बापरे! - लंपीचा वाघांनाही धोका

राजेश रामपूरकर
Sunday, 6 September 2020

रानगवा हा गायवर्गीय प्राणी असल्याने यामध्ये याचा संसर्ग जाणवू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच जंगला शेजारील गावातील जनावरे जंगलात चराईसाठी जातात. या जनावरांची शिकार करून वाघ, बिबट, कोल्हे, रानकुत्रा हे वन्यप्राणी खातात. त्यामुळे यातूनही त्यांना संसर्ग होण्याची शक्यता आहे

नागपूर :  देशासह राज्यात गेल्या पाच महिन्यापासून कोरोना विरुद्ध लढाई सुरू आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोनावर अद्यापही लस नसल्याने माणसातील प्रतिकार शक्ती वाढविण्यावरच भर दिला जात असतानाच राज्यातील जनावरांमध्येही लंपी या संसर्गजन्य आजाराने शिरकाव केल्याने पशुपालक चिंतेत सापडले आहेत. या संसर्गजन्य आजार आता पूर्व विदर्भातील जंगला शेजारील काही गावांमधील जनावरांना झाल्याने वन्यप्राण्यांनाही हा आजार होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळेच वन विभागाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

गोचीड, गोमाशी किंवा आजारी जनावरांच्या संपर्कात आलेल्या जनावरांमध्ये लंपी स्कीन डिसीस या साथीच्या आजाराने घेरले आहे. हा आजार गायी, म्हशी, शेळ्यांमध्ये दिसून येत असला तरी गायींमध्ये याचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. रानगवा हा गायवर्गीय प्राणी असल्याने यामध्ये याचा संसर्ग जाणवू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच जंगला शेजारील गावातील जनावरे जंगलात चराईसाठी जातात. या जनावरांची शिकार करून वाघ, बिबट, कोल्हे, रानकुत्रा हे वन्यप्राणी खातात. त्यामुळे यातूनही त्यांना संसर्ग होण्याची शक्यता आहे का याबद्दल वनाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. दरम्यान, त्यांनी लंपी हा आजार गायवर्गीय जनावरांना होतो. रानगवा हा गायवर्गीय प्राणी असल्याने याच्या माध्यमातून या आजाराचा शिरकाव ताडोबा व्याघ्र प्रकल्पात होऊ नये म्हणून सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच जंगलाशेजारील, बफर आणि जंगलातील गावांमधील जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे. पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने हे काम युद्धपातळीवर या भागात सुरू आहेत. या आजाराची नोंद अद्यापही वन्यप्राण्यांमध्ये झालेली नसली तरी सर्वस्तरावर काळजी घेतली जात आहे असेही त्यांचे म्हणणे आहे. 

बापरे... दिडशे दिवसांत तब्बल १९ लाख कोटींचे नुकसान, काय असावे कारण

लंपी स्किन डिसीज हा संसर्गजन्य आजार असल्याने यामुळे आजारी असलेल्या जनावरांच्या सांनिध्यात येणारे जनावरे बाधीत होत असतात. त्यामुळे आजारी जनावरांना विलगीकरणात ठेवण्याच्या सुचनाही देण्यात आलेल्या आहेत. या जनावरांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने लसीकरण केले जात आहे. त्याच बरोबर जनावरांच्या रक्ताच्या नमुन्याचेही तपासणी करण्यावर भर दिला जात आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आमच्याकडे अशा प्रकारच्या आजाराची नोंद नसल्याचे सांगितले. 

 

जंगलाशेजारील गावांमधील जनावरांचे लसीकरण 

ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रानतळोदी, कोळसा या दोन गावांमधील पाळीव जनावरांना लंपी आजाराचे लसीकरण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पशुवैद्यकीय विभागाकडून जंगलाशेजारील गावांमधील जनावरांवरही लसीकरण केले जात आहे. त्याचा प्रसार वन्यप्राण्यांना होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. इतर प्रकल्पाकडून याबद्दल कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही. त्याची माहिती आल्यानंतर त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जातील.  नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tiger Threat From Lumpy Disease, It Reached to Tadoba-Andhari Tiger Project