सुशांत सिंगच्या आत्महत्येची वेगळ्या अँगलने होणार चौकशी, वाचा काय म्हणाले गृहमंत्री... 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

सुशांत कोणत्याही सिनेसृष्टीच्या कुटुंबातून नव्हे तर सामान्यांतून आलेला होता. तरी बॉलिवूडमध्ये त्याची मागणी वाढत होती. सिनेसृष्टीतील काही लोक त्याला चित्रपट मिळू नये म्हणून प्रयत्नात असायचे, असेही सांगितले जाते. 

नागपूर : सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येची घटना अतिशय दुर्दैवी आहे. शवविच्छेनाचा अहवाल आल्यानंतर सर्व गोष्टी पुढे येतील. या घटनेबाबत अद्याप तरी काही संशयास्पद आढळलेलं नाही. पण, तसं काही आढळलं तर वेगळ्या अँगलनेसुद्धा या घटनेची चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (सोमवार) सांगितले. 

वाळू तस्करीसंदर्भात गृहमंत्र्यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित केली होती. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने घटनेने बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रातील नागरिकांना धक्‍का बसला. सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, असे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - खाकी वर्दीतील लव्हबर्डची चर्चा जोरात, वरिष्ठांपर्यंत पोहोचले प्रकरण अन्...
 

ही आत्महत्या नसून त्याची हत्याच असल्याचा आरोप सुशांतचा मामा व कुटुंबीयांनी माध्यमांसमोर केला. त्यांच्या या मागणीनंतर विविध चर्चा व शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. सुशांत कोणत्याही सिनेसृष्टीच्या कुटुंबातून नव्हे तर सामान्यांतून आलेला होता. तरी बॉलिवूडमध्ये त्याची मागणी वाढत होती. सिनेसृष्टीतील काही लोक त्याला चित्रपट मिळू नये म्हणून प्रयत्नात असायचे, असेही सांगितले जाते. 

सुशांतचे एकापेक्षा एक सरस चित्रपट येत असताना त्याची मागणी वाढू लागली होती. "छिछोरे' या सिनेमातील त्याच्या कामाची चांगली प्रशंसा झाली होती. त्यानंतर त्याला पाच-सहा चांगल्या बॅनरचे सिनेमे मिळाले होते. पण, बॉलिवूडमधील काही टोळ्यांनी कटकारस्थाने करून हे सिनेमे त्याच्याकडून हिसकावून घेतल्याचेही सांगण्यात येते. सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडले असण्याचीही शक्‍यता काही लोकांकडून वर्तविली जात आहे.

सोशल मीडियावर यासंदर्भात विविध पोस्ट व्हायरल होता आहेत. त्यामुळे या घटनेची चौकशी सीबीआयमार्फत करावी, अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली. अशा परिस्थितीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गरज पडल्यास या घटनेची वेगळ्या अँगलनेही चौकशी करू, असे सांगितले आहे. त्यामुळे सुशांत सिंगच्या आत्महत्येबाबत विविध चर्चा सध्यातरी थांबणार नाहीत असे दिसते. 

क्लिक करा - सुशांतला होता हा त्रास... नियमित घ्यायचा टॅबलेट्‌स
 

सुशातची अभिनेता म्हणून कारकीर्द सुरू झाल्यानंतर त्याला एका टीव्ही वाहिनीवर "पवित्र रिश्‍ता' ही टीव्ही मालिका मिळाली. "डेली सोप'ची लोकांमध्ये प्रडंच क्रेझ नुकतीच सुरू झाली होती. त्यातच राजबिंडा असलेल्या सुशात सिंगची यातील भूमिका भाव खावून गेली. तो तरुणींच्या गळ्यातील ताईतच बनला होता. याच मालिकेत त्याच्या अपोझिट भूमिका असलेली अंकिता लोखंडेसोबतच्या त्याच्या रिलेशनची सुरुवातही चांगलीच चर्चेत आली. अंकिता आणि सुशांत सिंग यांची जोडी या मालिकेच्या माध्यमातून सुपर-डुपरहिट झाली होती. 

स्वतःच्या करिअरबाबत सेंसेटिव्ह असलेल्या या अभिनेत्याने पुढे खूप मोठी झेप घेतली. "एम. एस. धोनी' सिनेमातून तर त्याने जबरदस्त अभिनय केला. "शुद्ध देसी रोमांस'मधून त्याने केलेल्या चॉकलेटी हिरोच्या भूमिकेमुळे तर तो तरुणींचा आवडता नायक बनला होता. त्याच्या जाण्यामुळे या सर्वांना जबरदस्त धक्का बसला, हे मात्र खरे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh's suicide will be investigated from a different angle