'त्या' भरतीला विद्यार्थ्यांचा विरोध कायम; 'एमपीएससी'कडे भरती देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

'महापरीक्षा' पोर्टलमाध्यमातून राज्य सरकारमधील वर्ग ब व क मधील रिक्त पद भरती वादग्रस्त ठरली. अपारदर्शकतेमुळे व त्रुटींमुळे यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला.

पुणे : वादग्रस्त ठरलेले 'महापरीक्षा' पोर्टल बंद करण्यावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केलेले असताना दुुसरीकडे विभागस्तरावर नोकर भरती करण्याचा निर्णय घेतल्याने वादंग निर्माण होण्याची शक्‍यता आहे. या निर्णयाचा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांनी कडाडून विरोध करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडूनच (एमपीएससी) ही भरती करा अशी मागणी केली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'महापरीक्षा' पोर्टलमाध्यमातून राज्य सरकारमधील वर्ग ब व क मधील रिक्त पद भरती वादग्रस्त ठरली. अपारदर्शकतेमुळे व त्रुटींमुळे यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. त्यामुळे महापरीक्षा पोर्टल बंद करा अशी मागणी केली जात होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हे पोर्टल त्वरीत बंद न करता पोर्टलमधील दुरूस्ती करण्यात येईल असे सांगण्यात आले, पण यावर टीकेची झोड उठल्यानंतर गुरूवारी (ता. 20) हे पोर्टल बंद केल्याचे जाहीर केले.

- Namaste Trump:फर्स्ट लेडी मेलानिया यांच्या गिफ्टचं गुजरात, महाराष्ट्राशी कनेक्शन

एमपीएससी स्टुडंट राईट्‌सचे महेश बडे म्हणाले, ''महापरीक्षा पोर्टल बंद केले त्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन, पण विभागस्तरावर भरती करण्याचा निर्णय चुकीचा आहे. प्रशासनातील अधिकारी सरकारची दिशाभूल करत आहेत. यापूर्वी जिल्हा स्तरावर दुय्यम परीक्षा मंडळाकडून परीक्षा घेण्यात आल्या, त्यात अनेक घोटाळे झाले. आता विभाग स्तरावर ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा घेतली तरी यात घोटाळे होतील. त्यामुळे ही भरती थेट एमपीएससीकडून घ्यावी.''

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सीएए संदर्भात भूमिका केली स्पष्ट

''राज्यातील सर्व पदांची भरती करण्यासाठी 'एमपीएससी' तयार असताना विभागस्तरावर भरतीचे कंत्राट देणे चुकीचे आहे. विद्यार्थांचे खरेच भले करायचे असेल तर, केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात भरती केली जावी,' अशी मागणी किरण निंभोरे यांनी केली आहे.

- राज्यातील मेट्रो प्रकल्प दहा वर्षातच ठरतील पांढरे हत्ती : जयंत पाटील

मनविसेचे शहर प्रमुख कल्पेश यादव म्हणाले, ''महापरीक्षा पोर्टलने सरकारी नियम पायदळी तुडवले, त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण नव्हते. नवीन निर्णयानुसार दुसऱ्या एजन्सीकडे पुन्हा काम दिले जाणार आहे. हे पूर्णताः चुकीचे आहे. 'एमपीएससी'द्वारे ही भरती झाली पाहिजे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student opposed to division wise recruitment and demand for recruited through MPSC