...तर रोजचा दिवस मराठी भाषेचा असेल!

Marathi-Language
Marathi-Language

मराठी भाषा शिक्षणात नाही, तर लिखाणातही नाही, अशा भिंती ज्यांनी मानल्या नाही; नोकरी आणि व्यवसायासाठी शिक्षण कोणत्याही शाखेचं घेतलं, तरी मराठीची कास ज्यांनी सोडली नाही; साहित्यविश्‍वात मुशाफिरी करून सकस मराठी साहित्यविश्‍व फुलवलं, कवितांचं आकाश निर्माण केलं, अशा मुशाफिरांचं मनोगत. खास मराठी भाषा दिनानिमित्त...

वैभव जोशी (कवी)
मराठी साहित्यापेक्षा घरात शेक्‍सपियर आणि इंग्रजी साहित्याचं वाचन अधिक होतं. मराठी आणि शास्त्रीय संगीत वाजत असायचं. ते लहानपणापासून संस्कार होते. मी सोलापुरात वाढलो. औरंगाबादला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी गेलो. तिथं हायफाय वातावरण आणि मी गावाकडचा. त्यामुळे त्या वातारणापासून बाजूला राहायला लागलो. मग करायचं काय? तर कवितेत मन रमवू लागलो. मराठी साहित्याचं वाचन या काळात झालं. संवेदनशील मन असल्यानं एकांकिका लिहिल्या. एका इन्स्टिट्यूटमध्ये लेक्‍चररची नोकरी केली. मग पुण्यात आलो आणि इथंच स्थायिक व्हायचं पक्कं झालं. शिक्षण आणि स्वभावाच्या विरुद्ध असूनही एका मार्केटिंग कंपनीत नोकरी करू लागलो. नंतर कॅनन कंपनीत मॅनेजरपदापर्यंत पोचलो. कवितेचं लिखाण सुरू होतं. पुढं एका मोठ्या इंग्रजी दैनिकाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी मला बोलावलं.

मुलाखत सुरू झाली. त्यात एकही प्रश्‍न न विचारता मला कविता म्हणण्यास सांगितलं गेलं. नोकरी पक्की झाली. काही वर्षांत डेप्युटी चीफ मॅनेजरपदापर्यंत पोचलो होतो. तोपर्यंत सिनेमांसाठी कविता लिहिणं सुरू झालं होतं. तरीही घुसमट होतेय, असं वाटायचं. एक दिवस एका सिनेमासाठी गाणं हवं होतं, ते मी दुपारच्या जेवणाच्या सुटीत लिहिलं. ऑफिसमध्ये गेलो आणि राजीनामा दिला. त्या वेळी माझा दरमहा पगार होता एक लाख रुपयांहून अधिक; पण कविता स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून निर्णय घेतला आणि पुढचा प्रवास सुरू झाला. संत तुकाराम, सावता माळी आणि सर्वच संतांचं साहित्य आपल्याकडं आहे. त्याला धरून आजचा कवी लिहितो आहे, त्यानं लिहिलेल्या कवितांच्या कार्यक्रमांना हाउसफुल्ल गर्दी होते. मराठीला कशाचाच धोका नाही, याचेच हे द्योतक आहे.

लक्ष्मीकांत देशमुख (माजी संमेलनाध्यक्ष)
माझं शिक्षण उस्मानाबादेत जिल्हा परिषदेच्या शाळेत मराठी माध्यमातून झालं. पुढचं शिक्षण विज्ञान शाखेत झालं. पण, वाचनाची आवड ही लहानपणापासून. माझी पहिली कथा मी सातवीत असताना ‘साधना’ साप्ताहिकामध्ये छापून आली होती. माझ्या वाचनात सातत्य राहिलं. मराठी साहित्याचा खूप आस्वाद मी घेतला. सनदी अधिकारी होण्यापूर्वी बॅंकेत नोकरी केली. अर्थशास्त्रातही पदवी शिक्षण पूर्ण केलं. पण, साहित्यवाचनाची आस वाढत राहिली. लौकिक अर्थानं मराठी साहित्याचं शिक्षण घेतलं नाही. पण, वाचनानं मला खूप समृद्ध केलं. विज्ञान शाखेचा विद्यार्थी असल्यानं लिखाणात तर्कशुद्धता आली. आजच्या परिस्थितीचा विचार केला, तर शहरी भागाचा तोंडवळा इंग्रजी झाला आहे. मराठीचं लिखाण कमी झाल्यासारखं वाटतं. पण, ग्रामीण भागात आजही कसदार, सकस साहित्यनिर्मिती सुरू आहे. म्हणून सर्वच शाळांमध्ये मराठी शिकविण्याची सक्ती करावी, यासाठी आम्ही चळवळ करीत आहोत. सरकारही त्यासाठी प्रयत्न करीत आहे. मराठी भाषा प्राधिकरण, मराठी विद्यापीठ निर्माण झालं, तर मराठीच्या वैभवात भरच पडेल.

