‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेनं मला समृद्ध केलं; डॉ. अमोल कोल्हेंची भावना

Swarajyarakshak-Sambhaji-Amol-Kolhe
Swarajyarakshak-Sambhaji-Amol-Kolhe

ऐतिहासिक आणि संवेदनशील विषयावर मालिका सुरू करताना काय विचार होता? 
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका सुरू करायची ठरली, त्या वेळी विषय संवेदनशील असल्याचे वारंवार म्हटले गेले. त्याविषयी भीतीही दाखविली. अनेकांनी तर हा विषय यशस्वी होऊच शकत नाही, अशीही भीती घातली. पण, साधी गोष्ट कायम वाटते की, तुमचा हेतू शुद्ध असेल अन्‌ तुम्ही प्रामाणिक असाल, तर तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाने मी अनेक वर्षे झपाटलो होतो. आठ-नऊ वर्षे सगळीकडे फिरत होतो. त्यामुळे हे करायचेच, ही खूणगाठ मनामध्ये बांधली होती. 

संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल अनेक पूर्वग्रह आणि मिथके आहेत. मालिका साकारताना यांना छेद कसा दिला? 
मुळात आपल्या इतिहासात डॉक्‍युमेंटेशन खूपच कमी आहेत. मराठ्यांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास फार मोठ्या संघर्षाचा आहे. शिवकालीन पुरावे पाहायला गेलो, तर शिवभारत हे पन्हाळ्याच्या वेढ्याला संपते. नंतर जेधे शकावली, त्यानंतर येते ती सभासदांची बखर. ही बखर संभाजी महाराजांच्या कालखंडानंतर लिहिली गेली. त्यानंतर दीडशे-पावणेदोनशे वर्षांनी लिहिलेली मल्हार रामभाऊ चिटणीसांची बखर येते. याव्यतिरिक्त मुघल बखरकार येतात. खाफी खान, ईश्‍वरदास नागर, भीमसेन सक्‍सेना किंवा काही इंग्रज इतिहासकारही येतात. त्यांच्यातून तुकडे जोडून एक कोलाज बनवावा लागतो.

मला वाटते की, तर्कसंगत दृष्टिकोनातून इतिहासाकडे बघितले जाते, तेव्हाच खरे चित्र समोर येते. केवळ अभिनिवेशातून बघण्याचा प्रयत्न केला, तर इतिहासाचे कायमच खोटे चित्रे उभे राहू शकते. आमच्या मालिकेचे लेखक प्रतापराव गंगावणे यांचे मनापासून आभार मानेन. कारण, त्यांनी निर्भीडपणे लेखन केले आणि ‘झी मराठी’चेही मनापासून आभार, की त्यांनी जे आपल्या सदसद्विवेकबुद्धीला पटतेय, ते महाराष्ट्राला दाखविण्याचा प्रयत्न केला.

मी छोट्या पडद्यावरून ब्रेक घेणार आहे. कारण, एपिसोडिक भागांसाठी खूप वेळ द्यावा लागतो. अभिनय हे स्वतःचे एक्‍स्प्रेशन असते. या माध्यमातून मला जेव्हा एक्‍स्प्रेस व्हायला वाटते, त्या वेळी मी नक्कीच पुन्हा येईन. 
डॉ. अमोल कोल्हे 

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा उद्देश साध्य झाला, असे वाटते का? 
आत्ताशी मालिका संपतेय. उद्देश साध्य झाला की नाही, हे कळण्यासाठी काही वर्षे जावी लागतील. जेव्हा बुकस्टॉलमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुस्तकांचा खप कायम असेल, जेव्हा किल्ल्यांकडे वळणारी पावले तितक्‍याच संख्येने वळत राहतील, जेव्हा पुन्हा एकदा मुलाचे नाव संभाजी ठेवण्यासाठी पालकांमध्ये चढाओढ लागेल, जेव्हा ‘छत्रपती संभाजी महाराज की...’ म्हटल्यानंतर ‘जय’ म्हणणार नाही, असे नरडे महाराष्ट्रात राहणार नाही अन्‌ जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांविषयी पूर्वग्रहदूषित इतिहास मांडणाऱ्याला ‘छावा’ कोण होता, हे जिथल्या तिथे सांगितले जाईल तेव्हा आपला उद्देश पूर्ण होईल. 

मालिकेतून तुमच्या आयुष्यात काय बदल झाले? 
खरे तर मालिकेमुळे खूपच बदल झाला. मालिकेवेळचे काही प्रसंग डोळे पाणावणारे होते. माझे वडील दोन वर्षांपूर्वी सप्टेंबरमध्ये गेले आणि त्यानंतर तीन दिवसांनी मी स्क्रीनप्ले लिहीत होतो, ज्यामध्ये महाराजांच्या जाण्याचा आणि संभाजी महाराजांच्या वियोगाचा विषय होता. मी लिहीत होतो अन्‌ डोळे पाण्याने डबडबलेले. या मालिकेने मला खूप समृद्ध केले. पडेल त्या आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी मालिकेमुळे आली. 

लोकसभा निवडणुकीत या मालिकेचा फायदा झाला, असे आरोप झाले. याबद्दल काय वाटते? 
मालिकेमुळे मला लोकसभा निवडणुकीत नक्कीच फायदा झाला. फायदा झाल्याचे आरोप झाले, असे म्हणणे चुकीचे आहे. कारण, ही माझ्यासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे. मी माझा व्यवसाय उजळ माथ्याने करतो. मी चोरी-चपाटी केलेली नाही. इमानेइतबारे जी गोष्ट केली, त्याला मी आरोप मानत नाही. या भूमिकांमुळे तुमच्याकडून अपेक्षा निर्माण होतात आणि त्या पूर्ण करण्याची जबाबदारी येते. ती जबाबदारी मला जास्त महत्त्वाची वाटते. 

आगामी नियोजन काय आहे? 
शिवाजी महाराजांवरील तीन चित्रपटांची घोषणा मी ‘शिवप्रताप’ या नावाने केली आहे. मोठ्या पडद्यावरून महाराजांविषयी काही गोष्टी मांडेन. त्याचबरोबर वेबसीरिजही डोक्‍यात आहे. पण, अगोदर शिवप्रताप हातावेगळे करेन. त्यानंतर संभाजी महाराजांविषयी चित्रपट येतील. मला शाहीर अण्णा भाऊ साठे यांचा ‘फकिरा’ साकारायला आवडेल, महात्मा जोतिराव फुले आणि पेशव्यांच्या इतिहासातील सदाशिवराव भाऊही साकारायला आवडतील.

मात्र, छोट्या पडद्यावरून ब्रेक घेणार आहे. कारण, एपिसोडिक भागांसाठी खूप वेळ द्यावा लागतो. तो वेळ मला देता येणार नाही. अभिनय हे स्वतःचे एक्‍स्प्रेशन असते. या माध्यमातून मला जेव्हा एक्‍स्प्रेस व्हायला वाटते, त्या वेळी मी नक्कीच एक्‍स्प्रेस होईन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com