तात्या लांडगे
सोलापूर : चोरटे त्यांनी चोरलेले दागिने ५० टक्के किंमतीतदेखील विकतात. काहीजण पावतीशिवाय दागिने घेतात. मात्र, कोणतीही खात्री न करता एखाद्याने बेकायदा मार्गाने आणलेले किंवा संशयास वाव असतानाही दागिने विकत घेतल्यास तो सराफदेखील चोरी, दरोड्याच्या गुन्ह्यात आरोपी होऊ शकतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सोन्याचा भाव सध्या दीड लाखांपर्यंत असल्याने चोरट्यांचे लक्ष दागिन्यांवरच आहे. कमी वेळेत दागिन्यांमधून जास्त पैसा मिळतो, हा त्यामागील उद्देश असतो. चोरीचे दागिने चोरटे काही दिवसांनी विकतात. मात्र, भारतीय न्याय संहितेतील कलम ३१७(२) नुसार चोरीची मालमत्ता बाळगणे किंवा स्वीकारणे हा गुन्हा आहे. कोणतीही मालमत्ता (पैसे, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू) चोरीची आहे किंवा ती बेकायदेशीर मार्गाने मिळवली आहे, हे पूर्णपणे माहीत असूनही किंवा तसा संशय येण्यास वाव असतानाही ती अप्रामाणिकपणे स्वतःकडे ठेवणे किंवा स्वीकारणे हा गुन्हा मानला जातो.
यात दोषी आढळल्यास संबंधितास तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास किंवा आर्थिक दंड, अशी शिक्षा होऊ शकते. न्यायालयाच्या माध्यमातून अशा गुन्ह्यात ती वस्तू खरेदी करणाऱ्यास दोन्ही प्रकारची शिक्षा होऊ शकते, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. जुळे सोलापुरातील कल्याणनगर येथील शिवबाळा भांजे यांच्या घरातून दागिने चोरीस गेले होते. चोरट्यांकडील दागिने एका सराफाने खरेदी केल्याने त्याच्यावरदेखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांत घट
मागील वर्षी मे महिन्यात सोलापूर शहरात जबरी चोरीचे २१, तर घरफोडीचे ४२ गुन्हे घडले होते. मात्र, यंदाच्या मे महिन्यात जबरी चोरीचे आठ आणि घरफोडीचे २२ गुन्हे दाखल झाले आहेत. गतवर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्यांत चोरीचे २३९ गुन्हे दाखल झाले होते. यंदा त्यात ६५ गुन्ह्यांची घट झाल्याचे पोलिसांच्या नोंदीवरून समोर आले आहे. शहर गुन्हे शाखा, शहरातील सात पोलिस ठाण्यांतील गुन्हे प्रकटीकरण पथके आणि स्थानिक पोलिसांच्या गस्तीचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
...तर गुन्ह्यात दागिने, वस्तू घेणाराही गुन्हेगार
चोरी, घरफोडीनंतर चोरटे त्यांच्याकडील दागिने बाहेर विकतात. अशावेळी संबंधित सराफ किंवा खरेदीदाराने त्या व्यक्तीकडून दागिन्यांची पावती घेणे अपेक्षित आहे. चोरीचे दागिने खरेदी केल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधिताविरुद्ध ‘बीएनएस’च्या कलम ३१७ (२) नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. तेदेखील या गुन्ह्यात आरोपी होऊ शकतात.
- अरविंद माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (गुन्हे शाखा), सोलापूर शहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.