अतिरिक्‍त शिक्षकांमुळे शिक्षक भरती लांबणीवर ! अठरा हजार शाळांची घटली पटसंख्या 

तात्या लांडगे 
Saturday, 5 December 2020

राज्यातील 24 जिल्ह्यांमधील तेराशे शिक्षक अतिरिक्‍त होऊनही त्यांचे समायोजन झालेले नाही. कोरोनामुळे आता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग बंद असून, यंदा सेवक संचही झालेला नाही. पुढील वर्षी शाळा सुरू झाल्यानंतर अतिरिक्‍त शिक्षकांचा मोठा प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्यामुळे शिक्षक भरती काही वर्षे लांबणीवर पडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

सोलापूर : कमी पटसंख्या असलेल्या शाळांची यादी तयार केली असून, कोरोनाची स्थिती सावरल्यानंतर या शाळांजवळील शाळांमध्ये समायोजन केले जाणार आहे. मात्र, राज्यात सद्य:स्थितीत तेराशे शिक्षक अतिरिक्‍त असून, कमी पटसंख्या असलेल्या शाळांवरील सुमारे दहा हजार शिक्षक नव्याने अतिरिक्‍त होणार आहेत. त्यामुळे या शिक्षकांचे समायोजन कसे आणि कुठे करायचे, असा पेच शालेय शिक्षण विभागापुढे निर्माण झाला आहे. 

राज्यात 10 ते 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सुमारे साडेसतरा हजार शाळा आहेत. त्यात दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सुमारे चार हजार शाळा असून, 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या साडेतेरा हजार शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे 29 हजार शिक्षक असून, शासनाच्या नव्या धोरणानुसार या शाळांवरील दहा हजारांहून अधिक शिक्षक अतिरिक्‍त होणार आहेत. तत्पूर्वी, राज्यातील 24 जिल्ह्यांमधील तेराशे शिक्षक अतिरिक्‍त होऊनही त्यांचे समायोजन झालेले नाही. कोरोनामुळे आता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग बंद असून, यंदा सेवक संचही झालेला नाही. पुढील वर्षी शाळा सुरू झाल्यानंतर अतिरिक्‍त शिक्षकांचा मोठा प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्यामुळे शिक्षक भरती काही वर्षे लांबणीवर पडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात कन्नड माध्यमाचे 17 शिक्षक अतिरिक्‍त झाले आहेत. मात्र, या ठिकाणी कन्नड माध्यमातील जागाच रिक्‍त नसल्याने या शिक्षकांना सांगली, कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांमध्ये समायोजित करावे, असे पत्र शिक्षण उपसंचालकांना दिल्याची माहिती शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी दिली. 

जिल्हानिहाय अतिरिक्‍त शिक्षक 
मुंबई (297), दक्षिण मुंबई (124), उत्तर मुंबई (188), ठाणे (93), रायगड (6), पुणे (22), कोल्हापूर (16), सोलापूर (17), सांगली (2), सिंधुदुर्ग (5), जळगाव (12), धुळे (70), नंदुरबार (33), नागपूर (182), चंद्रपूर (53), वर्धा (10), गोंदिया (36), औरंगाबाद (24), जालना (10), बीड (51), लातूर (41), उस्मानाबाद (18), अकोला (15), वाशिम (4). 

अतिरिक्‍त शिक्षकांच्या समायोजनेचे सुरू आहे नियोजन 
राज्यातील अतिरिक्‍त शिक्षकांची माहिती संकलित केली असून, संबंधित विषयांच्या जागा रिक्‍त असलेल्या ठिकाणी त्यांची नियुक्‍ती केली जाणार आहे. राज्यात सुमारे तेराशे शिक्षकांचे समायोजन करण्याचे नियोजन सुरू आहे. 
- दत्तात्रय जगताप, 
संचालक, प्राथमिक व माध्यमिक विभाग, पुणे 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher recruitment has been delayed due to overstaffing in the state