esakal | पोलिसांच्या बंदोबस्ताची ‘परीक्षा’ सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra

पोलिसांच्या बंदोबस्ताची ‘परीक्षा’ सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गणेशोत्सवापासून सुरु झालेला बंदोबस्त डिसेंबर (December) महिन्यांतील हिवाळी अधिवेशनापर्यंत कायम असतो. त्यामुळे या वर्षांतील उर्वरित तीन महिने पोलिसांची (Police) बंदोबस्ताची ‘परीक्षा’ (Exam) सुरू झाली आहे.

राज्य पोलिस दलातील बहुतांश पोलिस कर्मचारी आता गणपती बंदोबस्तासाठी १२ दिवस डोळ्यात तेल घालून रस्त्यावर तैनात राहणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील कोरोनाची स्थिती आणि लॉकडाउनमुळे पहिल्या फळीतील योद्धे म्हणून पोलिस बंदोबस्तात होते. लॉकडाऊन काळात तर स्वतःच्या जिवाची पर्वा न करता राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची किमया पोलिस दलाने केली आहे. यात अनेक पोलिस कर्मचाऱ्यांचा बळीही गेला आहे. एवढ्यात कोरोनाची स्थिती आटोक्यात आली असताना पोलिसांना थोडी उसंत मिळणार अशी आशा होती. कोरोनामुळे गणेश मंडळ साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार असे वाटत होते. परंतु, कोरोनाची पर्वा न करता राज्यात मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होत असल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गणपती बंदोबस्तासह येत्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापर्यंतच्या बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यामुळे पोलिस कर्मचारी आता बंदोबस्तात ‘फुल्ल बिझी’ असणार आहेत.

हेही वाचा: शुक्रवारपासून सलग तीन दिवस राहणार बॅंक बंद

गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर लगेच ७ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. त्यासाठी पुन्हा १५ दिवसांचा डोळ्यात तेल टाकून पोलिस कर्मचारी रात्रंदिन रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. नवरात्रोत्सवादरम्यान ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात १५ तारखेला दसरा येत आहे. त्यासाठी शहरात दीक्षाभूमीवर बौद्ध बांधवांची मोठी गर्दी असते. त्यासाठी रस्त्यावर पोलिस बंदोबस्त असतो. यानंतर लगेच १९ ऑक्टोबरला ईद आहे. त्यानंतर दिवाळी सण सामान्य नागरिकांनी मोठ्या उत्सवात साजरा करता यावा, यासाठी शहरात दिव्याप्रमाणे सुरक्षा व्यवस्थेची ज्योत पोलिस तेवत ठेवत असतात.

हेही वाचा: Corona Impact : सलग दुसऱ्या वर्षी 'बोरीचा बार' राहणार बंद

..तर हिवाळी अधिवेशन

कोरोना नियंत्रणात असल्यास डिसेंबर सर्वाधिक कठीण असलेला हिवाळी अधिवेशन बंदोबस्त नागपूर पोलिसांच्या डोक्‍यावर येऊन बसणार आहे. अधिवेशनादरम्यान संपूर्ण मंत्रिमंडळ नागपुरात ठाण मांडते. मुख्यमंत्र्यांपासून ते आमदारापर्यंतची सर्वच दारोमदार नागपुरात उपस्थित असते. अधिवेशनादरम्यान मोर्चे असतात. शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कटून जाते. त्यामुळे येणारे तीन महिन्यांचा कालावधी हा पोलिसांच्या बंदोबस्ताची परीक्षा घेणारा आहे.

कुटुंबीयांचा हिरमोड

उठसूट बंदोबस्तामुळे पोलिसांचे कुटुंबीयसुद्धा त्रस्त होतात. घरातील अनेक महत्त्वाची कामे लांबणीवर पडतात. या दरम्यान घरातील किंवा नातेवाइकांकडील सणासुदीला कुटुंबीयांसोबत जाणे शक्‍य होत नाही. परिणामतः बंदोबस्तामुळे घरात ताणतणाव वाढतात. तसेच वेळ न दिल्यामुळे नातेवाईकही नाराज होतात.

रजा बंद-साप्ताहिक बंद

येणाऱ्या बंदोबस्तात साप्ताहिक रजा किंवा सर्वच प्रकारच्या रजा घेता येत नाही. सतत बंदोबस्तात असल्याचा परिणाम आरोग्यावर पडतो. बंदोबस्तामुळे अनेक पोलिस अंगावर आजार काढतात. त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्‍न पोलिसांना नेहमीच भेडसावतो. बंदोबस्तामुळे वडील किंवा आई बंदोबस्तात व्यस्त असल्यामुळे मुलांना कुठेही जाता येत नाही. त्यामुळे मुलांच्याही आनंदावर विरजण पडते.

loading image
go to top