राज्यातील कनिष्ठ पोलिस अधिकारी ताटकळत! ना बदली, ना प्रमोशन

अनिल कांबळे
Thursday, 1 October 2020

पोलिस महासंचालक कार्यालयातील सर्व डेस्कचे पीआय ते पीएसआय बदलीबाबतचे काम पूर्ण झालेले आहे. आदेश मिळताच ‘लिस्ट फ्लॅश’ अशी तयारी आस्थापना विभागाची आहे. त्याचबरोबर पदोन्नतीसाठी आवश्यक सर्व माहिती संकलित झालेली आहे. केवळ बैठक घेऊन कनिष्ठ अधिकाऱ्यांची पदोन्नतीची संख्या निश्चित करणे, पदोन्नतीच्या कार्यकक्षेत असणाऱ्या अधिकारी यांचेकडून संवर्ग मागणी करणे आणि पदोन्नतीवर त्यांना पोस्टिंग देणे बाकी आहे, अशी माहिती आहे.

नागपूर : नियुक्तीच्या जागी सहा वर्षे सेवेचा प्रशासकीय कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरही राज्यभरातील कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या नाहीत. तसेच पात्र असतानाही पोलिस अधिकाऱ्यांना प्रमोशनही दिले गेले नाही. त्यामुळे राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. पोलिस महासंचालक कार्यालयात पोषक वातावरण असताना नेमके घोडे अडले कुठे, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांची बदली करण्याचा सर्वस्वी अधिकार पोलिस महासंचालकांना असतात. तसेच त्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीबाबतही निर्णय पोलिस महासंचालकांकडे राखीव असतात. सध्या राज्य पोलिस दलात बदल्यांचे वारे वाहत आहेत.

अधिक वाचा - सोने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय, भावात मोठी घसरण

आतापर्यंत जवळपास सर्वच सहायक पोलिस आयुक्त ते पोलिस अधिक्षक, उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. मात्र, डीजी कार्यालयाच्या अख्त्यारित येत असलेल्या कनिष्ठ पोलिस पोलिस अधिकाऱ्यांना मात्र ताटकळत ठेवण्यात आले. त्यामुळे ज्यांचा नियुक्तीच्या ठिकाणी सेवाकाळ पूर्ण झालेल्या पोलिस अधिकारी बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, सेवाकाळ पूर्ण होऊन बराच कालावधी लोटल्यानंतरही बदलीबाबत डीजी कार्यालयातून अद्याप निर्णय न झाल्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

पोलिस महासंचालक कार्यालयातील सर्व डेस्कचे पीआय ते पीएसआय बदलीबाबतचे काम पूर्ण झालेले आहे. आदेश मिळताच ‘लिस्ट फ्लॅश’ अशी तयारी आस्थापना विभागाची आहे. त्याचबरोबर पदोन्नतीसाठी आवश्यक सर्व माहिती संकलित झालेली आहे. केवळ बैठक घेऊन कनिष्ठ अधिकाऱ्यांची पदोन्नतीची संख्या निश्चित करणे, पदोन्नतीच्या कार्यकक्षेत असणाऱ्या अधिकारी यांचेकडून संवर्ग मागणी करणे आणि पदोन्नतीवर त्यांना पोस्टिंग देणे बाकी आहे, अशी माहिती आहे.

हेही वाचा - भरचौकात हत्या झालेल्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला उसळली हजारोंची गर्दी; नागपुरात गॅंगवॉर भडकण्याची शक्यता

सरकारला ‘डबल’ खर्च

पदोन्नतीच्या कार्यकक्षेत असणारे बरेच अधिकारी यांचा सध्या कार्यरत असलेल्या युनिटमधील प्रशासकीय कालावधी पूर्ण झालेला आहे. त्यांची बदली पण अपेक्षित आहे. बदली प्रक्रियेनंतर पदोन्नती प्रक्रिया झाली तर अशा अधिकारी यांना परत एकदा बदली प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. म्हणून पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पदोन्नती देऊन नंतरच बदली प्रक्रिया पूर्ण केल्यास सरकारच्या तिजोरीवर डबल भार पडणार नाही आणि पदोन्नतीच्या कार्यकक्षेत असणाऱ्या कनिष्ठ अधिकारी वर्गाची हेळसांड होणार नाही.

बदल्यांसाठी तारीख पे तारीख

राज्यातील आयपीएस आणि मपोसे अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी अनेक दिवसांपासून निर्णय होत नसल्याने ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे. अद्यापपर्यंत अधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत. तसेच पोलिस निरीक्षक ते उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीसाठी वारंवार तारखा देण्यात येत आहे. कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी पुन्हा १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्यामुळे पीआय ते पीएसआय अधिकाऱ्यांची तगमग वाढली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The state's junior police officer is waiting for promotion