
अतिरिक्त ऊसाचा बळी, दोन एकर ऊस पेटवून शेतकऱ्याने घेतला गळफास
गेवराई (जि.बीड) : जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होणार असल्याची चाहूल वर्षभरापूर्वीच लागली होती. मात्र, अतिरिक्त ऊस गाळपाच्या नियोजनासाठी सरकारने कुठलेही ठोस उपाय केले नाहीत. परिणामी जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी अतिरिक्त ऊसाचा (Sugarcane) बळी बुधवारी (ता.११) जिल्ह्यात गेला. ऊसाचे गाळप होत नसल्याने शेतकऱ्याने ऊसाचा फड पेटवून देऊन फडातच असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. हिंगणगाव (ता.गेवराई) येथे दुपारी ही घटना घडली. नामदेव आसाराम जाधव (वय ३०, रा. हिंगणगाव ता. गेवराई जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. (Surplus Sugarcane Victim, Farmer End Himself After Torched Cane In Gevrai Taluka Of Beed)
हेही वाचा: Nanded | पार्सलवरील पाकिस्तान नगर पत्त्याने नांदेडमध्ये खळबळ !
बीड (Beed) जिल्ह्यात यंदाच्या हंगामात जिल्ह्यात चार सहकारी आणि दोन खासगी सहकारी साखर कारखाने ऊसाचे गाळप करत आहेत. अद्यापही या सर्व कारखान्यांचे गाळप सुरु आहे. दरम्यान, अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होण्याचा अंदाज वर्षभरापूर्वीच लागलेला असताना शासनस्तरावर कुठल्याही ठोस उपाय योजना झाल्या नाहीत. त्यामुळे आजघडीला पाच लाख हेक्टरांहून अधिक क्षेत्रावर ऊस उभा आहे. आणखी फार तर पंधरवाडा कारखान्यांचे गाळप सुरु राहील. दरम्यान, हिंगणगाव येथील नामदेव जाधव यांचा दोन एकर क्षेत्रावर ऊस आहे. ऊसाचे गाळप होत नसल्याने ते हवालदिल होते.
हेही वाचा: बाळासाहेबांच्या नावाखाली आणखी किती काळ दिशाभूल ? भाजपची उद्धव ठाकरेंवर टीका
याच नैराश्यातून त्यांनी बुधवारी ऊसाचा फड पेटवून दिला आणि शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावला. दरम्यान, हिंगणगाव येथील १०१ हेक्टरांवरील ऊसाची नोंद जय भवानी सहकारी साखर कारखान्याकडे होती. नोंद असलेला सर्व ऊस गाळप झाला आहे. येथीलच नोंद नसलेला २५ हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळप केला आहे. नामदेव जाधव यांचा नोंद नसलेला ऊस देखील गाळपाचे नियोजन होते. त्यांनी मागच्या वर्षी गंगामाई शुगर्स या कारखान्याला ऊस पाठविल्याची माहिती, जयभवानी कारखान्याच्या पत्रकात देण्यात आली.
Web Title: Surplus Sugarcane Victim Farmer End Himself After Torched Cane In Gevrai Taluka Of Beed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..