esakal | शरद पवार तुम्हीच महाराष्ट्राला हिशेब द्या; अमित शहांचे आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवार तुम्हीच महाराष्ट्राला हिशेब द्या; अमित शहांचे आव्हान

अमित शहा म्हणाले, ‘शरद पवारसाहेब आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत. आम्ही पै अन् पैचा हिशेब घेऊन जनतेपुढे जातो. तुम्ही हिशेब मागत आहात तर, आम्ही हिशेब देतो. केंद्रात आणि राज्यात तुमचेच सरकार होते. तुम्ही महाराष्ट्राला काय दिले? आम्हाला हिशेब द्या.’

शरद पवार तुम्हीच महाराष्ट्राला हिशेब द्या; अमित शहांचे आव्हान

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सोलापूर : ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आम्हाला हिशेब विचारत आहे. आम्ही त्यांनाच आव्हान देतो की त्यांनी पंधरा वर्षे राज्यात आणि दहा वर्षे केंद्रात सत्ता भोगली आहे. तेव्हा महाराष्ट्राला काय दिले याचा त्यांनी आम्हाला हिशेब द्यावा. तसेच विधानसभा निवडणुकीपुर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शरद पवार यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर आपली भूमिका स्पष्ट करावी,’ असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सोलापुरातील सभेत दिले.

तिघांचा भाजप प्रवेश

गृहमंत्री शहा यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसचे कोल्हापुरातील धनंजय महाडिक आणि उस्मानाबादमधील राणाजगजितसिंह यांनी तर, सातारा जिल्ह्यातील काँग्रेस नेते जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अमित शहा यांनी तिन्ही नेत्यांच्या हातात भाजपचा झेंडा देऊन त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केले. गेल्या काही दिवसांपासून या तीन नेत्यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा होती. आज, सोलापुरातील भव्य सभेत तीन दिग्गज नेत्यांनी प्रवेश केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला विशेषतः राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील यात्रेचा समारोप आज सोलापुरातील सभेने झाला. या टप्प्यात ९० विधानसभा मतदारसंघांतून ही यात्रा झाली. या टप्प्यात १२० जाहीर सभा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत दिली.

उदयनराजे, शिवेंद्रराजे काय पोरं आहेत का? : चंद्रकांत पाटील

अजित पवार म्हणतात, ‘आता चित्र लवकरच बदलेल’

कलम ३७० हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या एकता आणि अखंडतेचा संदेश दिला आहे, असे सांगून अमित शहा यांनी भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले, ‘२०१४-१९ हा फडणवीस यांचा कार्यकाळ महाराष्ट्रासाठी सुवर्णअक्षरांनी लिहावा असावा आहे. पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीने भ्रष्टाचार करून महाराष्ट्राला मागे खेचले. पण, नरेंद्र-देवेंद्र जोडीने महाराष्ट्राला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणले. काँग्रेस-राष्ट्रवादी केवळ घराणेशाहीला मानते. लोकशाहीला नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झाले. त्यांचे पुतणे अजित पवार यांनी जलसंपदा खात्यातून सिंचनासाठी ७४ हजार कोटींची तरतूद केली. पण, एक थेंबही पाणी मिळाले नाही. पण, देवेंद्र फडणवीस यांनी ८ हजार कोटींमध्ये २२ हजार गावांत पाणी दिले. मी हेलिकॉप्टरमधून काही गावांचा दौरा केला आहे. दोन्ही काँग्रेसनी भ्रष्टाचाराशिवाय काहीच केले नाही. तुम्हाला आदर्शचा गैरव्यवहार आठवतोय काय? गेल्या पाच वर्षांत एका रुपयाचा भ्रष्टाचार झाला नाही. काँग्रेस राष्ट्रवादीचे मुंबईत समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आणि इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची केवळ चर्चा केली. मुख्यमंत्री फडणवीस त्यांनी दोन्ही स्मारकांचे काम मार्गी लावले. महाराष्ट्रात १९७२नंतर पहिल्यांदाच पाच वर्षे पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस एकमेव नेते आहेत. फडणवीस यांनी राज्याला स्थैर्य दिले.’

सोलापुरातील भाजपच्या मेगा भरतीवर ‘पाणी’

‘शरद पवार, पृथ्वीराज चव्हाणच शिल्लक राहतील’

अमित शहा म्हणाले, ‘शरद पवारसाहेब आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत. आम्ही जनतेपुढे पै अन् पैचा हिशेब घेऊन जनतेपुढे जातो. तुम्ही हिशेब मागित आहात तर, आम्ही हिशेब देतो. केंद्रात आणि राज्यात तुमचेच सरकार होते. तुम्ही महाराष्ट्राला काय दिले? आम्हाला हिशेब द्या.’ शरद पवार इथे आल्यानंतर तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारा, असे त्यांनी उपस्थित जनतेला सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना माझ्यासारखेच नेते रोखत आहेत. त्यांनी सगळा दरवाजा उघडला तर, काँग्रेस-राष्ट्रवादीत शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या व्यक्तिरिक्त कोणा शिल्लक राहणार नाही.’

शहा म्हणाले, ‘कलम ३७० हटविण्याचे धाडस नरेंद्र मोदी यांच्याशिवाय एकाही पंतप्रधानाने दाखवले नाही. राहुल गांधी, शरद पवार यांनी निवडणुकीपूर्वी ३७०वर आपली भूमिका स्पष्ट करावी.’ कलम ३७०वर राहुल गांधी तुम्ही कोणत्या देशासाठी बोलत आहात? तुमचा उद्देश काय आहे?,  असे प्रश्न उपस्थित करून शहा म्हणाले, ‘तुम्ही बोलत आहेत तेच पाकिस्तान बोलत आहे. त्यामुळे तुमचा उद्देश स्पष्ट करा आणि निवडणुकीपूर्वी सरकारच्या निर्णयावर तुमची भूमिका स्पष्ट करा.’

मुख्यमंत्र्यांकडून ‘सरदार’ उल्लेख

नापास काँग्रेस नेते आता ईव्हीएमवर खापर फोडत आहेत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. फडणवीस म्हणाले, ‘जनसंवाद यात्रा ही संवाद यात्रा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही यात्रा होत आहेत. पण, त्यांना प्रतिसाद नसल्यामुळे त्या मंगल कार्यालयांमध्ये आयोजित होत आहे.’ सोलापुरात आज सकाळी लावण्यात आलेल्या फलकांमध्ये गृहमंत्री अमित शहा यांचा उल्लेख सरदार अमित शहा, असा उल्लेख करण्यात आला होता. दुपारी ही पोस्टर्स उतरवण्यात आली. पण, जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात गृहमंत्री शहा यांचा उल्लेख सरदार असा केला.

पावसाचा अडथळा

जाहीर सभेच्या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा यांचे आगमन मोठ्या शक्तीप्रदर्शनाने झाले. उघड्या वाहनातील रॅलीद्वारे अमित शहा इतर नेत्यांसह रॅलीने आगमन झाले. दुपारपासून सभा स्थळी आणि सोलापूर परिसरात पावसाने मोठी हजेरी लावली होती. त्यामुळे सभेला अपेक्षित गर्दी झाली नसल्याचं दिसत होतं. मुसळधार पावसात भाजपचे कार्यकर्ते जवळपास तीन तास सभा स्थळी बसून होते. पावसाचा जोर वाढल्यानंतर अनेकांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या तर, सभास्थळावरील मागील बाजूचे कार्यकर्ते मैदानातून बाहेर जाताना दिसत होते.

loading image
go to top