खासगी रुग्णालयाच्या अवाजवी शुल्क आकारणीला बसणार चाप; राज्य सरकारने उचलले महत्वाचे पाऊल

भाग्यश्री भुवड
Friday, 7 August 2020

अद्यापही खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांकडून जास्तीचे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याची दखल घेऊन राज्याच्या जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी आणि काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या कायम आहे. मुंबईतील कोरोना नियंत्रणात आला असला तरी ग्रामीण भागात नव्याने आढळणाऱ्या रुग्णसंख्येमुळे संबंधित जिल्हा रुग्णालयातील खाटांची संख्या अपुऱ्या पडू लागल्या आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातही रुग्णांवर उपचार सुरु आहे. कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. यासर्व निर्देशांची अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी राज्यात भरारी पथक नेमण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

'चेस द व्हायरस' मोहिमेला यश; मुंबईतील आणखी एक हॉटस्पॉट कोरोनामुक्तीच्या दिशेने

कोरोनाच्या रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळण्यासाठी राज्य शासनाने 21 मे 2020 रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे खासगी रुग्णालयांना कमाल दरमर्यादा निश्चित करून दिली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय 23 मे रोजी घेण्यात आला. त्यानुसार 30 जून 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार खासगी वाहने आणि रुग्णवाहिका अधिग्रहीत करून त्यांचे कमाल दर निश्चित केले आहेत. तसेच खासगी रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करून देणे आणि त्याच्या अधिसूचनेच्या प्रभावी अंमलबजावणीचेही निर्देश देण्यात आले आहेत.यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना पत्र पाठवले असून तपासणी अहवाल तीन दिवसात सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

चर्चगेट स्थानकात साचलेल्या पाण्याला 'ड्रीम प्रोजेक्ट' जबाबदार? वाचा काय आहे नेमकी कारणे

मात्र अद्यापही खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांकडून जास्तीचे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याची दखल घेऊन राज्याच्या जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी आणि काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी तसेच विभागीय आयुक्तांनी देखील त्यांच्या स्तरावर भरारी पथक नेमण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

पाऊस तर ओसरला; मुंबईत आता मात्र डेंगी, लेप्टोचा वाढता धोका

भरारी पथकाचे नेमके काम काय ? 

  • वेळोवेळी जाहीर केलेल्या शासन निर्णयाचे खासगी रुग्णालयांकडून पालन होत आहे की नाही, याची खातरजमा या भरारी पथकांमार्फत करण्यात येईल. 
  • खासगी रुग्णालयांमध्ये अधिसूचना आणि अधिसूचित दर दर्शनी भागावर लावले की नाही याची पाहणी केली जाईल.
  • खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणारी बिले अंतिम करण्यापूर्वी त्याच्या तपासणीसाठी यंत्रणा नेमावी. 
  • आकारलेले दर, खासगी वाहने, रुग्णवाहिका यांच्याकडून आकारले जाणारे दर योग्य आहेत की नाही याची तपासणी करावी. 
  • महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांनी दाखल होणाऱ्या रुग्णांना कॅशलेस सुविधा देणे यासर्व बाबींची तपासणी करावी.

---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state govt appointed team who will check private hospitals in maharashtra