ना भालके, ना शिंदे जिल्ह्याच्या नेतृत्वाचे झाले वांदे (Video)

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 December 2019

माढ्याचे आमदार बबनराव शिंदे सलग सहाव्यांदा आमदार झाले आहेत. ज्येष्ठत्वाच्या मुद्यावर त्यांना संधी मिळेल अशी शक्‍यता होती. आमदार शिंदे यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे त्यांनी मंत्रिपदासाठी फारशी उत्सुकता दाखविली नसल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. आमदार भालके हे राष्ट्रवादीसाठी नवखे असले तरीही पवारांसाठी जुने समर्थक म्हणून ओळखले जातात.

सोलापूर : महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्याला वंचित राहावे लागले आहे. शिवसेना आणि कॉंग्रेसचा प्रत्येकी एक-एक आमदार आहे. राष्ट्रवादीच्या चिन्हावरील तीन आमदार आणि अपक्ष संजय शिंदे यांचा पाठिंबा असे चार आमदार असूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसने मंत्रिमंडळात कोणालाही स्थान दिले नाही. मंत्रिपदी भारत भालके, बबनराव शिंदे, संजय शिंदे यांची वर्णी लागेल, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणी करायचे? हा प्रश्‍न अद्यापही पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कायम ठेवला असल्याचे आजच्या विस्तारातून समोर आले आहे. 

हेही वाचा : तानाजी सावंतांना मोजावी लागली मनमानीची किंमत?
आमदार भालकेंना डावलले

माढ्याचे आमदार बबनराव शिंदे सलग सहाव्यांदा आमदार झाले आहेत. ज्येष्ठत्वाच्या मुद्यावर त्यांना संधी मिळेल अशी शक्‍यता होती. आमदार शिंदे यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे त्यांनी मंत्रिपदासाठी फारशी उत्सुकता दाखविली नसल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. आमदार भालके हे राष्ट्रवादीसाठी नवखे असले तरीही पवारांसाठी जुने समर्थक म्हणून ओळखले जातात. बबनराव शिंदे नसतील तर आमदार भालके यांना संधी मिळेल अशीही शक्‍यता व्यक्त होत होती. आमदार भालके यांनाही या विस्तारात डावलण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांना संधी मिळेल, अशीही शक्‍यता शेवटच्या टप्प्यात निर्माण झाली होती. 

जिल्ह्यातील एकाही राष्ट्रवादीच्या आमदाराला संधी न मिळाल्याने जिल्ह्याच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार? हा प्रश्‍न अद्यापही कायम आहे. शेजारच्या पुणे जिल्ह्याला अजित पवार, दिलीप वळसे-पाटील आणि दत्ता भरणे यांच्या माध्यमातून तीन मंत्रिपदे मिळाली आहेत. भरणे हे इंदापूरचे असून इंदापूर आणि सोलापूर सीमेवरचा भाग आहे. त्यामुळे सोलापूरच्या पालकमंत्री भरणे यांची वर्णी लागेल अशीही चर्चा आज दुपारपासूनच सुरू झाली आहे. सोलापूरच्या पालकमंत्रिपदी कोणाची वर्णी लागते? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शरद पवार, आर. आर. पाटील, दिग्विजय खानविलकर, जगन्नाथ पाटील यांच्यानंतर आता सोलापूरला या वेळी बाहेरचा पालकमंत्री मिळणार आहे. 

हेही वाचा : ...हा तर विकसनशील सोलापूरवर अन्यायच!
अध्यक्ष निवडीत जाणवतोय नेतृत्व नसल्याचा परिणाम
 
सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजप व समविचारींचा अध्यक्ष करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व आमदार विजयकुमार देशमुख यांनी ज्या पद्धतीने पुढाकार घेतला आहे. साम, दाम यासह सर्व ताकदीचा वापर भाजपने योग्यवेळी केला आहे. त्या तुलनेत महाविकास आघाडी विशेषतः राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पुढाकार कोणी घ्यायचा? साम आणि दाम कोणी वापरायचा? याबाबतचा ताळमेळ होऊ शकला नव्हता. राष्ट्रवादीने मंत्रिपदासाठी डावल्याने येत्या काळातही अशीच स्थिती बघायला मिळण्याची शक्‍यता आहे. नेते आहेत पण नेतृत्व कोणी करायचे? कोणाचे नेतृत्व कोणी मान्य करायचे? हे प्रश्‍न येत्या काळातही राष्ट्रवादीला सतावण्याची दाट शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur district in no Bhalke no Shinde