोलिस याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता गृह विभागाकडून घेतली जात आहे.
सोलापुरातून जाणार ६००० मराठा बांधव
सोलापूर शहरातून अंदाजे १५० ते २०० आणि ग्रामीणमधील साडेपाच ते सहा हजार मराठा बांधव मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुंबईला जाणार आहेत. शहर व ग्रामीण पोलिसांनी त्यासंबंधीची माहिती गृह विभागाला कळविली आहे. पण, मराठा नेत्यांनी २५ हजारांहून अधिक गाड्या मुंबईला जातील, असे स्पष्ट केले आहे.
बाहेरील जिल्ह्यांतून मागविले पोलिस
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आंदोलक २९ व ३० ऑगस्ट या दोन दिवसांत मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार आहेत. दुसरीकडे, उद्यापासून (बुधवारी) गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने अन्य काही जिल्ह्यांतून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविली आहे. त्यात सोलापूर ग्रामीण पोलिस दलाकडील २५ अंमलदार मुंबईला बंदोबस्तासाठी गेले आहेत. याशिवाय अन्य जिल्ह्यांतील अंमलदार, अधिकारी देखील मुंबईत दाखल झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.