उन्हाचा तडाखा वाढतोय! सोलापूरकरांना एप्रिलपर्यंत 4 दिवसांआडच पाणी; मेनंतर एक दिवस वाढण्याची शक्यता; शहरातील ‘हे’ 8000 मिळकतदार कारवाईच्या रडारवर

उणे २० टक्के झालेल्या उजनी धरणातून सध्या सोलापूर शहरासाठी पाणी सोडले आहे. 8 दिवसांत पाणी औज बंधाऱ्यात पोचणार आहे. पण बंधाऱ्यात सध्या 6-7 दिवस पुरेल इतकेच पाणी आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने धरण असो वा बंधाऱ्यातील पाणीसाठा झपाट्याने तळ गाठू लागला आहे.
solapur mahapalika
solapur mahapalikasakal

सोलापूर : उजनी धरण तळ गाठत असल्याने सोलापूर शहराला एप्रिलपर्यंत चार दिवसांआड तर मेपासून पाच दिवसांआड पाणीपुरवठा होऊ शकतो, अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

उणे २० टक्के साठा झालेल्या उजनी धरणातून सध्या भीमा नदीतून सोलापूर शहरासाठी पाणी सोडले आहे. आठ दिवसांत पाणी औज बंधाऱ्यात पोचणार आहे, पण बंधाऱ्यात सध्या पाच-सहा दिवस पुरेल इतकेच पाणी आहे. त्यामुळे उजनीतील पाणी औजमध्ये पोचेपर्यंत बंधाऱ्यात चर मारून डोहातील पाणी जॅकवेलपर्यंत आणून पाणीपुरवठा करण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने धरण असो वा बंधाऱ्यातील पाणीसाठा झपाट्याने तळ गाठू लागला आहे. सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा होणाऱ्या औज बंधाऱ्याने तळ गाठल्याने १० मार्चपासून पाणी सोडण्याची महापालिकेची मागणी होती, पण आढेगाव खुर्द येथील ग्रामस्थांचे नदीत केटीवेअर बांधण्यासाठी आंदोलन सुरु होते, त्यामुळे सोलापूर शहरासाठी विलंबाने पाणी सोडण्यात आले.

आता उजनी धरणातून औज बंधाऱ्यात पाणी सोडले असून आठ दिवसांत पोचणार आहे. तोपर्यंत बंधाऱ्यातील डोहातील पाणी चर मारून जॅकवेलपर्यंत आणावे लागणार आहे. उजनी उणे २५ टक्के झाल्यावर महापालिकेला धरणात दुबार पंपिंगची यंत्रणा बसवावी लागणार आहे. सोलापूर शहरासाठी सोडलेले पाणी बंद झाल्यावर धरण उणे ३० ते ३४ टक्के होईल, त्यावेळी दुबार पंपिंगशिवाय जुन्या जलवाहिनीतून पाणीच उपसा करता येणार नाही, अशी स्थिती आहे. धरणातून मे महिन्यात पुन्हा एकदा सोलापूर शहरासाठी पाणी सोडावे लागणार असल्याने त्यावेळी उपलब्ध पाणी पाहून शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने लांबू शकतो, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

समांतर जलवाहिनी दिवाळीपर्यंत पूर्ण होणार

समांतर जलवाहिनीचे ८० किलोमीटर काम पूर्ण झाले असून अजून २३ किलोमीटर काम राहिले आहे. काम पूर्ण करण्यासाठी नोव्हेंबर २०२४ पर्यंत मुदत आहे. दिवाळीपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली. दरम्यान, समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर पावसाळ्यात नदीद्वारे औज बंधाऱ्यात पाणी साठवले जाईल आणि इतरवेळी दोन्ही पाईपलाइनमधून धरणातून पाणी घेतले जाईल. त्यामुळे पुन्हा शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आठ हजार थकबाकीदार महापालिकेच्या रडारवर

सोलापूर : शहरातील एक लाख मिळकतदारांकडे टॅक्स थकलेला आहे. त्यापैकी आठ हजार जणांकडे एक लाखांहून अधिक रुपयांची थकबाकी आहे. त्यातील ५०० थकबाकीदारांची परिसरनिहाय यादी महापालिकेने तयार केली असून त्यांच्यावर सध्या कारवाई केली जात आहे. महापालिकेच्या वतीने ज्या सुविधा त्या मिळकतदारांना मिळतात त्या सर्व बंद केल्या जात आहेत. तसेच त्याची मालमत्ता देखील सील केली जात आहे. शासकीय योजनांचा व प्रलंबित मोठ्या विकासकामांचा शासन हिस्सा भरण्यासाठी देखील महापालिकेच्या तिजोरीत अपेक्षित रक्कम नाही. कर्मचाऱ्यांचा पगार जीएसटी अनुदानातून करावा लागतो, अशी सद्य:स्थिती आहे. शहराच्या विकासकामांसाठी करवसुली महत्त्वाची मानली जाते. सोलापूर शहराचा चोहोबाजूंनी विस्तार झालेला असतानाही व शहरात अनेक छोटे उद्योग वाढलेले असतानाही कर वसुलीत तेवढी वाढ झाली का, हा संशोधनाचाच मुद्दा आहे. अनेक मिळकतींना अजूनही कर आकारणी झाली नसून त्यात वाढीव बांधकाम किंवा घरगुती जागेचा व्यावसायिक वापर, अशा मालमत्तांचा शोध अजूनही पूर्ण झालेला नाही. त्यासंदर्भातील विशेष मोहीम आगामी आर्थिक वर्षात होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तत्पूर्वी, संबंधित मिळकतदारांनी स्वतःहून पुढे यावे असे महापालिकेने आवाहन केले आहे. मार्च अखेरमुळे आता अधिकारी- कर्मचाऱ्यांचा संपूर्ण फोकस थकबाकी वसुलीवरच आहे. दररोज महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून थकबाकीदारांवर कारवाई केली जात आहे.

थकबाकीवर दरमहा २ टक्के दंड

ज्या मिळकतदारांना बिल देऊन सहा महिने झाले, त्यांना एकूण थकबाकी रकमेच्या दोन टक्के दरमहा व्याज आकारले जात आहे. यंदा महापालिकेने समाधानकारक वसुली झाल्याने थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू केलेली नाही. ३०८ कोटींच्या उद्दिष्टापैकी सध्या २३० कोटींपर्यंत करवसुली झाली आहे. दरम्यान, ज्यांना एकरकमी टॅक्स (कर) भरणा करणे अशक्य आहे, त्यांची परिस्थिती पाहून दोन टप्प्यात करभरणा करण्याची सवलत दिली जात आहे. पण, उर्वरित रकमेवर त्यांना दरमहा २ टक्क्याप्रमाणे दंड भरावाच लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com