प्रा. मिलिंद जोशी (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद)
माझा जन्म मराठवाड्यात शेतकरी कुटुंबात झाला. पण, वडिलांनी मराठी साहित्याची गोडी लावली. शाळेत गती असल्यानं विज्ञान शाखेकडं गेलो. मग इंजिनिअरिंग वाट्याला आलं, तरीही वाचन सुटलं नाही. पदवी घेतल्यानंतर पोटाचा प्रश्‍न होता. त्यासाठी पुण्यात मोठ्या बांधकाम व्यावसायिक कंपनीत नोकरी सुरू झाली. वाचनासाठी वेळ मिळत नव्हता, घुसमट होऊ लागली होती. एक दिवस विचार करून नोकरी सोडली आणि शिक्षण क्षेत्र नोकरीसाठी निवडलं. या प्रवासात साहित्याची, वाचनाची नाळ कधीच तुटली नाही. दहावीनंतर शिक्षणात आमचा मराठी भाषेशी संबंध आला नाही. पण, साहित्यानं ही नाळ कधीच तुटू दिली नाही. मी अभियंता आहे, मी डॉक्‍टर आहे, मी आर्किटेक्‍ट आहे, माझा मराठी भाषेशी काय संबंध, अशा भिंती आपण स्वत:च घालून घेतल्या आहेत. मराठी भाषा ही आपल्या जीवनाचा श्‍वास आहे, असा विचार सर्वांनी केला, तर आपल्याला कधी मराठी भाषा दिन वेगळा साजरा करावा लागणार नाही. रोजचा दिवस मराठीचा असेल.

विश्‍वास पाटील (माजी सनदी अधिकारी, प्रख्यात लेखक)
माझं मराठीचं खरं शिक्षण वर्गाबाहेर झालं आहे. पण, गोडी ही कोल्हापूर जिल्ह्यातील नेर्ले या माझ्या गावानं लावली. तिथं रामायण, महाभारत वाचलं जायचं. ते ऐकायला मिळायचं. त्यातून मराठी भाषेची गोडी लागली. दहावीत असताना मी एक कथा लिहिली होती, तिला राज्यस्तरावर क्रमांक मिळाला. वयाच्या सतराव्या वर्षी ‘आंबी’ कादंबरी लिहिली, तीही नावाजली गेली. मला आचार्य अत्रे यांच्या लिखाणाचं वेडच होतं. त्यांची काही नाटकंही माझी तोंडपाठ होती. अण्णा भाऊ साठे यांच्याही लेखनाचा प्रभाव होता. त्यांच्यामुळेच लेखक व्हावं वाटलं. मराठी भाषेविषयी चिंता आज व्यक्त केली जाते. पण, मला या भाषेला कोणताच धोका वाटत नाही. आज तर रोजगाराच्या सर्व संधी मराठी माध्यमातून मिळू शकतात. स्पर्धा परीक्षाही मराठी माध्यमातून देता येतात. त्यामुळं मराठी भाषेचं वैभव भविष्यातही कायम राहील.

अच्युत गोडबोले (आयटीतज्ज्ञ, प्रख्यात लेखक)
सोलापूरमध्ये मराठी माध्यमात शिक्षण झालं. पण, पुढं व्यावसायिक शिक्षण घेताना मराठी विषय नसला, तरी मराठी भाषेवरील प्रेम कमी नव्हतं. आई-वडील, बहिणीकडून मराठीचा गोडवा माझ्यात रुजविला गेला होता. आयटी उद्योगात काम करताना इंग्रजी भाषेवरून अपमान झाला होता. त्यामुळं इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलं. साधारणपणे बत्तीस वर्षं या उद्योगांत गेली. या काळातही मराठी साहित्य साथीला होतंच. नंतर लिखाण करावं, असं वाटू लागल्यानंतर नोकरी सोडली आणि पूर्णवेळ लिखाण करू लागलो. इंग्रजी साहित्याचं वाचनही खूप केलं. त्या भाषेत जे चांगलं वाटलं, ते मराठीत आणावं वाटलं. त्याला मराठी वाचकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आजही असंख्य वाचक माझ्यावर प्रेम करतात. मराठी भाषेवरील प्रेमाचंच हे संचित आहे. एखादा विषय आवडला, की त्याच्या खोलात जाऊन त्यावर मराठी भाषेत सर्वंकष; पण अगदी सोप्या भाषेत लिखाण करणं मला आवडतं. वाचकांनाही ते भावतं. मराठी भाषा ज्ञान भाषा व्हायला हवी, असं आपण म्हणतो. असं व्हायचं असेल, तर इंग्रजीसह अन्य भाषांमधील साहित्य मराठीत आलं पाहिजे. त्यासाठी काही प्रमाणात तरी योगदान देऊ, असा विचार करून आजपर्यंत लिहीत आलो आहे.
(शब्दांकन - संतोष शाळिग्राम)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com