आरेतील झाडं, भाजपमधली 'मुळं' मुख्यमंत्र्यांनी उखडली; राष्ट्रवादीचा ट्विटर टोला!

BJP-NCP-Vidhansabha-2019
BJP-NCP-Vidhansabha-2019

विधानसभेच्या रणधुमाळीमुळे सगळीकडे राजकीय वातावरण पसरले आहे. प्रतिस्पर्धी एकमेकांवर कुरघोड्या करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्या राज्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच खरी घमासान सुरू असल्याचे चित्र दिसून येते.

जाहीर सभा आणि यात्रांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असताना ही लढाई आता सोशल झाली आहे. भाजपने 'रम्याचे डोस'द्वारे राष्ट्रवादीला टार्गेट केलं आहे. तर राष्ट्रवादीही भाजपला कार्टूनच्या माध्यमातून जशास तसे उत्तर देत आहे. या दोन पक्षांच्या लढाईत काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर पक्ष हे एका बाजूला पडले असल्याचे दिसून येते. 

सध्या राज्यात एकच विषय चर्चिला जात आहे, तो म्हणजे आरे जंगल. आरे हे जंगल नव्हते, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्यानंतर राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य बनवले आहे. आज राष्ट्रवादीने त्यांच्या ट्विटरच्या ऑफिशियल पेजवरून एक कार्टून अपलोड केले आहे. यामध्ये 'इथे माझं जंगलराज आहे. तुम्ही आरे बचाओ करत बसलात, मी तर पक्षातली जुनी खोडंही सोडली नाहीत,' असे कॅप्शन या फोटोला दिलं आहे.

फोटोमध्ये वृक्षतोड केल्यानंतर दिसणारी झाडाची खोडे दाखविण्यात आली असून यावर राज पुरोहित, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, विनोद तावडे, प्रा. मेधा कुलकर्णी या भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांचे मुखवटे लावण्यात आले आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपातील एक पाठमोरी व्यक्ती हातात वूडन कटर घेऊन उभी असलेली दिसत आहे. 

तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या ट्विटर पेजवर असाच आणखी एक फोटो अपलोड केला आहे. यामध्ये वृक्षतोडीमध्ये पाडण्यात आलेल्या झाडांपासून बनविलेली मेट्रो दाखविण्यात आली आहे.

'आरे वृक्षतोडीबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीचा आदेश दिला. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत, पण हा विषय सर्वोच्च न्यायालयात येण्यापूर्वीच सप्ताहांत गाठून सरकारने रात्रीच्या अंधारात आवश्यक तेवढी वृक्षतोड करुन घेतली आहे. सरकारची ही कृती निषेधार्ह आहे.' असे मत खासदार सुळे यांनी ट्विटरवर व्यक्त केले आहे. 

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com