'आर्यनच्या सुटकेसाठी बैठका, पण ST कामगारांसाठी वेळ नाही' - पडळकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

political

काल परत एका बीडमधील एसटी कामगाराने आत्महत्येचा प्रयत्न केला.

'आर्यनच्या सुटकेसाठी बैठका, पण ST कामगारांसाठी वेळ नाही'

मागील काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी संप केला होता. दरम्यान यात अहमदनगर येथील एका एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली होती. राज्यसरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या अमान्य केल्याने आणि ठोस निर्णय न घेतल्याने विरोधकांकडून त्यांच्यावर टीका सुरु आहे. दरम्यान भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना 10 नोव्हेंबरपासुन मंत्रालयाच्या दारात संसार थाटत आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. यात मुद्द्यावरुन आता पुन्हा एकदा त्यांनी राज्यसरकारला धारेवर धरलं आहे.

ते म्हणाले, काल परत एका बीडमधील एसटी कामगाराने आत्महत्येचा प्रयत्न केला. डॅाक्टरांच्या उपचारांमुळं त्याचा जीव वाचला असला तरी त्याची परिस्थिती नाजूक आहे. आतापर्यंत ३१ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. पण प्रस्थापितांच्या या सरकारने झोपेचं सोंग घेतल आहे. सरकारकडून कोर्टाची दिशाभूल सुरू आहे. जर यांनी वेळेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली असती, तर ३१ जणांचे प्राण वाचले असते. महाराष्ट्रातील जनतेची गैरसोय टळली असती, असा घणाघात त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, जराही नैतिकता शिल्लक असेल तर ३१ जणांनी केलेल्या आत्महत्येची जबाबदारी स्वीकारून अनिल परब तुम्ही राजीनामा देणार आहात का? तुम्ही कसेही वागा, आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या एसटी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आर्यन खानची सुटका व्हावी म्हणून मुख्यमंत्री तात्काळ नवाब मलिक आणि गृहमंत्र्यांसोबत मिटींग घेतात, पण एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्यांना चर्चा करायला वेळ नाही. आपली जबाबदारी न्यायालयावर ढकलून स्वतः नामानिराळं राहायचं हा त्यांचा डाव आहे. पण त्या ३१ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचा तळतळाट तुम्हाला सुखानं जगू देणार नाही, हे लक्षात ठेवा. असा इशाराही त्यांनी दिला आहे.

टॅग्स :gopichand padalakar