कोरोनाशी लढण्यासाठी 'ही' दाेन औषधे खरेदी करणार : गृहमंत्री अनिल देशमुख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संदर्भात जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या उपाययोजनांची तर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. 

सातारा : कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केला होता. आता या लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे, हे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रीत करुन बाहेरुन येणाऱ्या नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करुन टेस्टींगचे प्रमाण वाढवावे म्हणजे बाधितांची संख्या कमी होईल, असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (साेमवार) व्यक्त केला.

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक आज गृहमंत्री श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कृषी  राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दिपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.

राज्यातील 20 ते 22 लाख परप्रांतीय हे आपापल्या राज्यात गेले आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यामुळे उद्योग सुरु झाले आहेत त्यामुळे परप्रांतीय परत राज्यात येत आहेत कोरानाचे संक्रमण वाढू नये यासाठी येणाऱ्यांबाबत दक्षता घ्यावी. फलटण आणि जावली तालुक्यातील संसर्ग झालेल्या रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण जास्त आहे, तो दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत.
 
बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करुन टेस्टींगचे प्रमाण वाढवावे यामुळे बाधितांची संख्या कमी होईल. जिल्हा प्रशासन समन्वयाने चांगले काम करीत आहे. मृत्युचे प्रमाण कमी करण्यावर भर द्यावा. बाधितांमध्ये 61 टक्के पुरुष व 39 टक्के महिला आहेत. आजपर्यंत 1 हजार 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यात 21 ते 30 वर्ष वयोगटातील तरुणांचे जास्त प्रमाण  आहे. जिल्ह्यात 308 प्रतिबंधित क्षेत्र आहेत या प्रतिबंधित क्षेत्रात शासनाने दिल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करावी त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांची व गरोदर मातांची काळजी घ्यावी. तसेच गंभीर असलेल्या कोरोना बाधित रुग्णांसाठी टॉसिलीझुमॅब व रेमडेसिवीर हे औषध शासन खरेदी करणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 55 वर्षावरील 12 हजार कर्मचाऱ्यांना सुटी दिली आहे. 50 ते 55 वर्ष वयोगटातील पोलीस कर्मचाऱ्यांना साधेकाम दिले आहे. तसेच जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नव्याने उभारण्यात येणाऱ्या निवासी संकुलासाठी  निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे गृहमंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.

प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संदर्भात जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या उपाययोजनांची तर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.  या बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील, उपस्थित आमदार यांनीही सूचना केल्या. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मोठी बातमी - लवकरच रेमडेसिवीर औषधाच्या चाचण्या होणार सुरु...

कोरोनावर प्रभावी ‘रेमडेसिवीर’चे होणार भारतात उत्पादन; या दोन कंपन्या करणार उत्पादन..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Government Will Purchase Remdesivir Drug To Cure Covid 19 Positive Patients Says Home Minister Anil Deshmukh In Satara