विशेष पोलिस महानिरीक्षकांचा इशारा! जनावरे चोरी-तस्करी करणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई; लोकसभा निवडणुकीपूर्वी पोलिस अधिकारी देणार ११५० गावांना भेटी

निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील ११५० गावांना पोलिस अधिकारी भेटी देतील, निर्भय वातावरणात निवडणूक पार पडेल, यादृष्टीने आदेश दिल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या चोरीचे प्रमाण वाढत असून जनावरांची चोरी, तस्करी करणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई केली जाणार आहे.
IG Sunil Fulari
IG Sunil FulariSakal

सोलापूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील ११५० गावांना पोलिस ठाण्यांचे अधिकारी भेटी देतील, निर्भय वातावरणात निवडणूक पार पडेल, यादृष्टीने आदेश दिल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले. दुसरीकडे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या चोरीचे प्रमाण वाढत असून जनावरांची चोरी तथा तस्करी करणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई केली जाणार आहे. त्याअनुषंगाने पोलिसांना गस्त वाढविण्याचेही आदेश दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

वार्षिक तपासणीच्या अनुषंगाने विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. फुलारी शुक्रवारी (ता. ८) सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना जिल्ह्यातील गुन्हेगारीसंदर्भातील माहिती दिली. यावेळी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर हे उपस्थित होते. तत्पूर्वी, मागील दोन दिवसांत त्यांनी बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा या पोलिस ठाण्यांना भेटी देऊन तेथील गुन्ह्यांची माहिती जाणून घेतली. शुक्रवारी त्यांनी ग्रामीण पोलिसांच्या सोलापुरातील मुख्यालयात सर्वच ठाण्यांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

श्री. फुलारी म्हणाले, कोल्हापूर विभागात पुण्यानंतर सोलापूर जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असून त्या प्रमाणात पोलिस ठाणे, मनुष्यबळ कमी आहे. त्यासाठी आता वाढीव पोलिस ठाणी तयार करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला जात आहे. चिंचोली एमआयडीसीसह अन्य ठिकाणी पोलिस ठाणी नवीन होतील. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत संवदेनशील गावांवर पोलिसांचे सर्वाधिक लक्ष राहणार आहे. त्याच अनुषंगाने सराईत तथा रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया देखील केल्या जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गतवर्षीच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण फार वाढले नसून गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाणही समाधानकारक असल्याचेही ते म्हणाले.

ॲट्रॉसिटी गुन्ह्यांच्या तपासात तांत्रिक अडचणी

सोलापूर व पुणे जिल्ह्यात विशेषत: ठराविक तालुका तथा पोलिस ठाण्याअंतर्गत ॲट्रॉसिटी गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. पण, पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील प्रत्येक कलमांनुसार पुरावे उपलब्ध आहेत का, आरोपी व फिर्यादीच्या जातीची पडताळणी, त्यांच्याकडील जात प्रमाणपत्रांची तपासणी, फिर्यादीकडे जात प्रमाणपत्र नसणे, साक्षीदार नसणे अशा कारणांमुळे काही गुन्ह्यांच्या तपासास तांत्रिक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे काही गुन्ह्यांच्या तपासाला विलंब होतोय, पण बहुतेक गुन्ह्यांचे तपास पूर्ण झाल्याचेही श्री. फुलारी यांनी सांगितले. पिडितांना न्याय देण्याच्या दृष्टीने या कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांचा तपास पोलिस उपअधीक्षक गांभीर्याने करतात, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

निवडणुकीपूर्वी शस्त्रे जमा होणार

जिल्ह्यातील तीन हजार ९३९ व्यक्तींकडे स्वरक्षणासाठी शस्त्र परवाने आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्यातील किती जणांकडील शस्त्रे जमा करून घ्यायची याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती घेणार आहे. दोनपेक्षा अधिक शस्त्रे असलेल्यांकडील शस्त्रे देखील जमा केली जाणार आहेत. त्यासंदर्भातील निर्णय काही दिवसांत होईल.

जिल्ह्याच्या ग्रामीणमधील गुन्ह्यांसंदर्भातील ठळक बाबी...

  • २०२२च्या तुलनेत २०२३ मध्ये खुनाचे सात गुन्हे वाढले असून एकूण ६४ पैकी ५९ गुन्ह्यांतील आरोपींना पकडले आहे.

  • जिल्ह्यात खुनाच्या प्रयत्नाचे २०२२ मध्ये १४४ गुन्हे होते, २०२३मध्ये त्यात घट झाली असून गतवर्षी केवळ ९३ गुन्हे दाखल आहेत.

  • दरोड्याचे गुन्हे कमी झाले असून २०२३ मध्ये केवळ सहा गुन्ह्यांची नोंद पोलिसांत झाली आहे.

  • घरफोडीचे ६७ तर चोरीचे एक हजार एक हजार ८३० गुन्हे ग्रामीण पोलिसांमध्ये नोंद असून २०२२च्या तुलनेत त्यात लक्षणीय घट झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com