वाहनचालकांनो, कागदपत्रांऐवजी पोलिसांना दाखवा क्यू-आर कोड!

अमित आवारी
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

आता बाजारपेठेत कोणतीही सीलबंद वस्तू विकत घेताना त्यावर क्‍यू. आर. कोड छापलेला असतो. या क्‍यूआर कोडमध्ये तीनशे शब्दांपर्यंतचा टंकलिखित मजकूर साठविला जाऊ शकतो.

अहमदनगर : केंद्र शासनाने मोटार वाहन कायद्यात केलेल्या बदलाचा धसका वाहनचालकांनी घेतला आहे. दंडापासून बचावासाठी कागदपत्रांचे जडबंबाळ सोबत वागवायचे कसे? असा प्रश्‍न सतावत आहे. काहीजण तर चक्क हेल्मेटला सर्व कागदपत्र बांधून प्रवास करीत आहेत.

यावर नगरमधील इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याने उपाय शोधला आहे. क्‍यूआर (क्विक रिस्पॉन्स) कोडचा वापर वाहनविषयक कागदपत्रे साठविण्यासाठी होऊ शकतो. हा कोड गाडीच्या दर्शनी भागात लावल्यास सर्व अडचणी सुटतील, असे या विद्यार्थ्याचे मत आहे. विनोद सूर्यकांत जाधव याने हा उपाय शोधला आहे.

आता बाजारपेठेत कोणतीही सीलबंद वस्तू विकत घेताना त्यावर क्‍यू. आर. कोड छापलेला असतो. या क्‍यूआर कोडमध्ये तीनशे शब्दांपर्यंतचा टंकलिखित मजकूर साठविला जाऊ शकतो. त्याचा वापर वाहनविषयक कागदपत्रे साठवण्यासाठी केला जाऊ शकतो, अशी कल्पना महिन्यापूर्वी विनोदला सुचली. त्याने क्‍यूआर कोड कसा तयार केला जातो, या संदर्भात यू-ट्यूबवरील व्हिडिओ पाहून प्रशिक्षण घेतले.

त्या आधारे त्याने दोन-तीन आठवड्यांतच एक क्‍यूआर कोड तयार केला. त्यात त्याने स्वतःच्या दुचाकी वाहनाचे लायसन्स, आरसी बुक, पीयूसी आणि विमा या संदर्भातील माहिती टाकली. या क्‍यूआर कोडची छायांकित प्रत काढली. ही प्रत त्याने दुचाकीला दर्शनी भागात लावली. प्ले स्टोअरवरून क्‍यूआर कोड पाहण्याचा ऍप मोफत डाऊनलोड केला. या ऍपच्या साहाय्याने क्‍यूआर कोडमधील सर्व कागदपत्रांची माहिती सहज मिळवता येते. या शिवाय अनेक वेबसाइटची लिंक यावर टाकता येऊ शकते.

या नवीन संशोधनामुळे कागदपत्रे जवळ बाळगण्याऐवजी क्‍यूआर कोड वाहनांच्या दर्शनी भागात लावता येईल. पोलिस प्रशासन किंवा अन्य विभाग या कोडच्या साहाय्याने वाहनविषयक कागदपत्रांची पडताळणी करू शकेल, असा विनोदचा दावा आहे. विनोद हा रासे वडगाव (ता. शिरूर, जि. पुणे) येथील रहिवासी आहे. तो सध्या नगरमधील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मॅकेनिकल इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे.

क्‍यूआर कोडचा वापर अनेक ठिकाणी होऊ शकतो, असे विनोदचे म्हणणे आहे. नगरमधील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये तो शिकत असून तेथील यांत्रिक विभागाच्या प्रयोगशाळेत अनेक यंत्रे ठेवलेली आहेत. त्याची माहिती खूप मोठी आहे. ती साठविण्यास मर्यादा आल्याने विनोदने क्‍यूआर कोडचा पर्याय शोधला.
याशिवाय आता लिथियम बॅटरीचा वापर वाढला आहे. या बॅटरीचा आकार अतिशय छोटा असतो. बॅटरीसंदर्भातील माहिती त्यावर लिहिण्यास तेवढी जागा नसते. तेथेही या कोडचा वापर होऊ शकतो, असे विनोदने सांगितले.

क्‍यूआर कोडचा वापर अनेक ठिकाणी होऊ शकतो. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व संरक्षण विभागालाही त्याची मदत होईल. त्याबाबत आणखी संशोधन सुरू आहे.
- विनोद जाधव, अभियांत्रिकी विद्यार्थी
 

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : ‘माईक असू दे आपलं सगळं उघड असतयं,’ अजित पवारांचा व्हिडिओ व्हायरल!

- Vidhan Sabha 2019 : विखे-पाटलांचा अर्ज धोक्यात?

- ब्रेकिंग न्यूज : कर्जत-जामखेडमधून रोहित पवारांचा उमेदवारी अर्ज अपात्र!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two and four wheeler Drivers can be show only QR code to traffic police instead of documents