

Model Code of Conduct Now in Effect Across Maharashtra
esakal
तात्या लांडगे
राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत आचारसंहिता लागू झाली आहे. पण, या नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या हद्दीतील मतदारांवर प्रभाव पडेल असे कार्यक्रम जिल्ह्यात इतरत्र घेता येणार नाही. तसे झाल्यास तो आचारसंहितेचा भंग ठरेल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
नगराध्यक्ष हा जनतेतून निवडला जाणार असल्याने मतदारांना त्यांच्यासाठी एक आणि त्यांच्या प्रभागातील नगरसेवक पदासाठी उभारलेल्या उमेदवारासाठी एक मतदान करता येणार आहे. दरम्यान, मतदानासाठी जाणाऱ्या मतदारास मोबाईल घेऊन जाता येणार नाही. त्यासंबंधीचा निर्णय आवश्यकतेनुसार तेथील मतदान अधिकारी घेतील, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणूक खर्चात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार अ वर्गाच्या नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवारास १५ लाख तर सदस्यांसाठी नऊ लाख रुपयांची खर्च मर्यादा आहे.
ब वर्गाच्या नगरपरिषदांमधील अध्यक्षपदाच्या उमेदवारास ११ लाख २५ हजार रुपयांचा आणि सदस्यांसाठी साडेतीन लाख रुपयांचा खर्च करता येणार आहे. क वर्गाच्या नगरपरिषदांमध्ये अध्यक्षपदासाठी साडेसात लाख रुपये तर सदस्याच्या उमेदवारांना अडीच लाख रुपयांचा खर्च करता येणार आहे. तर ड वर्गाच्या नगरपरिषदांमध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवारास सहा लाख रुपये तर सदस्य उमेदवारास सव्वादोन लाख रुपयांचा खर्च करण्याची परवानगी असणार आहे.
उमेदवारी अर्ज भरणे : १० ते १८ नोव्हेंबर
अर्जांची छाननी : १८ नोव्हेंबर
हरकत नसलेल्या ठिकाणी उमेदवार अर्ज माघार : २१ नोव्हेंबर
हरकत असलेल्या ठिकाणी उमेदवार अर्ज माघार : २५ नोव्हेंबर
अंतिम उमेदवार यादी : २६ नोव्हेंबर
मतदान : २ डिसेंबर
मतमोजणी : ३ डिसेंबर
मागास प्रवर्गातून उमदेवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. ज्यांच्याकडे जातवैधता प्रमाणपत्र नाही, पण त्या उमदेवाराने जात पडताळणी समितीकडे अर्ज केला असेल तर त्याची पावती जोडावी लागणार आहे. निवडून आलेल्या उमेदवाराला निकालानंतर सहा महिन्यांत जातवैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारास ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरावा लागणार आहे. एका प्रभागात एका उमेदवारास जास्तीत जास्त चार अर्ज भरता येणार आहेत. दरम्यान, उमेदवाराने ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यायचा आहे.