ST Workers Strike - एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच, संप मागे घ्या - मुख्यमंत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री

गरीब एसटी कर्मचाऱ्यांना भडकावून राजकीय पोळी भाजू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले.

एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच, संप मागे घ्या - मुख्यमंत्री

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले तर परिवहनमंत्री अनिल परब यांनी मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार नाइलाजाने ‘नो वर्क- नो पे’ चा आम्हाला (काम नाही तर वेतनही नाही) अवलंब करावा लागेल असे म्हटले आहे. त्यानंतरही मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन सुरु केले आहे. यामध्ये भाजप नेते देखील सहभागी झाले होते.

राजकीय पक्षांनी गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन त्यांना आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळ्यांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नये. ही वेळ राजकारणाची नाही, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला बुधवारी सुनावले आहे. ठाकरे वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले त्याआधी त्यांनी कर्मचाऱ्यांना उद्देशून निवेदन दिले.

मुख्यमंत्री म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांनो, तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी राज्य शासन मनापासून प्रयत्न करत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पावले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील त्यावर समाधान झाले आहे.

हेही वाचा: एसटी संप चिघळणार, पडळकर आणि खोत यांचा आझाद मैदानावर मुक्काम

न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केले आहे. अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतो आहोत. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

loading image
go to top