बळिराजाच्या डोळ्यात अश्रू! सोलापूर बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण; शुक्रवारी ५७२ गाड्यांची आवक; सरासरी दर १३०० रुपये

निर्यातबंदीच्या निर्णयानंतर कांद्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. शुक्रवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ५७२ गाड्या कांद्याची आवक होती. त्यावेळी कांद्याला सरासरी तेराशे रुपयांचा दर मिळाला. मागील १५ दिवसांतील भावातील ही सर्वात मोठी घसरण आहे.
आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण
आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरणsakal

सोलापूर : निर्यातबंदीच्या निर्णयानंतर कांद्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. शुक्रवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ५७२ गाड्या कांद्याची आवक होती. त्यावेळी कांद्याला सरासरी तेराशे रुपयांचा दर मिळाला. मागील १५ दिवसांतील भावातील ही सर्वात मोठी घसरण आहे. १८ डिसेंबरला सरासरी दर चौदाशे होता आणि त्यानंतर तो सतराशेपर्यंत गेला होता.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत २ डिसेंबर रोजी कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक पाच हजार १०० रुपयांचा भाव मिळाला होता. पण, केंद्राच्या निर्यातबंदीच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण झाली, आवक कमी असो वा जास्त, उत्पादन खर्च सोडून नफा काहीच मिळत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. शुक्रवारी सोलापूर बाजार समितीत एक लाख १४ हजार ५७२ पिशवी कांदा आला होता. एकूण ५७ हजार २८६ क्विंटलपैकी अवघ्या पाच क्विंटलला साडेतीन हजारांचा दर मिळाला. उर्वरित ५७ हजार २६९ क्विंटल कांदा तेराशे रुपये प्रतिक्विंटल दराने विकावा लागला.

चांगला कांदा देखील कमी दराने विकावा लागत असल्याने बळिराजाच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहेत. निर्यातबंदीपूर्वी एवढे लाख येतील, तेवढे लाख येतील म्हणून शेतकऱ्यांनी घातलेला हिशोब एका निर्णयाने विस्कळित झाला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोरील अडचणींत वाढ झाल्याची वस्तुस्थिती आहे.

सोलापूरचा कांदा बंगळूरच्या बाजारात

साडेतीनशे गाड्यांची आवक असतानाही सोलापूर बाजार समितीत सरासरी भाव चौदाशे ते सोळाशेपर्यंतच आहे. तर काही गाड्या आवक वाढल्यानंतर सरासरी भावात शंभर ते तीनशे रुपयांची घसरण होत आहे. सर्वाधिक दर तीन हजारांहून अधिक आहे, पण तो अगदी चार- पाच क्विंटलपुरताच आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूरसह इतर जिल्ह्यातील अनेक शेतकरी कांदा घेऊन बंगळूर बाजारपेठ गाठत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

‘सोलापूर’मधील शुक्रवारची स्थिती

  • एकूण गाड्यांची आवक

  • ५७२

  • सरासरी भाव

  • १,३०० रुपये

  • सरासरी दराने कांदा विक्री

  • ५७,२६९ क्विंटल

  • सर्वाधिक दर

  • ३,५००

  • जास्त दर मिळालेला कांदा

  • ५ क्विंटल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com